Monday, July 07, 2008

नागफ़णी उर्फ़ Duke's Nose

नागफ़णी उर्फ़ Duke's Nose

तसे मी २-३ वर्षे पूणे - पनवेल असा प्रवास केलेला आहे. कारण मी तसा पनवेलचा पण माझे कॉलेज पूण्यात होते, त्यामूळे मी महिन्यातून २-३ वेळा तरी घरी जात असे, प्रत्येक वेळी जेव्हा बस भोगद्यातून बाहेर आली की माझे लक्ष डावीकडील एका उंच पूढे आलेल्या भक्कम कड्याकडे जाई. नेहेमी प्रश्ण पडायचा की हा कडा कसला भारी आहे, ह्यावर चढाई करता आली तर कित्ती धम्माल येइल, बाबानां विचारले तेव्हा कळाले की त्या कड्याला नागफ़णी किंवा डुकेस णोसे असा म्हणतात आणि ते तिथे जाऊन पण आले होते, मग मी पण ठरवले कि आपणही जायचेच. ह्या प्रकाराला आता ३-४ वर्षे उलटून गेली पण नागफ़णीला काही जाणे झालेच नाही.

पण काल म्हणजेच ५ जूलै २००८ ला तो मुर्हुत आलाच मी आणि नाश्याने नागफ़णीला जायचे ठरवून टाकले. खूप लोकांना विचारले पण लोकांनी रडरड केली आणि उद्या नक्की सांगतो असे करण्यात धन्यता मानली, मग काय फ़क्त मी आणि नाश्याच उरलो :) अर्थात हे काही नवीन नाहि, आम्ही असे २-३ जणांनी बरेच ट्रेक्स यशस्वि केलेले आहेतच त्यात अजूना एका सुंदर ट्रेकची भर पडली. असो आता मी जरा माज बाजूला ठेवून आमचे प्रवास वर्णन सांगतो.



तर आम्ही ६.१० च्या सिंहगड एक्सप्रेसनी शिवाजीनगर सोडले आणि खंडाळ्याकडे प्रयाण केले. आम्हा दोघांनाही रस्ता माहिती नव्ह्ता, केवळ इंटरनेटवरून आणि बाबां कडून मिळालेल्या माहितीच्या आधाराने आम्ही खंडाळ्याहून वर जायचे ठरवले, बाबा म्हणत होतेकि लोणावळ्याच्या जवळील कूरवंडे वरून जा पण आम्ही विचार केला कि जरा वेगळा रस्त्याने प्रयत्न करूयात. हा तर आम्ही ७.३० ला खंडाळ्याला पोहचलो आणि जरा गावातल्या लोकांकडे नागफ़णीच्या रस्त्याची चौकशी केली आणि निघालो, मग थोडसा जंगलात शिरून टाटा पॉवरपाशी पोचलो, तीथून पायवाट पण दिसली आणि बाणांच्या खूणा पण दिसल्या, आम्ही त्या दिशेने निघालो, ढग अगदी खालि उतरले होते, आम्हाला नागफ़णीचा डोंगर दिसलाच नव्हता केवळ लोकभरोसे जात होतो, पण आम्ही कूठेतरी १ वळन चूकलो अर्थात हे आम्हाला खुप पुढे गेल्यावर एका गावकऱ्याकडून समजले :), पण तोपर्यंत आम्ही कुरवंडे नावाच्या गावापाशी आलो होतो, ढगांनी आमचा घात केला होता, आम्ही जवळजवळ १ तास नूसतीच भटंकती केली होती तीपण भलत्याच दिशेने :), मग एका गाववाल्याला पकडून कुरवंडेहून रस्ता परत समजून घेतला. ढग पुर्णपणे खाली आल्याने अजिबात काहिहि दिसत नव्हते, त्या माणसाने पण अंदाजानेच डोंगर कुठे आहे ते दाखवले आणि म्हणाला "जा की हिकडं" आणि आम्ही आलिया भोगासि म्हणत "त्या तिकडं" निघालो, वाटला होता तेच झाले, त्याने सांगीतल्या प्रमाणे आम्ही डावीकडे वळलो आणि परत घात झाला :), आम्ही परत उगाच दाट ढगांमधे १ तास फ़िरत बसलो, एक दरी आली तेव्हाच ढग थोडे बाजूला झाले आणि आम्हला कळालेकी घंटा!!! आपण परत चुकलो आहे, कारण नागफ़णीच्या बाजूने आपला मुंबई - पूणे हायवे दिसतो आणि इथे आम्हाला मस्त खोल दरी आणि मोकळा प्रदेश दिसत होता. मग त्या माणसाला शेलक्या शिव्या मोजून परत मागे फ़िरलो, आणि जीथून सुरुवात केली होती तिथे १ मस्त लांब चक्कर मारुन आम्ही आलो. आमची चिडचिड झाली होती, ७.३० पासून चालूनपण आम्ही १०.३० पर्यंत नूसतचं फ़िरत होतो, नाग्फ़नीचा काही पत्ताच नव्हता, ढगांमुळे काही दिसेल तर शप्पथ, तितक्यात आम्हाला ८-९ जणांचा घोळका दिसला तेपण बहूतेक नागफ़णीला जाण्यासाठी आले होते, मी आणि नाश्याने त्यांना गाठले, त्यांच्यात फ़क्त एकाला रस्ता माहित होता, पण त्याला खात्री नव्हती, त्याला मात्र डोंगर नक्की कूठे आहे, हे माहित होते, त्याने आम्हाला डोंगर दाखवला आणि चला आमच्यबरोबर असा म्हणला पण तोही रस्त्याबद्दल साशंक अस्ल्याने आम्ही तसे करणे टाळले, तसे आम्ही दोघे डोंगर अजून मिळत नाही म्हणून जरा चिडीला आलोच होतो, त्यामूळे आम्ही डायरेक्ट डोंगराला भिडायचं आणि रस्ता शोधायचा असं पक्के ठरवले आणि परत डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
ते दोन रॉक पॅच
जोरदार कडा

जवळ आल्यावर थोडे आवाज ऎकू यायला लागले नीट बघितल्यावर काही मुले दिसली त्यांना जोरात ओरडूनच रस्ता कुठे आहे विचारून घेतले आणि वाट मिळेल तिथून ती मूले जीथे दिसली तिथे पोचलो, पायवाट दिसल्यावर चला रस्ता मिळाला असे आंनदित हौउन मार्गस्थं झालो, आमचे पाय झपाझप पडू लागले अर्ध्या तासातच आम्ही थोड्या मोकळ्या जागी आलो आणि मटकन खालीच बसलो, नाग्फ़णीचा भव्य काळा कभिन्न ताशिव कडा दिसला, तोंड जरावेळ उघडेच राहिले. त्या कड्याचे सौंदर्य मला वर्णन नाहि करता येणार त्यासाठी तिथेच येणे गरजेचे आहे, तिथून लोणवळा - खंडाळ्याच्या दऱ्या-खोऱ्यांचे व्यवस्थित दर्शन होत होते, उडंद धबधबे आणि हिरव्या फ़क्त आणि हिरव्या फ़क्त रंगानी भरलेल्या त्या दऱ्या बघून सुखाची अनुभुती मिळत होती, डोळे अगदि शांत झाले. मी आणि संदीप कितीतरी वेळ नुस्ते तिथेच मखमली गवतात ,गार वाऱ्यात , पांढऱ्याशुभ्र ढगांमधे पडून राहिलो, ४-५ तासांच्या पायपीटीचा पुर्णपणे विसर पडून आम्हि त्या कड्याला आव्हान द्यायला सज्ज झालो. येथील रॉक पॅच तसा अवघड नाही परंतु पावसाने अत्यंत निसरडा आणि धोकादायक झाला होता, मुख्य म्हणजे जरा पाय सरकला कि सरळ ६००-७०० फ़ूट कातळावरून अंतिम प्रवास घडणं अगदि ठरलेला आहे. आम्ही सावधपणाने २ पॅचेस पूर्ण केले, पण शेवटचा आणि ३रा पॅच बघून मात्र आम्ही मागे फ़िरायचा निर्णय घेतला. ह्या पॅचवर अनुभव आणि उपकरणांशिवाय चढाई करणे अजिबात सोयिचे नाहि. "इतने पास फ़िरभी ये दुरीयां" असा म्हणत आम्ही घसरत-घसरत २ पॅच उतरून खालि आलो, पण आम्हाला इतक्या लांब येउन हार मानण पटतच नव्ह्ता. एक मात्र आहे कि जर आम्ही नेहेमीच्या रस्त्याने गेलो असतो तर आम्हाला नागफ़णीच्या कड्याचे इतके सुंदर दर्शन झालेच नसते.
रॉक पॅच आणि कडा

मग आम्ही तिथुन परत पायथ्या पर्यंत आलो, अरे हो एक राहीलच आम्ही आधी जिथून त्या गावकऱ्याच्या सांगण्यावरून डावीकडे वळालो होतो त्याऎवजी उजवीकडे वळालो असतो तर लगेच डोंगरच्या पायथ्याशी लागलो असतो, अर्थात हे आम्हाला नंतर कळाले :), आम्ही २ तास विरुध्ध दिशेला चाललो होतो पण "देर से आऎ, लेकीन दुरुस्त आऎ" असा विचार करून, परत डोंगर चढायला सुरुवात केली, अर्ध्या तासातच आम्ही नागफ़णीवर पोहचलो.


नाश्या आणि मी

वर आलो एकदाचे

वरती शिवमंदिर आहे, श्री शंकरांना नमस्कार करून त्यांचे आभार मानले. वरून काय द्रुश्य होते ते मित्रांनो, मी शब्दांमधे सांगूच शकत नाही, पार लोणावळ्यापासून ते खोपोली पर्यंतचा परीसर दिसत होता, सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि दुधासारखे धबधबे दिसत होते, आपला मुंबई - पूणे हायवे सापासारखा डोंगराला विळखा घालून जाताना दिसत होता, ते अप्रतिम द्रुश्य डोळ्यांत साठवत पहीले बायकोला फोन केला आणि पोचलो असे कळवले :), सहजच बाजूला लक्ष गेले, आम्ही जिथून वर यायचा प्रयत्न करत होतो, तो पॅच दिसला आणि आम्ही हादरलोच आम्ही खूप जवळ आलो होतो, खूप मोठी रीस्क घेतली होती आम्ही :), बाकिची लोकं पण आमचा प्रताप पाहून जरा हादरलीच. स्वतःची स्तुती ऎकून आम्हीपण जरा सुखावलो :). कड्याला व्यवस्थित रेलींग केलेले आहे, तरीही काही मजनू आपल्या लैलांना इंप्रेस करायला रेलींगच्या पुढे जात होतेच, मरायची नसती खाज अस म्हणून आम्ही जरा फोटोसेशन करून खाऊन घेतले, आम्ही पण जरा त्या झोपून कड्यावरुन खाली पाहून घेतले.






वरून दिसणारी काही सुंदर द्रुश्ये

५-६ तासांच्या अथक पायपीटीनतंर आम्ही डगडांवर जरा पहूडलो. एक सांगतो मित्रांनो ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे जरूर या, इथुन खुप खुप मोठा परीसर दिसतो, आणि हे सौंदर्य मी खरच शब्दांमधे नाही सांगू शकत, कदाचित अप्रतिम हा शब्दपण पूरेसा नाही. मला नेहेमी वाटते की आमच्यात एखादा छान लेखक हवा होता, तोच ह्या सुंदर जागेचे नीट वर्णन करून ह्या स्वर्गीय जागेला न्याय देउ शकला असता. आम्ही आमचा खंडाळ्याहून चुकलेला रस्ता पण पाहीला आणि आपण कसे वेड्यासारखे प्रचंड अंतर कापलेला आहे हे समझले, एव्हाना २ वाजले होते, आता ढग पण दुर झालेले होते, परत डोलेभरून ते द्रुश्य बघितले आणि खाली आलो. गावात आल्यावर कळाले की बस येत नाही ट्रॅक्स शिवाय पर्याय नाही, पण अर्धातास एकपण ट्रॅक्स आली नाही, आम्ही चालत परत निघणार तर १ ट्रॅक्स आली पण तिच्यात १६-१८ माणसे कोंबली :), आणि आम्ही ते बघुन चालणे सुरुच ठेवले, मग आम्हाला १ रिक्शा मिळाली, आम्ही लोनावळा स्टेशन गाठले आणि ४.१०ची कर्जत - पूणे पॅसेंजर पकडून ५.४५ला पोचलो. मस्तपैकी गंधर्व मधे मेदुवडा-सांबार खाऊन घरी गेलो आणि झक्कास आंघोळ करून गादिवर पडी घेतली :).

अता थोडेसे कसे जायचे ह्याबद्दल. नागफ़णी हा अगदी सोप्पा ट्रेक आहे आणि तुम्ही वाट चुकला नाहित तर अगदी २ तासांमधे सर्वकाही बघून होते. पूण्याहून अथवा मुंबईहून लोनावळा येथे यावे, येथून जीप पकडून कुरवंडे येथे जावे (६ रुपये पर शिट होतात :) ). जीप एका मोकळ्या मैदानात सोडते, तिथून विचारून पूढे जावे, तिथे बाजुच्याच मैदानात काही बांधकाम सुरु
आहे, नागफ़णीचा डोंगर उजव्या हाताला आहे, हे लक्षात ठेवून चालणे उत्तम. इथे खरच दिशादर्शक बसविणे गरजेचे आहे आणि आम्ही बहुतेक ते बसवण्याचा प्रयत्न पूढच्या वेळी नक्कीच करू.


बाकीचे फोटो येथे पहा, अल्बमची लिंक: http://picasaweb.google.com/Vinit.Agnihotri/DukesNose?authkey=u4OvabgS-5A

Labels: , , , ,

Wednesday, July 02, 2008

राजगड

राजगड...राजगड...राजगड...

सावधान!!!
मी पाहिल्याक्षणी प्रेमात पडलो असा गड. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा अप्रतिम क्कील्ला, स्थापत्य शास्त्राच्या द्रुष्टीने आणि सामरीक द्रुष्टीने जवळ जवळ अजिंक्य आहे. क्कील्याला ३ माच्या आहेत, सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अश्या ह्या ३ माच्या. सर्व माच्या तटबंदिने सुरक्षित केलेल्या आहेत, ही तटबंदि ३५० वर्षे झाली तरी भक्कम आहे. प्रत्येक माचीवरुन दिसणारे द्रुश्य तितकेच अप्रतीम आहे. मधे बालेक्कील्ला आणि ३ बाजुनां माच्या असा राजगडाच थाट आहे. राजगड पूर्ण पाहायचा म्हणजे २ दिवस तरी हवेतच, कारण नुसताच गडावर जाऊन पायपीट न करता, गडाचे सामरीक महत्व आणि त्याची सुंदरता डोळेभरून पहाणे जास्त महत्वाचे आहे. राजगडा बद्दल अजुनही खुप काही बोलता येइल, पन मी ते आत्ता टाळुन आमचे प्रवास वर्णन करतो :).
ढगांनी वेढलेला राजगड
बऱ्याच दिवसांपासून राजगडला जायच असे मनात घोळत होते पण मुहुर्त काही सापडत नव्हता, अखेर आम्हाला मुहुर्त मिळालाच, २८ - २९ तारखेला आम्ही म्हणजेच, मी, नचिकेत, मकरंद आणि संदीप आमच्या राजगडच्या मोहीमेचा दिवस फिक्स केला :P. आम्ही वाजेघर वरून पाली दरवाज्याने चढाई करायची असे ठरवले आणि २८ ला सकाळी ६.३० ला बाईक घेऊन निघालो, आम्ही ७.३० ला पायथा गाठला, मग तिथेच गाडी ठेवून, पूढे निघालो.

प्रवास सूरु झाला
पूण्याहून निघतानाच पाऊस सुरु होता आणि इथेही तो चालूच होता. त्यामुळे आम्ही आनंदात होतो. थोडासा चढ झाल्यावर आम्ही,राजगडाच्या मुख्य डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. समोरचे द्रुश्य पाहून वेडेच झालो, गडाचा अर्धा भाग पूर्णपणे ढगांनी व्यापलेला होता. गड पूर्णपणे हिरवळीने नटला होता आणि माथ्यावर ढगांचे पूर्ण आवरण होते, मधूनच धबधब्यांचे पांढरे प्रवाह त्या गर्द हिरव्या रंगात उठून दिसत होते, सूर्याचा तर कूठेच पत्ता नव्हता, गडाचे असे पहीलेच रूप बघून आम्ही अतिशय आनंदित झालो, आणि जय शिवाजी - जय भवानी, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव असा जयघोष करत गड चढायला सूरुवात केली.

चढाइस सूरुवात झाली
पाली दरवाज्याची वाट तशी चांगली आहे पण चढण बरीच आहे, त्यामुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येते, परंतु त्यामूळे दमायला पण होते, त्यात माझे वजन आणि पोट वाढल्याने अर्ध्या तासातच दमछाक सुरू झाली :ड, वाटेत पाउस मधे मधे सुरूच होता. सुरूवातीला जंगलातल्या माश्यांनी फ़ारच त्रास दिला, त्या चावत होत्याच पण रक्त पण पीत होत्या, अगदी पवसात पण त्या चावत होत्या, हळू हळू आम्ही वर पोहोचू लागलो, अर्ध्यात आल्यावर आम्ही पुर्णपणे ढगांनी वेढलो गेलो, एकदम ठंद वाटू लागले,

धूक्यात हरवलेली वाट

पहीला बुरुज
आम्हा सर्वांमधे नवीन जोश भरला गेला आम्ही नव्या दमाने चढाई सुरु ठेवली. बरच वर गेल्यावर आम्हाला पहिला बुरुज अस्पष्ट दीसू लागला आणि आम्ही पोहचालो एकदाचे असा निश्वास टाकणार इतक्यात उंच पायऱ्यांनी आमचे लक्श वेधून घेतले. त्या उंच पायऱ्या आणि खडा चढ बघून जरा फ़ाटलीच पण म्हटल आता मागे हटायचे नाही, मग काय घेतलं बजरंगबलीचे नाव आणि सुरूवात केली पायऱ्या चढायला, कीती होत्या हे काही मोजल्या नाहीत पण खुप होत्या :)
संदीप पाली दरवाज्या जवळ
संदीप सगळ्यात आधी नथांबता वर पोहचला होता. हळू हळू सगळे भव्य पाली दरवाज्यत उभे होतो, जवळच १ छान छोटासा धबधबा होता, वारा आता अजुनच जोरात होता, ढग पुर्णपणे खाली उतरले होते आणि आम्हाला अगदि १-२ हात पलिकडच पण नीट दीसत नव्ह्ता. परत एकदा शिवरायांचे नाव घेतले आणि पद्मावती मंदिराकडे निघालो. अरे हो पाली दरवाजा पद्मावती माची जवळ आहे, येथुन मंदीर ५-१० मीनीटस वर आहे. पाउस सुरू होताच, आम्ही मंदिराजवळ पोहचलो आणि पटकन आत गेलो, दाराची उंची कमी असल्याने मस्त पैकी कपाळमोक्षा झाला :). डोके चोळत आत गेलो, आमच्या आधी तीथे काहि मुले होती पण ती परत जात होती, त्यांनी विचारले कि स्टोव आणला आहे का?? आम्ही नाही म्हणालो आणि ते म्हणाले कि लाकडे पेटनार नाहित कारण इथे २ दिवस पाउस सुरु आहे, आमची तीथेच फ़ाटली :), रॉकेल होते पण लाकडे नव्हती, बघु नंतर म्हणून आम्ही तो विषय संपवला आणि मस्तपैकी कपडे बदलून, मॅट्स पसरून जरा पडलो.मंदिराच्या दरवाज्यातून आणि खिडकीतून भसाभस ढग आत येत होते, आम्ही ढगांतच राहायला होतो असा म्हणता येइल :). मग नच्याने आणलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या पोटभर खाल्ल्या.
धूक्यात वेढलेले पद्मावती मंदिर
मग ५-१० मीनीटस मधेच मी आणि मकरंद किल्ला बघयला बाहेर पडलो, पहीले आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने निघालो, आता तर आम्हाला फ़क्त आमच्या पायखालचेच दीसू शकत होते इतके ढग आले होते, आम्ही मस्त पावसाची मजा लूटत जात होतो, सुवेळा माचीचा रस्ता बराच आहे, मग तिथे आम्ही काळेश्वर बुरुज, सुवेळा माची दरवाजा, चोर दरवाजा (ह्या दरवाज्याने येणा जवळ जवळ अशक्य आहे) आणि अत्यन्त प्रसिद्ध असे नेढे बघीतले. नेढे म्हणजे काळेश्वर बूरुजाच्या खालील कातळामधे असलेले मोठे खिंडार. मी आणि मक्या त्यात चढून बसलो :), तसा वारा खुप भन्नाट होता आणि पावसाने दगड फ़ारच निसरडे झाले होते, पण आम्ही चढलोच, मग तीथून निघालो आणि परत मंदिरात आलो.
नेढे
काळेश्वर बुरुज

काळेश्वर बुरुजाचा कडा

सुवेळा माचीची वाट

सुवेळा माची दरवाज्यातून दीसणारे द्रुश्य
मग नच्या आणि नाश्या बाहेर गेले, असा करणे जरूरी होते कारण नाहितर जागा गेली असती ना :फ. मग ते पण फ़ीरून आले, मग नच्याने गो. नी. डान्डेकरांचे दुर्गभ्रमन्ति चे पुस्तक बॅटरीच्या उजेडात मोठ्याने वाचायला सुरुवात केली, त्यांनी राजगडाचे फ़ारच सुंदर वर्णन केले आहे तसेच त्यांनी गड ५६ वेळा सर केलेला आहे, आम्ही ढगांमुळे तसे काहिच बघु नाही शकलो पण इथे बघन्यसारखे फ़ार आहे असा पूस्तकातून कळाले त्यामुळे आम्ही परत एकदा हिवाळ्यात यायचा ठरवले.

रात्र झाली होती,आता देवळात ७० मानसे जमा झाली होती :), त्यामुळे खूप दंगा सूरु होता, इतक्यात नाश्या आणि नच्याला मुंग्या चावल्या, सहज म्हणून बघितलं तर नाश्याच्या मॅटखाली मोठ्या लाल मुंग्याचे वारुळ निघाले :) त्याची मॅट पोखरून त्या वर येत होत्या, मग आम्ही पटापट रॉकेल टाकले, ह्या प्रकारात मस्त अर्धा तास गेला. जेवायची वेळ झाली होती शिधा होता पण लाकडांचा पत्ता नसल्याने आम्ही ब्रेड, चीझ, जाम , सॉस असा ख्खाले मग फ़रसाण, पोहे, कांदा, मिर्ची टाकून मस्त भेळ केली. मग पांघरूणे काढली आणि झोपायची तयारी केली, जरा झोपतोय तर परत मुंग्यानचा ऍटॅक दूसरीकडून सूरु झाला मग परत रॉकेल प्रकरण झाले :फ, झोपायचा प्रयत्त्न करू लागलो, पोरे जोशात होती आणि उडंद गाणी सूरु होती. १२-१ च्या सूमारास माझ्या मॅट खाली मुंग्या निघाल्या :) मग परत रॉकेल प्रकरण झाले. मग मी आणि मक्या अर्धा तास बसून होतो, माझी पूर्ण खात्री झाल्यावर मग आम्ही दोघे परत झोपलो.

संजीवनी माचीची वाट

संजीवनी माचीचा शेवट

संजीवनी माचीची वाट

मग सकाळी ६.३० ला जाग आली. मग जरा आवरून संजीवनी माची बघायला बाहेर पडलो, अता तर वारं आणि पाउस अजूनच जोरात होते, छान दाट ढगांतून वाट काढत आम्ही माची वर पोहचलो, ही माची पण छान भक्कम आहे, मग परत फ़ीरून बालेकिल्ल्या पाशी आलो, वारा आणि पाउस खूप जोरात असल्याने आम्ही चढाइ केली नाही. मग तिथेच मस्त पावसात पोहे केले आणि पावसात भिजत खाल्ले. मग आम्ही जड मनाने खाली यायला सूरुवात केली, येताना वाट फ़ारच निसरडी झाली होती, मी दोन वेळा मस्त आपटलो, थोडसा खरचटले पण आता ठिक आहे अता तितकं चालायचचं नाही का?? तासाभरात खाली आलो, मागे वळुन पहीले आणि धुक्याने वेधलेल्या राजगडाचे मनोहारी रूप डोळ्यात साठ्वून मनोमन हिवळ्यात ययचा ठरवले, शिवरायांना परत वंदन करून आम्ही राजगडाचा निरोप घेतला.
ट्रेक संपला

त्या विशाल गडाला आणि त्याहून विशाल शिवरायांना ह्या माव्ळ्याचा त्रिवार मुजरा.
जय शिवाजी - जय भवानी।

उर्वरीत फोटोज इथे बघा:

Labels: ,