वाफ़ाळता लाल चिकन शेजवान
परवा ऑफ़िसमधून परत जाताना लाल शेजवान राइस दिसला आणि मनात असंख्य आठवणी जाग्या झाल्या.मी, अभिषेक आणि अंड्या (निलेश) सदाशिव पेठेमधे एक फ़्लॅट घेऊन राहात होतो. मी आणि अंड्या नोकरीवाले तर अभ्या स्टुडंट. फ़्लॅट १ रूम-किचन, छोटी बाल्कनी, निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानीच्या अगदी वर असा आमचा फ़्लॅट.
रोज सकाळी सुरभी अमृततुल्यमधे चहा आणि दोन छोटी बिस्किटे, नंतर जवळील एका दुकानात शिरा-पोहे , पोहे आणि त्या जोडीला १ सामोसा किंवा १ बटाटा वडा अगदी ठरलेला, मग अंड्याने माझ्यातले पोहे अणि शिरा खाणे आणि मी तसे करू नये म्हणून त्याने उपमा घेणे हे अगदी नित्यनेमाने चालत असे. संध्याकाळी समोरच्या गाडीवरची कच्छी दाबेली किंवा १२ रुपयाचे चीज-पोटॅटो सॅंडविच ठरलेले. रात्री अथर्वमधे जाऊन २० रु. मिनी थाळी. असा दिनक्रम अगदी ठरलेला.
दर शनिवार-रविवार मस्ती, बाहेरील खाणे, एकत्र भटकणे, मुली बघायला जाणे, तंगड्या तोडणे, एस.पी. बाहेरील भुर्जी पाव आणि अंडा राइस हे अगदी ठरलेले होते. त्यावेळी आम्ही बऱ्याच गाडयांवरचा भुर्जी-पाव खाल्लेला होता :) आणि बऱ्याच हॉटेलमधल्या कोंबड्यापण हाणल्या होत्या. घरी पार्सल आणल्यावर एकत्र बसून १४ इंची मॉनिटरवर किमान १०० वेळा तरी जत्रा पिक्चर आम्ही पाहीला असेल. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळा आम्ही आग्री शोले पाहीले असतील. संदिप खरे, गारवा ह्याचे भरपूर विडंबनसुद्धा आम्ही केले होते. अमित, नचिकेत, संदिप असे मित्र जमवून घरीच एकत्र लाल चिकन शेजवान राइस, त्या जोडीला मस्त मंचुरियन ग्रेव्ही, सुजाताची पिस्ता/मँगो मस्तानी (१ बाय २), लाल चिकन लॉलिपॉप असा भरगच्च बेत ठेवून पार्ट्या केल्या होत्या.
एकाची बाजू घेऊन दुसऱ्याची यथेच्छ खेचणे हा अगदी नित्यनेमाचा कार्यक्रम होता, मधे काही दिवस अनिकेतपण ह्या सगळ्या मस्तीमधे सामील होता. मग नंतर रोहन रहायला आला, मग आमच्या मस्तीला अजूनच उत चढला होता. आमच्या फ़्लॅटवर मंदार, सुशांत पण रहायला आले होते, तेव्हा परत मग लाल पार्टी, गारवा विडंबन, जत्राचा खास शो, आग्री शोले इत्यादी परत परत केले होते. एकत्र बसून भरपूर गाणी ऐकली होती.
हा....भरपूर आठवणी एकदम समोर येउ लागल्या, मला अजूनही त्या दिड वर्षात केलेली धमाल आठवत राहते. कालांतराने आम्ही सर्वांनी हळू-हळू तो फ़्लॅट सोडला/बदलला. पण त्या आठवणी मात्र दिड वर्षे झाली तरी अगदी ताज्या आहेत, मला आठवतय अभिषेक नेहेमी म्हणायचा की विनीत, अंड्या "आपण कायम असेच एकत्र राहुयात जबरी मजा येइल, काही चिंता नाही, मागण्या नाहीत, विचार नाहीत, फ़क्त मस्त जगायच आणि एंजॉय करत रहायचं" पण खरचं खूप मजा आली असती, असो बराच उशीर झालाय त्याला आता. आम्हाला कायम एकत्र राहता तर नाही येणार पण वर्षातून एकदा काही दिवस परत अस एकत्र रहायला मला खूप-खूप आवडेल, आणि कदाचित अंड्या, अभिषेक आणि रोहनला पण आवडेल. परत एकदा तो वाफ़ाळता लाल चिकन शेजवान खायची फ़ार इच्छा आहे :)
जाता जाता इतकाचा म्हणेन की "Those were the Best days of my life"
Labels: chicke shejwan, chicken, friends, hostel, hostel friends, shejwan fried rice
2 Comments:
मस्तच आहे !!
hmm..miss those days like anything..feel like reading this post again and again..and relive those days..like a drop of water on lotus leaves..so much there for a moment..gone the next one..something that one cant live without..so much pure,innocent..thanks a lot for those golden days..and making me relive them again..
Post a Comment
<< Home