Tuesday, July 15, 2008

कर्नाळा किल्ला

कर्नाळा


कर्नाळा पनवेलपासून साधारण १५ कि.मी. अंतरावर आहे, पनवेलहून पेणला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला, १ अंगठ्या सारख्या डोंगर दिसतो, हाच तो कर्नाळा. मी जवळजवळ ८-९ वर्षे पनवेलला होतो, पण मी कर्नाळ्याला एकदाहि गेलेलो नव्हतो, म्हणजे तसा एकदा प्रयत्न केला होता, पण आमच्यावर १५-२० माकडांनी हल्ला केला होता आणि त्यामूळे आम्हाला माघार घ्यावी लागली होती :) त्यामूळे मी १३ तारखेला माझा खूप जूना बेत तडीस नेला. ह्यावेळी मी माझ्या शाळेच्या मित्रांबरोबर गेलो होतो, त्यामूळे तर हा ट्रेक अगदी छान झाला, आम्ही बऱ्याच वर्षांनंतर ट्रेक केला.
झाडांची मूळे आणि माती ह्यांनी तयार झालेल्या पायऱ्या



मी, प्रितेश, मंदार आणि रोहन

मी, मंदार, रोहन आणि प्रितेश असे आम्ही चौघेच १३ तारखेच्या सकाळी ८.३०ला माझ्या कारने पनवेलहून निघालो, १५ मिनीटांनी हॉटेल कामत मधे मस्त मिसळ-पाव हाणला आणि मग किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो, अता इथे वन-खात्याने माणशी २०रू. असे प्रवेशशूल्क घेणे सुरू केले आहे, चारचाकीसाठी ५०रू. पार्कींग आहे. हा तर आम्ही पैसे भरून आत गेलो, आणि बॅग्समधील जास्तीचे सामान गाडीमधेच ठेवले आणि बॅग्स जरा हलक्या करून गडाच्या वाटेला लागलो. गडावर जायला २ वाटा आहेत, पहीली वाट, गडाच्या डाव्याअंगानी वर जाते आणि दुसरी उजव्याअंगाने. पहीली वाट तशी सोप्पी आहे, मधेमधे काही ठिकाणी झाडांची मुळे आणि दगड ह्यांपासून पायऱ्यापण तयार झाल्या आहेत. दूसरी वाट पूर्णपणे जंगलातून जाते आणि तशी थोडी अवघड आहे, पावसाळ्यात खूप निसरडी असते, त्यामूळे ट्रेकिंचा अनुभव असणाऱ्या लोकांनीच पावसाळ्यात येथून जाणे चांगले. आम्ही उगाच किडा म्हणून गेलो उजवीकडून :D
दाट जंगलातून जाणारी वाट

उभा चढ

पावसाने वाट चांगलीच निसरडी झाली होती आणि चढपण चांगलाच जाणवत होता, पण इरादा पक्का होता म्हणून म्हटलं देऊ धक्का :) मधेमधे फोटोज काढत आम्ही वरवर जात होतो, पाऊस अजिबात नव्हता त्यामूळे फोटोज तर छान येत होते, पण अशक्य उकाडा जाणवत होता :(, घामाने आणि जंगलतल्या डासांनी हैराण झालो होतो, मंदार आयुर्वेदीक डॉक्टर तर प्रितेश रुइयामधिल झूओलॉजीचा शिक्षक त्यामूळे चालता चालता दोघे आम्हाला विविध वनस्पति आणि प्राणि ह्यांची माहिती पूरवत होते. येथिल जंगल छान घनदाट आहे, वाटेच्या दोन्ही बाजूंना हिरव्यागार झाडांनी मस्त दाटी केलेली आहे, आणि संपुर्ण वाटेवर जणू झाडांच्या फांद्यानी शाकारलेल छप्पर आहे असचं वाटत. त्यामूळे ऊन असूनही आम्हाला ते स्पर्शही करू शकत नव्हते. शेवटचा थोडासा चढ जरा अगदिच जास्त होता, पण आम्ही एकदाचे वर पोहचलो. थोडेसे अंतर एका पठारावरून चाललो तेव्हा आम्हाला किल्ला व्यवस्थित दिसला, तो अंगठ्याचा आकार प्रथमच मी इतका जवळून पहात होतो.
गडाचे सुंदर प्रथम दर्शन

अंगठयाचा आकार

१ भग्न पण त्याकाळाची आठवण करून देणारा बूरूज

तो अंगठयाच्या आकाराचा सुळका पुर्णपणे हिरवळीने नटला होता, हा किल्ला सर्वबाजूंनी दाट जंगलानी वेढलेला आहे, त्यामूळे वरून सर्वत्र हिरवेगार दिसत होते, मधुनच त्या जंगलातून जाणाऱ्या नागमोडी मुंबई - गोवा हायवे दिसत होता, तसेच तेथेच असलेली काही रिसोर्टसपण दिसत होती. एकूणच वरून दिसणारे सर्व द्रुश्य फ़ारच सुंदर होते. गडावर पाहण्यासारखे काहिच शिल्लक नाहि, १ पडकी खोलि आहे, भग्न दरवाजे आणि पडझड झालेली तटबंदी दिसते. ह्या किल्ल्यावर पाण्याची अजिबात कमतरता नाही. अंगठ्याच्या सुळक्याखालील कातळात भरपूर टाक्या खोदलेल्या आहेत, त्या कोरीव आणि एकमेकांना जोडलेल्या टाक्या बघितल्याकी खरोखर नवल वाटतं.

कातळात खोदलेल्या टाक्या

टाक्यांच्या छताला आधारासाठी असलेला खांब
प्रत्येक टाक्याचं छत खांब वापरून भक्कम ठेवलेला आहे, टाक्या जास्ती खोल नाहीत आणि जवळजवळ कायम भरलेल्या असतात.पण काही नालायक लोंकानी त्यात ब्रेडचे तुकडे, प्लास्टिक बॅग्स, बाटल्या, कागद टाकून पाणी घाण केले आहे. ह्याच सुळक्यावर आग्या मधमाश्यांची मोठाली पोळी आहेत, त्यामूळे येथे जरा जपूनच वागावे, ह्या माश्यांनी अनेकवेळा ट्रेकर्सवर हल्ले केलेले आहेत. जर हल्ले झालेच तर सरळ टाक्यांमधे उड्या मारून बसावे. तसं पूर्ण सुळक्याला प्रदक्षिणा घालता येते, एके ठिकाणि पडका बूरूज आहे, त्याच्यावर कातळावर माणसाच्या चेहऱ्यासारखा आकार तयार झालेला आहे, अर्थात तो लांबून दिसतो, ह्या सुळक्यावर पनवेलच्या निसर्गमित्रा संस्थेच्या सदस्यांनी गिर्यारोहणाच्या उपकरणे वापरून यशस्वि चढाई केलेली आहे. संपूर्ण किल्ला बघायला १ तास व्यवस्थित पूरतो.
अंगठ्यावर असलेला मानवी चेहरा


वरून दिसणारी काही सुंदर द्रुश्ये
प्रितेशने आणलेल्या ब्रेड-ओमलेटवर आम्ही चौघांनी ताव मारला, सुळक्याला १ प्रदक्षिणा मारली आणि आल्या वाटेने घसरत घसरत अर्ध्या तासात खाली आलो, एक ढाब्यावर मस्त चिकनहंडी हाणली आणि आपापल्या घरी सूटलो.

बाकीचे फोटोज येथे पहा:

http://picasaweb.google.com/Vinit.Agnihotri/Karnala?authkey=UqbII0_Kni0

Labels: , , , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

<< Home