Tuesday, October 16, 2012

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड                     "आईची जय....अरे काय मजा केलीये राव ह्या लोकांनी!, मलापण जायचय..." फ़ेसबूकवरच्या उपडेटने मी डोळे फ़ाडून स्क्रीनवर पाहीलं तर कोणीतरी "पावसात नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड" असा अल्बम शे‍अर केलेला दिसला, तब्बल १०८ फोटो होते आणि मी हावरटासारखे १० वेळा ते पाहीले. मागच्या नोव्हेंबरमधे आमचा ह्यावाटेने जाण्याचा प्लॅन सुपरफ़्लॉप झाला होता, त्यामूळे मला तो अल्बम पाहून भयानक जळ-जळ होतं होती. मीपण तो अल्बम शे‍एर केला..म्हटलं "च्यामारी चल सगळ्यांची जळ-जळा हो‍ऊन जाऊ दे". अर्थात भटक्या लोकांची वाईट्ट जळ-जळ झाली, त्याबद्दल त्यांनी मला शिव्यांच्या लाखोल्यापण वाहील्या आणि अचानक अखिलेशचा शे‍अरवरचा रीप्ल्याय वाचला आणि मी ताडकन उडालो, "दादा, तुलापण चान्स आहे, ऑफ़बीट सह्याद्री १५-१६ सप्टेंबरला नळीच्या वाटेने चाल्ले आहेत, मीपण जातोय, चल तुपण", दुसऱ्याक्षणी मी त्याला फोन केला आणि ४ वेळा "नक्की ना...नक्की ना...नळीच्याच वाटेने जाणार ना..." असे विचारले, तो वैतागून "होरे बाबा" म्हणाल्याक्षणी मी फोन ठेवला आणि तात्काळ राजसला फोन केला आणि मी येतोय कीती पैसे भरायचे ते विचारून घेतले. त्याच्यापुढचा फोन दिपक आणि ह्रुशिकेषला केला, दिप्याला जमत नव्हतं, ह्रुश्या लगेच हो म्हणाला, आणि मी लगेच पैसे भरून मोकळा झालो. मयुरेशने हरिश्चंद्रगडाचा एक फोटो टाकून "कोणी जाणार असेल तर मला विचरा असा अपडेट पाहीला, ते पाहून मी त्याला पोस्ट टाकली, त्याचा लगेच मला कॉल आला आणि हा साहेबपण तयार झाला. हा सर्व प्रकार १ सप्टेंबरला झाल्यावर मी आतुरतेने १४ तारखेची वाट पाहत होतो आणि तो दिवस आलाच...मला सकाळपासून चैनच पडत नव्हतं, कधी एकदा बेसला पोचतोय आणि नळीची वाट धरतोय असं मला झालं होतं. ६.३५ च्या ईंद्रायणीने आम्ही तिघांनी पुणे सोडलं आणि एका अविस्मरणीय ट्रेकला सुरुवात झाली.


                         ९:०० वाजता आम्ही कल्याण पोचलो, लगोलग जेवून घेतलं आणि कल्याण बसस्टॉपवर राजसला भेटलो, आमच्यसारखेच अजुन हपापलेली मंडळी तयारच होती. सगळ्यांची हजेरी झाल्यावर रात्री १०:३५ वाजता आम्ही मुरबाडच्या बसमधे बसलो, बसमधेच मग एक-मेकांच्या ओळखी झाल्या सगळेच हाडाचे ट्रेकर असल्याने भिडस्तपणा आणि माज नावाचा प्रकार नव्हताच त्यामूळे थोड्यावेळातच मस्त ग्रूप तयार झाला. अंदाजे पाऊण तासांनी मुरबाडला पोचलो आणि जीप्स वाटच पहात होत्या, आमच्या काही मंडळींना उशीर झाला होता, त्यामूळे ते मागाहून येणार अस्ल्याने आमची एक जीप बेलपाड्याला निघाली, मिट्ट काळोख आणि पाऊस सुरु झाला होत त्यामूळे छान वाटत होते, मुख्य रस्ता सोडून जीप बेलपाड्याच्या रस्त्याला लागली आणि यथावकाश आम्ही बेलपाड्याला पोचलो. लालू म्हणून एका गावकऱ्याकडे उतरायची व्यवस्था केली होती. ट्रेक सकाळी सुरु होणार होता, त्यामूळे लगेचच पब्लीकने मॅटस्‌ सोडल्या आणि पथाऱ्या पसरून मोकळे झाले, झोप लागण शक्यच नव्ह्तं कारण डोळ्यासमोर सारखे तेच फोटो नाचत होते, झोप लागणार इतक्यात आमची दुसरी जीप आली आणि परत सगळे ऊठल, थोडी लोकांची सरकवा सरकवी करून सर्वा लोकांना झोपायला जागा मिळाली. एव्हाना २-३ वाजलेले होते.

कोकणकडा बेलपाडा गावापासून (फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)

                        सकाळी ५.३०च गजर वाजला पण कोणी उठलचं नाही... :), ६.३०लापण बाहेर अंधारच होता, पण तरीही पब्लीक झोपेतून जागी झाली आणि "महत्वाची" कामे करायला बाहेर पडली, मग चहा आणि नाश्ता पोटात ढकलून सगळी मंडळी एक मोठ्ठा गोल करून ओळख परेडसाठी उभी राहीली (राजसच्या भाषेत स्ट्रेट सर्कलमधे :फ) मग यथावकाश सगळ्यांनी ओळख परेड केली आणि विश्वेशने सगल्यांना सुचना दिल्या आणि एकदाचे आम्ही कड्याच्या पायथ्याशी निघालो. तसं तर बेलपाडा हे गाव बरोब्बर कोकणकड्याच्या खाली आहे, पण १-२ दिवसापासून पाऊस सुरु असल्याने धुके होते आणि आम्हाला कणभरही कडा दिसत नव्हता, थोडे हिरमोड झाला होता, पण पर्याय काही नव्हताच सो चले चलो चले चलो म्हणत वाट तुडवणे सुरु केले. पठारावरून सुरु होणारी वाट लवकरच धबधब्याच्या दिशेने जाऊ लागली, पाऊस असल्याने चांगलेच पाणी होते, त्यामूळे ट्रेक सुरु होतो ना होतो तर लगेच पाय गच्च ओले झाले. आजुबाजूच निसर्ग तर वेड लावत होता, खळाळणारं पाणी, हिरवीगार (खरोखर गार) झाडे, मधूनच काही पक्ष्यांचे मंजूळ आवाज, काळे कुळकुळीत दगड, माती म्हणून  कूठे दिसत नव्हती कारण पाणी, दगड आणि झाडे सोडली तर बाकी सर्व जागी मस्त हिरवळ पसरली होती. नळीची वाट ही मुख्यत्वे पाण्याचीच वाट असल्याने पाणी चुकवणे अशक्य होते, हळू हळू सगळेजण ते पाणी एंजॉय करत चालत होते, उन्हाचा काही संबंध नसल्याने कोणालाही थकवा जाणवत नव्हता, फ़क्त प्रत्येकजण थोड्या वेळाने वर काही दिसतय का हेय बघायचा प्रयत्न करत होते.
पठारावरून ट्रेक सुरु झाला.

हिरवे जंगल आणि पाण्याची वाट

पहीला धबधबा...

अजून एक धबधबा

                            मजल दरमजल करत आम्ही सगळ्यांनी पहीला रॉक पॅच पार केला, विश्वेश आणि  अजून १-२ जण आधीच दुसऱ्या रॉक पॅचपाशी पळाले होते कारन त्यांना तिथे रोपस्‌ फ़िक्स करायच्या होत्या. आमच्या आधी तिथे अजून एक ग्रूप गेला होता, आणि त्यांचे पॅच पुर्ण करणे सुरु होते, त्यामूळे आम्हाला थआंबणे भाग होते. मग आम्ही तिथेच खबदाडीत दाटीवाटीने बसलो. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करता यावा म्हणून मग सगळ्यांनी सॅक्स उतरवून बिस्किटे, चिवडा, केक असे कोरडे पदार्थ खायला सुरुवात केली. वरून सतत रिमझिम सुरुच होती.  एकदाचे पहील्या ग्रूपची लोकं वर गेली आणि विश्वेश, विनायकने पॅचचा ताबा घेतला आणि रोपवर्क करून घेतले. तो पॅच म्हणजे एक धबधबाच होता त्यामूळे त्या पाण्यातूनच सग्ळ्यांना चढायचं होतं, घसरत...सरकत एक एक करून पब्लीक चढू लागलं, पावसाचा जोर वाढू लागला होता आणि त्याचबरोबर धबधब्याचे पाणीपण वाढू लागले, आणि मग  पाऊस सुस्साट सुरु झाला आणि धबधबा बदाबदा पडू लागला. सगळ्यांनीच १०-१५ मिनिटे थांबायचा निर्णय घेतला आणि परत आम्ही धो-धो कोसळणाऱ्या पावसात बसून राहीलो. बघता बघता अर्धा तास झाला, आम्हाला वाटू लागला की सालं झालं आता हा पाउस काही थांबायचा नाही आणि आपला पोपट होणार, पण नशीबाने साथ दीली आणि पाउस कमी हो‍ऊ लागला, पाणीपण कमी हो‌ऊ लागले, सुमारे ४५ मिनिटनंतर आम्ही परत चढाईल सुरुवात केली आणि सगळेजण वर आले. आता मत्र पब्लिकमधे जोरदार उत्साह आला होता कारण आता सगळ मनोहारी वाटत होते, थोडे खालचे दृश्य दिसू लागले होते, आम्ही आता खऱ्या अर्थाने नळी चढायला सुरुवात केली होती. दोन्ही बाजूंनी उंच कातळभिंती होत्या आणि प्रत्येक भिंतीवरून असंख्य छोटे छोटे प्रवाह वाहत होते, फ़क्त पाण्याचा आवाज वातवरणात भरून राहीला होता. खालच्या जंगलाचा हिरवा रंग, ओल्या दगडाचा रंग, धुक्याने भरलेला परीसर आणि असंख्य तुषार अंगावर येत होते, मला तर  एक वेगळ्याच दुनीयेत वाटते होते.
पहील्या पॅचकडेपहील्या पॅचपाशी थांबलेले सगळे

हृशिकेष पहीला पॅच करतोय.


पहील्या पॅच नंतर दिसलेली नळी 

दुसऱ्या पॅचकडे वाटचालविश्वेश दुसऱ्या पॅचपाशी..

दुसरा पॅच पुर्ण झाल्यावर

दुसरा पॅच पुर्ण झाल्यावर

तिसरा पॅच

तिसरा पॅच पुर्ण झाल्यावर इथून ट्रॅवर्स सुरु होतो..


                         पण तंद्रीतून जागे होतं आम्ही पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली, दुसऱ्या पॅच नंतरचा पॅच म्हणजे दगडांच्या उंचवट्यावरून चालणे, हा दगड जागोजागी भेगाळलेला होता, एक तर मागे तिव्र उतार आणि त्यात ठिसूळ ओला दगड असं पडायचं पॅकेज पार करायचं होत. जरा जास्त जोर लावला तर दगड सरळ तुटून हातात येत होता, पायाखाली ह्याच दगडाचा भूगा असल्याने त्यात पाय रुतवून चालावे लागत होते, परत तसे करताना काळजी घ्यावी लागत होती की पायातून दगडाचे तुकडे खाली जाऊन चालणार नव्हते. अशी कसरत करत करत आम्ही एकदाचे त्या टप्प्याच्या शेवटी पोचलो. इथे बरचसं पब्लिक चुकतं कारण ह्या टप्प्यावरून उजवीकडे वळावे लागते, पुर्ण वर गेलो तर घसरत परत यावे लागते :) पण आमची अर्धी पब्लिक आधीच पोचली होती त्यामूळे त्यांचा तिसरा पॅच सुरु होता आणि त्यामूळे आमचे चुकणे हुकले :). आम्ही तसेच त्या घसरड्या वाटेवर जशी जागा मिळेल तसे बसलो. अर्धी लोकं वर गेली तशी विश्वेश, राहूल आणि मंडळी पुढे गेली आणि आम्ही उर्वरीत लोकं पॅच चढू लागलो. हा पॅच पुर्ण झाल्यावर आम्ही कोकणकड्याच्या डावीकडच्या अंगाला असलेल्या डोंगराच्या बरोबर बाजूला उभे होतो आधी वाटला हाच कडा पण पोपट झाला :फ, आता सर्वांना कातळभिंत डावीकडे ठेवून उजवीकडे एक ट्रॅव्हर्स करायचा होता, आता जीव कंठाशी आला होता कारण पाय जेमतेम मावेल इतकीच खाच होती, त्यात ती उतरती होती आणि डावीकडे ओला दगड होता आणि खाली खोल दरी, हेय सगळे दिव्य करून आम्ही खऱ्या अर्थाने कोकणकाड्यच्या कातळाला स्पर्श करणार होतो. एकच गोष्ट मस्त होती ती म्हणजे दरी खोल जरी असली तरीही धुक्याने भरलेली असल्याने नक्की कीती खोल आहे हे कळायला मार्ग नव्हता :ड त्यामूळे भीती कमी झाली. मधे एकच झाड आहे, त्या झाडाच्या आतून अलगदपणे एक एक करत आम्ही कड्याच्या बाजूल पोचलो आणि नळीची वाट संपली.

ट्रॅवर्स वरून हे द्रुष्य दिसते (हा फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)

                      सो-फ़ार-सो गूड आता एकदम मस्त वाटत होते कारण अता फ़क्त एकच एक्स्पोसड पॅच राहीला होता की खऱ्या अर्थाने आम्ही निवांत जाऊ शकणार होतो. वाऱ्याने थोडीशी साथ दीली आणि आम्हाला फ़क्त ५-१० सेंकदासाठी कोकणकडा दिसला, बास....ह्यानंतर आम्हाला एकदही कोकणकडा दिसला नाही :). आता आम्ही चौथ्या पॅचपशी उभे होतो, खरंतर ती एक अतिशय चिंचोळी जागा होती. राजस, मी आणि वरूण असे उभे होतो आणि बाकीचे अर्धवट वाटेत उभे होते. मग आदित्यला विचारून राजस पॅचवर चढला, मी त्याला खालून पुश दिला कारण नेम्क एक दगद उंच होता आणि त्यावर हात काही पोचेना. तो वर गेला आणि लगेचचं "ओह..शीट.." आणि एक बऱ्यापैकी मोठ्या दगडासकट गडगडत राजस खाली आला. मी नेमका खाली उभा होतो, माझ्यात कूठून संचारली कोण जाणे पण मी तात्काळ थोडे पूढे झूकून राजस आणि मला स्वत:ला आतल्या बाजूला झोकून दीले, त्या गडबडीत दगड राजसच्या डोक्यात आणि माझ्या कपाळावर आदळला आणि गडगडणे तिथेच थांबले. सगळ्यांची जाम टरकली होती कारण तिथे काहीच जागा नव्हती एक चुकीचा पाऊल आणि माझ्यासकट वरूणपण खाली गेला असता :). राजसला टोपीमूळे फ़ार लागलं नाही पण हलकेसे रक्त आलेच होते. मग विनायक मागून आला आणि तो पॅच चढून बसला, पावसामूळे तिथले मुरुमासारखे दगड खूपच ठिसूळ झाले होते. रोप बांधायला काही चान्सच नव्हता. आता दुसराच नंबर माझा होता :ड नुकताच असा प्रसंग झाल्याने नाही म्हणायला थोडी भीती वाटत होती, पण हिय्या करून मी चढलो, एके ठिकाणी दगड उंच असल्याने लिटरली मी दोन्ही हातानी दगड धरला आणि दुसरी ढांग पलीकडे टाकली, दोन ढांगांमधून मला खाली धुक्याने भरलेली दरी ओझरति दिसली कारण लगेचच मी पुढचा दगड धरून टप्पा पुर्ण केला आणि हुश्य केले. मागोमाग सगळे चढले आणि आम्ही चालायला सुरुवात करून पाचव्या पॅचपाशी आलो.

                         मी पहीले वर आल्याने मला विश्वेशने रोप बांधून वर जायला सांगीतले आणि मगे तो सुद्धा वर आला. त्याने मला रोप ओढायला बसवले आणि विनायकला सुचना देऊन तो राहूल बरोबर सहाव्या पॅचला निघाला. आम्ही एक-एक करून सग्लयांना वर घेतले. हा पॅच म्हणजे एक छोटी कातळभिंत होती आणि शेवाळामूळे पुर्णपणे बुळबुळीत झाली होती, सरकत सरकत सगळे वर आले. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते. पाऊस परत सुरु झाला होता, आम्ही सहाव्या पॅचकडे जायला सुरुवात केली, थोडे जंगल पार केल्यावर एक पाण्याच्या वाटेने परत वर चढायल सुरुवात केली आणि सहाव्या पॅचपाशी एकदाचे पोचलो. आता वारा वाहू लागला होता आणि भरीसभर पाऊस. सकाळपासून ओलेच असल्याने भयानक कूडकूडायल होत होते. चालतना काही वाटत नव्हते मात्र थांबले की भयानक थंडी. ६.४५ पर्यंत आम्ही सगळे सहावा पॅच पुर्ण केला, उरली सुरली बिस्किट, ओला चिवडा चालता चालता आम्ही एकदाचे कड्याच्या डाव्या बाजूच्या पठारावर आलो. शिवाजी महाराजकी जय अशी आरोळी टाकली आणि जवळ जवळ ११ तासांपासून चाललेला यद्न्य पुर्ण झाला. ७ वाजले होते आणि अंधार पडला होता, कोकणकड्यापाशी अजून पोचलो नव्हतो :) पिक्चर बाकी थी, अजून गुहांजवळ पोचायचं होतंच की :). मधे मधे सपाट कातळ लागत होते आणि अंधारामूळे आणि शेवाळामूळे सटा-सटा लोकं सटकत होती. नळीच्या वाटेत कोणीही आपटलं नाही पणा इथे सपाट कातळावर फ़ूल्ल स्लायडींग सुरु होतं, भरीस भर वारं अक्षरश: ढकलत होतं. मग बॅटरीच्या उजेडात बाणा शोधणं सुरु झालं, धुक्यामूळे बॅटरीचा प्रकाश जेमतेम खाली पोचत होता, वाट एकदाची मिळाली आणि आम्ही परत एकदा मार्गस्थ झालो. त्या धुक्यामधे लपटलेल्या अंधारात वाट शोधणे म्हणजे दिव्यच होते, पण मग आमची अर्धी टीम आधीच पोचल्याने त्यांनी गोविंद मामांना आम्हाला आणायला पाठवले होते. ते अर्ध्या वाटेत आम्हाला भेटले, मजा म्हणजे ते बिना बॅटरीचे चालत होते :) हे पाहून भयानक लाज वाटली. शेवटी थोडे सरकत-घसरत आम्ही एकदाचे गुहेपाशी पोचलो.

                     परत एकदा शिवाजी महाराजकी जय असा नारा घुमला.जवळ-जवळ १२ तासांनी आम्ही आमच्या मुक्कामी पोचलो होतो, एक अवघड ट्रेक आम्ही अधिक अवघड मोसमात केला होता. भरीसभर पावसाने चांगलेच सतवून तो अजून अवघड केला होता. पण सगळ्यांनी ट्रेक पुर्ण करून स्वत:साठी एक मानाची जागा तयार केली ह्यात काही वादच नाही. ऑफ़बीटच्या सर्व सदस्यांनी सगळ्यांना अगदी व्यवस्थित सही-सलामत सगळ्यांना वर आणलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानवे तितके कमीच आहेत.
गुहेत अर्धा पब्लिक निवांत कोरडं हो‍ऊन बसलं होतं. आम्हीपण फ़टाफ़ट कोरडे झालो आणि दुपारचे जेवण बाहेर काढले. एक प्रचंड मोठी अंगत-पंगत करून आम्ही दुपरचे जेवन रात्री ८ ला संपवले. सगळं आवरून निवांत बसलो होतो, काही लोकं तेव्हद्यात एक डूलकी मारत होते. यथावकाश गरमा-गरम खिचडीवर सगळे तुटून पडले आणि ते झाल्याबरोब्बर गाणी-बीणी न म्हणता तात्काळ झोपी गेले. गप्पा मारायचा स्कोपच नव्हता कारणा त्याला सरळ गुहेबाहेरच उभे केले असते :फ कधी नव्हे ते मला पण झोप लागली, मधे मधे सारखे आपले पाय पाण्यातच आहेत असे वाटत होते. १० वाजता जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी ७ ला डोळे उघडले. पिठलं-भाकरीचा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागलो.
आम्ही सगळे...

            खिरेश्वरमार्गे खाली उतरलो, मस्त गरमा-गरम पिठलं, भात, आमटी खाऊन कल्याणला पोचलो. आमची परतीची ट्रेन हुकली होती आणि गणपतीमुळे जनरल डब्यात जागा मिळने मुश्कील होती त्यामूळे आम्ही बसनी जायचे ठरवले. कल्याणहून पुण्याला जाणारी शेवटची गाडी पकडून आम्ही उभे राहीलो. जशी गाडी पुढे गेली तशी खाली फ़तकल मारली आणि पहाटे ३ ला आम्ही एकदाचे पुण्याल पोचलो.

हिवाळ्यात परत एकदा नळीच्यावाटेने जायचचं आणि कोकणकडा पहायचाच अस्स निर्धार करून अश्याप्रकारे एक सुंदर आणि अविस्वमरणीय ट्रेक संपला होता.

उर्वरीत फोटो आणि काही व्हिडीओ येथे पहावेत:

पहीला रॉकपॅच झाल्यावर

ट्रॅव्हर्स सुरु करण्याअगोदर

Labels: , , , , , ,

Saturday, November 13, 2010

राजगड ते तोरणा

आम्ही सॅक उतरवून टॉर्च बाहेर काढले आणि बऱ्याच वर्षांपासून पेडींग असलेल्या आणि ४-५ वेळा कॅन्सल झालेल्या ट्रेकला एकदाची सुरुवात झाली. ट्रेकींगची सुरुवात केल्यापासून आम्ही राजगड आणि तोरणा ह्या मात्तब्बर किल्ल्यांची नावे ऐकून होतोच पण त्याचबरोबर राजगड ते तोरणा ह्या ट्रेकबद्दलपण खूप ऐकून होतो. राजगडाच्या संजीवनीमाची पासून सूरू होणाऱ्या डोंगराच्या, माथ्यावरून तोरणाच्या बुधलामाची पर्यंत जाणारी पायवाट म्हणजेच हा ट्रेक होय. अर्थात नुसती पायवाट तुडवायची असे नव्हे तर आधी राजगड किंवा तोरणा पुर्ण चढायचा आणि मग ती पायवाट तुडवून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत पोहचयचे आणि मग तो किल्ला खाली उतरायचा असा भरगच्च कार्यक्रम असतो. डोंगराच्या माथावरून जाणारी पायवाट सोप्पी वाटत असली तरीही पुर्ण उन्हातून आणि बोडक्या डोंगरमाथ्यावरून चालताना हीच पायवाट भल्याभल्यांची वाट लावते :) असो तर असा हा राजगड-तोरणा ट्रेक आम्हा सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच वर्षांपासून घोळत होता, घोळत कसला चांगल मुरला होता. अर्थात नेहेमीप्रमाणे आम्ही ह्या ट्रेकसाठी अनेकवेळा प्लॅन केले परंतु सगळे हवेत विरून गेले, कधी लोकं कमी होती तर कधी आयत्या वेळेस काही अडचणी इत्यादी कारणांनी जमत नव्हतं. शेवटी मात्र सगळ्यांनी "बासच....आता काहीही झालं तरी ह्या सिझनमधे राजगड-तोरणा करायचाच.." असा विडा उचलला आणि प्लॅनिंग सुरु झाले. मेलिंगथ्रेड सुरु झाली आणि २०-२५ रिप्ल्याय पडले आनि त्या आठवड्यात प्लॅन कॅन्सल झाला :ड नचिकेत, अम्याला आणि मक्याला त्या वीकमधे जमत नव्हत, पण मग लगेचच सेम प्लॅन लगेचच पुढच्या वीकमधे नेला आणि "२ लोकं तर २ पण ट्रेकला जायचचं" अशी भिष्मप्रतिद्न्या करून मेलथ्रेड बंद केली.

मक्याने त्याची रिझर्व केली आणि शनीवारी सकाळी पुण्याला पोचतो कॉल केला, नच्या ऐनवेळी आजारी पडला तर अम्याला घरच्यांनी धमकावून घरीच माल वाह्तूकीसाठी पार्क करून ठेवला :D. त्यामूळे मी, मक्या, ॠशिकेष (पुढे ॠश्या असा उल्लेख असेल) आणि अर्थात नवीन लग्न झालेले असूनही (म्हणजेच सगळी रिस्क पत्करून) नाशिक, असे ४ जण ट्रेकसाठी जमलो. तसं आम्हाला एक खाज होती की "रात्री अथवा अंधारात राजगड चढणे" मग आम्ही विचार केला की हा प्लॅनपणा बऱ्याच वर्षांपासून रेंगाळतो आहे तर हापण इथेच उरकावा, त्यामूळे आमचा प्लॅन असा होता की...
साधारण २-३ वाजता पुण्यातून बाईक्सवरून निघायचे आणि नसरापूर=वेल्हा रस्तायावरील "खरीव" गावापाशी गाड्या सोडायच्या आणि तिथून चालत "पाल" गावापाशी पोचायचे. मग तिथून राजगड चढायचा आणि रात्री पद्मावती मंदिरात मुक्काम ठोकायचा. सगळ्यांचा राजगड पाहून झालेला असल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तोरणाकडे कूच करणे. शक्य तेव्हडं कमी सामान न्यायचं असल्याने आम्ही स्टोव ड्रॉप केला कारण स्टोव आम्हाला फ़क्त रात्री जेवणासाठी लागणार होता, दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे होते म्हणून नाश्ता, चहा इत्यादी काही करायचे न्वहते म्हणून मग स्टोव नेला नाही आणि तसेही पायवाटेवर थांबून स्टोव जोडून नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवण्यात कोणी उत्सुक नव्हते आणि काही अर्थपण नव्हता कारण खरं सांगायचं तर आम्हाला ऊन जास्त चढायच्या आत तोरणा गाठायचा होता ना...बाकी सामानपण जुजबीच होते, २ लिटर पाणी, रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण सगळं पॅक करून घेतले, आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे ग्लुकॉन-डी (ऑरेंज फ़्लेवर :) ) पण आठवणीने घेतले होते (लाइफ़लाईनच म्हणा ना...).

ठरल्याप्रमाणे २-३ला आम्ही सिंहगड फ़्ल्यायओव्हरच्याइथे जमलो आणि नसरापूरची वाट पकडली, नसरापूर मगे सोडून ५-६ कीमी नंतर राजगडाचे दर्शन झाले. १-२ जणांना विचारून खरीव गावापाशी पोचलो आणि तिथे एका भल्या गावकऱ्याच्या अंगणात गाड्या उभ्या केल्या. सगळ्यानीं टोप्या गॉगल, कॅमेरा अशी आयुध काढून चालायची सज्जता केली. एव्हाना ५-५.३० वाजले होते आणि सुर्याने आपली हीट कमी केलेली होती. संदीपने विकीमॅपियावरून हा रस्ता पाहीलेला होता आणि हा रस्ता जवळ-जवळ ७-८ कीमी होता. आम्ही चालायला सुरुवात केली, शेतकऱ्यांची थोडीफ़ार कामे सुरु होती, वातावरणात शेणाचा मस्त वास पसरला होता :) तसंच गवत थोडे ओलसर झाल्याने त्याचा एक टिपीकल सुंगध हवेत पसरला होता. आम्ही गप्पा-टप्पा करत करत चालत चालत पालखिंडच्या वरच्या भागात पोचलो आणि समोरच भव्य राजगड आणि संजीवनी माची आणि तोरण्याला जाणारा रस्ता दिसू लागला, मग लगेच थोडे फ़ोटोसेशन झाले आणि चालणे सुरु राहीले. सुरतेवरच्या स्वारीवर जाताना महाराज ह्याच खिंडीतून गेले होते कळाल्यावर अचानक वातावरण भारल्यासारखे वाटले, महाराज इथूनच गेले आणि आपण ह्याच राजमार्गाने चालतोय असे समझल्यावर धन्य वाटू लागले.
राजगड
थोडे पुढे गेल्यावर एक मोकळे पठार आणि एक सुंदर दृश्य आमची वाट बघत होते. सुर्यनारायण निरोप घ्यायच्या तयारीत होते आणि त्यांनी नारींगी आणि सोनेरी रंगाची उधळण सुरु केली होती आणि सर्व आसमंतात तो रंग पसरला होता, राजगडतर एक्दम उच्च दिसत होता. इथून राजगड-तोरणा मार्ग अगदी पुर्ण दिसत होता. सुर्यनारायण तोरण्यामागेच लपायला जात असल्याने तोरण्याभोवती मस्ता रंग दिसत होते, तोरणा जणूकाही तेजाने झळकत होता, मग तिथे थोडे फ़ोटोसेशन केले आणि ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवत आम्ही परत चालायला सुरुवात केली आणि वाजेघरला पोचलो.
तोरणा
राजगड ते तोरणा मार्ग
एव्हाना अंधार सुरु झालेला होता आणि गवताचा सुंगध सगळीकडे भरून राहीला होता, साप-बीप नको म्हणून मग माही रस्त्याच्या मधून चालायला सुरुवात केली. मुळात ह्या रस्त्यावर वाहतूक कमीच आणि त्यात अंधार असल्याने वाहतूकीचा संबंध नव्हता. राजगडावरील दिवे दिसू लागले होते आणि पाल गाव जवळजवळ येत होते. एव्हढ्यात आम्हाला एक दुधाचा टेंपो आमच्या मागून येताना दिसला आणि आम्हाला पाहील्यावर तो थांबला, आणि त्यांना पाल गावात सोडणार का असे विचारले आणि लगेचच आम्ही मागे चढून उभे राहीलो :). टेंपो भरधाव निघाला आनि पुढच्या ५ मिनीटसमधे आम्ही पाल गावात पोचलो. नशीब टेंपो मिळाला नाहीतर आम्हाला अजून अर्धा तास तरी चालावे लाग्ले असते.

एव्हाना ६.३० वाजले होते आनि अंधाराचे साम्राज्य पसरले होते, तिथे उतरल्यावर कळाले की हा टेंपो इथून जाणारे अथवा इथे येणारे शेवटचे वाहन होते :) आम्ही देउ केलेले पैसे टेंपोचालकाने हसत-हसत नाकारले आणि पोरांनो सांभाळून जा असे म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि एक दिर्घ श्वास घेऊन "फ़ायनली..." असे म्हणून चालायला सुरुवात केली. सुरुवातीला टॉर्च न वापरता आम्ही चालत होतो, पण चढायला सुरु केल्यावर जशी झाडी दाट झाली तसे आम्ही टॉर्च ऑन केले आणि रस्ता कापू लागलो. काही अंतरावर सौरदीवे बसवलेले आहेत, तिथे थोडे थांबत होतो. दाट झाडी संपली आणि आम्ही पायऱ्यांपर्यंत पोचलो. अर्थात सगळ्यांनी नेहेमीप्रमाणे "च्यायला आपण घरी बसायचं सोडून कायम कडमडायला का येतो" असा नेहेमीचा प्रश्न एकमेकांना विचारून हसून घेतले. आकाश स्वच्छ होते, सौरदिव्यांचा मंद प्रकाश खाली दिसत होता, वरती आकाश चांदण्यांनी भरले होते. मंद वारा वाहत होता आणि वातावरणात शांतता पसरलेली होती आणि ह्या सगळ्या वातावरणाने आमच्या चित्तवृत्ती प्रसन्न होत होत्या. थोडावेळ तो सुंदर अनुभव घेत आम्ही तिथेच उभे राहीलो आणि मग परत "चला!!!" अस म्हणून पायऱ्या चढायला सुरुवात केली. एका वळणावरून राजगडाचे काळेकभिन्न राक्षसी दगड आणि बुरुज दिसू लागले, मनोमन असे वाटले की पुर्वीच्या काळी कसले भारी वाटत असेल. आणि आम्ही पायऱ्या संपवून राजगडाच्या बुरुजाखाली आलो. तो काळा दगडी बुरुज अंधारात वेगळाच आणि गुढ वाटत होता. एकुणच राजग्ड त्या अंधारात गुढ वाटत होता. माहीत नाही पण मला तो गुढपणा खूपच आवडला, कोणीच बोलत नव्हते बहुतेक सर्वजण तो गुढपणा आपल्या मनात साठवून त्याचा आनंद घेत होते. तिथून मग पाल दरवाजा गाठला, शिवरायांचा उद्घोष केल्यावर सर्वांना स्फुरण चढले आणि त्याचा आवेशात आम्ही पद्मावती मंदिरात घुसलो. आधी पर्यटक निवासात पाहीले तर लोकं सिगारेटी पेटवून आनि हातात डफ़ वगैरे घेउन बसलेले दिसले, म्हणजे हे लोकं रात्रभर दंगा करणार हे वेळीच लक्षात आल्याने आम्ही मंदिरातच रहायचा निर्णय घेतला.

आता आल्याक्षणी पहीले देवीचे दर्शन घेतले आणि तसेच जमीनीवर फ़तकल मारून बसलो. गर्दी फ़ारशी नव्हती त्यामूळे आम्हाला जागा चांगली मिळाली. आमच्या आधी आलेल्या लोकांची जेवण बनवायची लगबग सुरु होती, चुलीच्या धुरांचे वास पसरले होते, मधूनच रटरटत्या खिचडीचा वास येत होता. "अरे यारा फ़ार काही गार नाहीये" इती मक्या बोलत होता, मे बाहेर हात धुवायल गेलो होतो आणि मक्याचे वाक्य मला ऐकू आले. त्याला म्हटल हो...का!!! ये न जरा बाहेर अस म्हणालो. तो बाहेर आला आणि त्याचे पाय कापू लागले, कारण बाहेर प्रचंड थंड आणि वेगवान वारे वाहत होते. म्हणजे गारठा होताच पन वेगवान वाऱ्यांमुळे तिथे उभे राहणेपण मुश्कील झाले होते, "च्यायला फ़ाटली माझी" असं म्हणत मक्या आत पळाला आणि मग आम्ही हसत सगळेच आत आलो. बाजूलाच २-३ मुले कण्हत पडली होती, त्यांना विचारलं तर म्हणाले "अरे जस्ट तोरण्यावरून आलोय, कीती चाललो आणि का हेच कळत नाहीये, पाय जाणवत नाहीयेत" असं म्हणून परत पडून राहीला :) आम्ही सगळ्यांनी आता उद्या आपली पाळी असं म्हणत स्मितहास्य केलं. सॅक्स मधून डबे काढले, अनुष्काने झक्कास रस्सा बनवून दिला होताच, त्यावर मस्त ताव मारला. अनुष्काला असे वातावरण खूप आवडते अशी आठवण काढत जेवण उरकले आणि जरा तंगळमंगळ करत झोपलो. झोप काही लागत नव्हती ’नवीन जागा होती ना....’ आणि पातळ चादरीमधून थंडी जाणावत होती...बाहेरचं वारं वाढल्याचं जाणवत होतचं आणि चांगलाच आवाज येत होता.

सकाळी ६ चा गजर झाला आणि मी कॅरीमॅटवरूनच पडल्या पडल्या वाऱ्याचा आणि बाहेरच्या थंडीचा अंदाज घेतला आणि "आत्ता बाहेर निघालो तर भयानक त्रास होईल" हे जाणवल्याने मी आणि नाशिक गप पडून राहीलो, मक्या आणि ॠश्यानेपण तेच केले :ड. ७ वाजता मात्र आम्ही उठलो, एका खेडूताला चहा बनवायला संगितला म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते ना :ड, दात घासले आणि समोरून रंग उधळत येणाऱ्या सुर्यनारायणाला अभिवादन करत त्याची रंग‍उधळण कॅमेरामधे बंदिस्त.

सकाळच्या वेळची काही दृश्येएव्हाना वारे जरा कमी झाले होते पण थंडी जाणवत होती, नुस्ता ब्रश तोंडात धरला होता, दात कापत असल्याने ब्रशने घासायची काहीच गरज नव्हती :) मग चहा घेतला आणि सॅक पॅक करून संजीवनीमाचीच्या वाटेवर निघालो. मधेच ढालकाठीपाशी आम्ही चौघे आणि मागे तोरणा असा फोटो उडवून एकदा सर्वा वाट पाहून घेतली आणि "च्यायला लई चालयचय" अस म्हणून निघालो.
ऋश्या, मक्या, मी आणि नाशिक आणि मागे तोरणातोरण्याला जायचा मार्ग

तोरणा
अगदी पार संजीवनीमाचीच्या टोकापाशी पोचलो पण खाली उतरायला वाट काही दिसेना. म्हणजे सर्व पायवाट अगदी व्यवस्थित दिसत होती पण त्या पायवाटेपर्यंत पोचायची पायवाट काही दिसत नव्हती आता आलीका पंचाईत! आमच्या आधी निघालेला एक ग्रूपसुद्धा त्याचा मनस्थितीमधे होता, मग आम्ही सर्व मिळून रस्ता शोधू लागलो आणि तेव्हढ्यात मला एक खेडूत एका बाजूने चढत असलेला दिसला. ऋश्याने त्याला विचारले आणि त्याने असे कसे तुम्ही शहरी लोक आंधळे आशी चेष्टा करत दरवाजा दाखवला. अगदी १०-१५ मिनिट्सपुर्वी आम्ही सगळे त्याच दरवाज्याच्या बाजूने गेलो होतो अर्थात दरवाजा थोडा आतल्या बाजूने असल्याने लक्षच गेले नाही :) दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य आणि हुशारी लगेच कळून आली. हसत-हसत आम्ही खालची वाट पकडली. संजीवनीमाचीच्या खाली पोचल्याव्र राजगडाची कधीही न पाहीलेली बाजू दिसून आली, ती भव्य आणि मजबूत तटबंदी छातीवर येऊ लागली, काय हिम्मत आहे कोणाची गड काबीज करायची..ही तटबंदी जिंकायची म्हणजे केवळ अशक्यप्रायचं, त्यात परत तटबंदीच्या आतील बाजूने सैन्याचे लपलेले खंदक म्हणजे स्वत:चे मरण ओढवून घेणे निश्चित होते.
संजीवनी माची आणि राजगडाची आजवर न पाहीलेली बाजूह्या सगळ्या नाटकात ८.३० वाजले होते, मग आम्हे जरा स्पीड पकडून चालायला सुरुवात केली, अजूनही गारवा टिकून असलेल्या उन काही फ़ारसे जाणवत नव्हते, पायवाट चांगलीच मळलेली होती आणि साधारण चढ-उतार असल्याने आम्ही व्यवस्थित चाललो होतो. मक्याच्या गुढग्याने कालपासूनच रंग दाखवायला सुरुवात केली होती त्यामूळे त्याची गाडी जरा हळू हळू होती. साधारण तासाभराने आम्ही एक डांबरी रस्ता पार करून एका घरापाशी पोचलो. तिथेच नाश्ता केला, ब्रेड आणला होता पण त्यापेक्षा फळे आणि अंडी खाणे जास्त सोयीच होतं. मग त्या घरातून थोडे ताक पण घेतले आणि ५-१० मिनिटे बसून परत चालायला सुरुवात केली.

ऊन एव्हाना चढायला सुरुवात झाली होती पण अजून फ़ारसे गरम होत नव्हते. साधारण तासाभराने तोरणा आहे तिथेच दिसत होता :ड तरीही आम्ही चालत राहीलो आणि एका सपाटीला उतरलो, आम्हाला वाटलं की नेहेमीप्रमाणे वाट चुकलेलो दिसतोय :) तर तिथे एक घर दिसले, मग त्यांना वाट विचारून घेतली थोडं ताक घेतलं. त्यांनीच सांगितलं की तुम्ही रस्ता चुकलेला नाहीत, "आता हिथून असं जायच" आनि हवेत हात फ़िरवल :फ आम्हाला एक ग्रूप वरून जाताना दिसला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून परत मार्गस्थ झालो, पण आम्ही इतकं करूनही चुकीची वाट पकडलीच :ड आम्ही फ़ार भरकटलो नाही पण एक गुरांच्या वाटेवरून चालत राहीलो, साधारण अर्धा तास चालूनही आम्हाला त्या डोंगरावर चढणारी वाट दिसत नव्हती. मग आम्ही आता कुठूनही चढू पण त्या डोंगरावर पोचायचचं असं ठरवून प्रयत्न सुरु केले, तेव्हढ्यात ऋश्याला एक घर दिसलं मग त्यांना विचारल्यावर असं समझलं की आम्ही थोडे भरकटलो आहोत, पण त्यांच्या इथूनच दुसर रस्ता आहे आणि ते त्याच रस्त्याने तोरण्याला ताक विकायला जातात असं समजलं. मग त्या मावशींनी आम्हाला त्या डोंगरमाथ्यावर सोडलं. आम्ही मेन रस्त्याच्या समांतर चालत होतो पण फ़क्त खालून वरून नव्हे. पण आम्ही हुश्श...केलं कारण परत एक्दा तोरणा समोर दिसू लागला आणि दुरुन बुधला माचीचा बुरुज आनि दरवजा दिसू लागला. त्या मावशींनी आम्हाला त्यांच्याकडचे पाणी पण दीले आणि आम्ही परत चालायला सुरुवात केली.
बुधला माचीजवळून मागे दिसणारा राजगड आणि पार केलेले अंतर
अभेद्य आणि दुर्गम बुधला माची
कामगिरी फ़त्ते...ऋश्या, मी, मक्या आणि नाशिक, मागे राजगड (बुधला माचीवरून)

बुधला

संपुर्ण तोरणा
साधारण १ वाजता आम्ही बुधला माचील पोचलो. मग तिकडच्या शिडीवर भरपूर फोटो काढले आणि मग आम्ही चौघे आणि मागे राजगड असा फोटो काढला. आमचा विश्वासच बसत नव्हता की आपण इतकं अंतर चालून आलो :) माचीवरून किल्ल्यावर जायला तब्बल एक तास लागला कारण आता उन्हाने आम्हाला भाजायला सुरुवात केली होती आणि सगळे दमलेपण होते.


तोरण्याला कोकण दरवाज्यामधे पोचून फ़ोटोसेशन केले तिथेच जास्त साखरवालं लिंबूसरबत घेतले आणि पुढचा थांबा एकदम मेंगाई देवीच्या मंदिरापाशीच घेतला. तिथे पहीले बूट काढून फ़ेकून दिले आणि निवांतपणे बसलो. सावलीत चांगलेच गार वाटत होते तर उन्हात गरम, त्यामूळे उन्हात बसावं की सावलीत हेच कळतं नव्हतं :) मग तिथेच उरलेल्या खाण्यावर ताव मारला. जरा वेळ आराम केला, गप्पा-टप्पा सुरु होत्याच. तिथे असं समजलं की शेवटची बस वेल्ह्यावरून ५ ला असते आनि त्यानंतर तुम्ही फ़क्त जीपवाल्यांच्या दयेवर परत जाऊ शकता :) मग आम्ही ३.३० ल उतरायला सुरुवात केली. एव्हाना मक्याचे दुखणे बरेच वाढले होते, ॠश्याच्या गुढग्यानीपण थोडा दगा दिला होता. त्यामूळे आम्ही जरा निवांतपणे उतरत होतो. उतरायला ५.४५ ते ६ झाले आणि बस निघून गेल्याचे कळाले, गावात लाईट गेलेले होते आणि अंधार झालेला होता. आमच्या बरोबर संजीवनीमचीवर भेटलेला ग्रूप तोरण्यापासून होताच, थोड्या विनवण्या करून एक जीपवला ५०० रु. मधे नसरापूर फ़ाट्यावर सोडायला तयार झाला. तसं पाहता "खरीव" वेल्ह्यापासून फ़क्त ७ कीमी वर होते पण त्यासाठी आम्हाला २५रु. प्रत्येकी मोजायला लागले. तो ग्रूप फ़ाट्यावरून बस पकडून पुण्याला जाणार होता. आम्ही आमच्या गाड्या काढल्या, प्रेमाने त्या गावकऱ्याने चहाचा आग्रह केला पण उशीर झाल्याने आम्ही निघायचा निर्णय घेतला कारण आम्हाला अजून ३५-४०कीमी बाईकने जायचे होते. आम्ही पार्किंगचे देऊ केलेले ५० रु. "काय राव हे म्हणजे मला लाच घेतल्यासारखं वाट्टय" असं म्हणून ते नाकारत होते पण आम्ही बळेबळे दिवाळीची भेट म्हणून ठेवा असे सांगत त्यांना ते पैसे घेण्यास भाग पाडले. गारवा वाढल्याने एकावर एक शर्ट घालून आम्ही निघालो. वाटेत मस्त अंधार, गार वारा आणि आमच्या ३ बाईक्स असा प्रवास सुरु होत. नटराजमधे पोटभर खाल्लं, आणि मग घरी पोचलो. घरी आल्या आल्या मस्त डेटॉल टाकून अंघोळ केली आणि ट्रेक्सच्या आठवणीमधे गाढ झोपून गेलो.

ज्यांना राजगड-तोरणा करायचा आहे त्यांच्यासाठी:
१.पुण्याहून गुंजवणे अथवा वाजेघर बस पकडून राजगड करावा. बाईक असेल तर खरीव गावात गाड्या सोडाव्यात.
२.राजगड करावा आणि रात्री तिथेच रहावे.
३.दुसऱ्या दिवशी संजीवनी माचीमार्गे तोरणाला जावे.
४.तोरणा उतरून वेल्हा गावात यावे, तिथून उतरुन पुण्याची बस अथवा नसरापूर फ़ाट्याची जीप घ्यावी.

काही महत्वाचे:
१.निदान २ लिटर पाणी राज्गद ते तोरणा वाटेत असावे. वाटेत अजिबात पाणी उपलब्ध नाही.
२.खायचे जरूर बरोबर घ्या अंगात शक्तीच नसेलतर काहीच करता येणार नाही.
३. टोपी अथवा डोक्यावर रुमाल अतिशय महत्वाचा आहे.
४.सर्व पायवाट ठळक आहे, आणि तोरणा नेहमी तुमच्या उजव्या हाताला दिसत राहीला पाहीजे हेय लक्षात ठेवावे. बुधल्याकडे सतत लक्ष ठेवणे म्हणजे चुकायला होणार नाही. आणि मुख्य म्हणजे सगळी वाट डोंगरमाथ्यावरूनच जाते.
५. तुमच्या ट्रेकला शुभेच्छा :)

बाकीचे फोटोज येथे पहावे....

Labels: , , , , , , , , ,

Friday, February 12, 2010

रायरेश्वर कॅपिंग

नच्याला सांगितलेल्या तंबूचे भारतात आगमन झाले होते आणि तो तंबू आमच्या माळ्यावरून आता मला वाकूल्या दाखवत होता. तेव्हा तंबूला बाहेरचा रस्ता दाखवावा असा विचार मनात रेंगाळत होताच. अम्या आणि नाशिक समोर हा विचार बोलुन दाखवताच.."चला पुढच्याच शनीवारी....." अशी आरोळी कॅफ़े गूडलकमधे घुमली. मग लगेचच मक्याला कॉल केला आणि तोपण लगेच येतो असं म्हणाला. सामानाची यादी तयार झाली, कोणी काय-काय घ्यायचं ठरलं आणि मग शनीवार येण्याची वाट पाहू लागलो. सर्वानूमते रायरेश्वरच्या पठारावर मुक्काम करावे असं ठरलं, तंबूमधे रहायची पहीलीच वेळ असल्याने आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो आणि त्यामूळे - दिवसांवर असलेला शनीवार आम्हाला फ़ार लांबचा वाटू लागला होता.

शेवटी शनीवार आला, मक्या प्रगतीने शिवाजीनगरला वाजता अवतरला, मी त्याला पिकअप केले आणि आम्ही माझ्या घरी गेलो, घरी जाता-जाता भरपेट नाश्ता केला. घरी जाऊन सॅक पॅक केल्या. रायरेश्वर तासांवर होते आणि पायऱ्यांपर्यंत बाईक्स जात असल्याने आम्ही - ला निघायचे ठरवले होते, त्यामूळे तसे निवांत होतो. .३० ला अम्या आणि नाशिकचा कॉल आला आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. ट्रेक करायचा नव्हता त्यामूळे दमायचा काही प्रश्न नव्हता त्यामूळे तसे सगळे खूश होते :) सिंहगडरोडच्या कात्रज बायपासच्या इथे सगळे भेटलो आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. बाईक्स भन्नाट स्पीडने पळवत आम्ही हायवेवरून जात होतो,मग भोर फ़ाट्याला वळालो, भोरला पोचून मग रायरी गावाचा रस्ता विचारून घेतल. भोर ते रायरी रस्ता तसा छान आहे, छोटा आहे, पण दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते होती त्यामूळे मस्त वाटत होते. दुरवर रोहिडा किल्ला दिसत होता, रस्ता विचारत विचारत आम्ही रायरी ह्या पायथ्याच्या गावी पोचलो. तिथेच एका हातपंपावर सोबत आणलेल्या मोठ्या वॉटरबॅगमधे पाणी भरून घेतले कारण आम्हाला तंबूमधे तेच वापरायचे होते ना...मग तिथेच एका गावकऱ्याकडून पुढचा रस्ता विचारून घेतला.

रस्ता कसला!!! ट्रकच्या टायरमूळे माती दबली जाऊन पायवाटेसारखं काहीतरी होता, सोबतीला भरपूर छोटे दगड-धोंडेपण होते. रायरी गावातून वाईला उतरणारा रस्त्याचे काम सुरु होते, आणि ते सुद्धा अगदी पहील्या टप्प्यात होते, फ़क्त तात्पुरता ट्रक जाईल अशी जागा मोकळी केलेली होती, आणि पावसाळी मोऱ्या बांधून झाल्या होत्या. रस्त्याच्या कडेला भरपूर दगड आणून टाकले होते, काही ठिकाणी मजूर दगडी फोडायचे काम करत होते. हा रस्ता बराच फ़िरत फ़िरत जातो आणि मुळात रस्ता फ़क्त नावालाच असल्याने हायवेवर ९० ने पळणारी बाईक इथे १० च्या स्पीडलासुद्धा स्पर्श करत नव्हती. बाईक आणि आमचे सांधे खिळखिळीत होण्याची वेळ आली होती, खूप वेळ झाली तरीही रायरेश्वराचा डोंगर काही दिसत नव्हता, त्यामूळे "आयला रस्ता चुकलो का काय??" असेही मनात येउन गेले पणा दुसरा रस्ता तसाही नसल्याने आम्ही बाईक्स पुढे डामतट होतो. शेवटी जरा वेळाने एका सपाटीवरून परिचित असे रेलिंग आणि पायऱ्या दिसु लागल्या आणि आम्ही हुश्श केले. वाटेत - घरे आणि थोडी शेतीपण दिसली : तसेच एक पाईपपण रस्त्याच्या बाजूने जात होता. शेवटी आम्ही एक वळणावर पोचलो, तेथुन उतरणारा रस्ता सातारा जिल्ह्यात उतरत होता आणि रायरेश्वराचे पठार डावीकडे होते.

पायऱ्या आणि आमच्यामधे जेमेतेम १००-२०० मिटरचे अंतर राहीले होते पण त्या पायऱ्यांपर्यंत जायला रस्ताच नव्हता :) तर मधे एक उंचवटा होता आणि त्यावरून बाईक जाउ शकेल ह्याची शाश्वती नव्हती. उंचवटयावर दगड होते आणि मुरुम होता त्यामुळे तिथे चालतानाच सरकायला होत होतं. परंतु रात्री अश्या वैराण ठिकाणी बाईकला एकटीला सोडून जाणे काही पटत नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करून बाईक चढवून पाहू असे सर्वानुमते ठरले. मग मी माझ्या बाईकवर स्वार झालो, मक्या दगड घेउन बाईकमागे उभा राहीला, अम्या तितक्यात "अरे थांबा विडियो काढू.." असे म्हणत कॅमेरा दगडावर सेट करून बाईकच्या मागे राहीला आणि नाशिक लेगगार्डपाशी उभा राहीला. जय बजरंगबली असा गजर करून मी फ़र्स्ट गिअर टाकला आणि हळूहळू क्लच सोडू लागलो, मक्याने दगड मागच्या चाकामागे ठेवल्याने त्या दगडाला रेटा देउन बाईक पुढे सरकली. पुढुन नाशिकने लेग-गार्ड धरलेले होते आणि मागून अम्या बाईकला धरून उभा होता. दगड चुकवत, मुरुमावरून थोडे सरकत शेवटी माझ्या बाईकला वर नेण्यात यश आले आणि आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोष केला :) परंतु दुसरी बाईक चढवण्याआधी मी पायऱ्यापर्यंत व्यवस्थित पोचता येइल हे बघण्यासाठी बाईकने पायऱ्यांना स्पर्श करून आलो. मग परत कसरत करत नाशिकची बाईकसुद्धा वर आणली.
तंबूची बेस्ट जागा...
पायऱ्यांपासून रायरेश्वराचे पठार चढून जाऊन १००-२०० मिटरवर असेल. पायऱ्यांच्या इथेच तंबूसाठी अगदी मस्त जागा होती, एक छान झाड होते आणि त्याभोवती मस्त मोकळी जागा होती. तरीही वर चांगली जागा बघण्यासाठी मक्या आणि नाशिक पायऱ्या चढून गेले आणि मी, अम्या लाकडे गोळा करायच्या महत्वाच्या कामगिरीवर लागलो. एव्हड्यात माझे लक्ष मागे गेले आणि मे ओरडलो "आइला........", अमितपण मागे वळून ओरडला आनि आम्ही दोघांनी कॅमेरे काढून निरोप देणाऱ्या सुर्यनारायणाचे आणि त्यांच्या चित्रकलेचे फोटो काढू लागलो, नाशिकने पण पायऱ्यावरून ते पाहीले आणि आम्हाला शेलक्या शिव्या हासडत त्यानेपण - फोटो काढून घेतले. नाशिकच्या म्हणण्यानुसार वर जागा होती पण आम्ही दोघांनी बरीच लाकडे जमा केली होती आणि आम्हाला पायऱ्या चढायचा कंटाळा आला होता : म्हणून आम्ही "नको खालीच तंबू टाकू" असे जाहीर करत परत लाकडे गोळा करायला सुरुवात केली. आम्ही चौघांनी मिळून तंबू उभारला, बाजूने खिळे ठोकोन तो मजबूतपणे जमीनीला अडकवला. वारे चांगलेच सुटले होते, आणि मस्त गारेगार होते. जरा अंधार पडायच्या आत तंबूमधे दिवा लावणे, कपडे बदलणे इत्यादी कामे आम्ही आटपून घेतले.

सुर्यास्ताचे काही फोटोज..


लाकडे जमा करतानाच अम्याचे "चला शेकोटी...चला आता शेकोटी" असे सुरु होते, त्यामूळे -.३०ला आम्ही शेकोटीसाठी जागा ठरवून लाकडे जवळ रचून ठेवली. तीन दगड जमा केली, ती रचून त्यामधे वाळलेले गवत, पेपर अणि लाकडाचे छोटे तुकडे जमा केले आणि दोन बूचं रॉकेल टाकून काडी लावली, बघता बघता शेकोटी सर्व बाजूने अगदी छान पेटली. वारं प्रचंड असल्याने लाकडे अगदी धडा-धडा जळत होती पण आम्हाला काळजी नव्हती कारण आम्ही प्रंचड लाकडं जमा केली होती. वारं चांगलच गार होतं त्यामूळे शेकोटीपासून जरा दूर गेलं तरी थंडी भरत होती, त्या धडाडत्या शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो, अम्याने माउथ ऑरगन काढून काही गाणी वाजवली. अंधार पडला तसा पायऱ्यांवरील सौर दिवे पण लागले त्यामूळे आजूबाजूला जरा प्रकाश पडू लागला. आकाशात चंद्र नसल्याने चांदण्याचा अगदी मस्त सडा पडला होता. -.३० वाजल्यावर आम्ही स्टोवची जोडा-जोडी करून त्याला रेडी करून ठेवले, मग संदिप शेकोटीमधे बटाटे भाजत थांबला आणि आम्ही कांदे, टोमेटोची कत्तल करायला सुरुवात केली आणि सगळी कत्तल उरकून भुर्जी तयार करण्यासाठी सज्ज झालो.

स्टोव पेटवला आणि लक्षात आलं की हे काही इतकं सोप्प नाही, वारं वेगात वाहत होतं आणि कोणत्याही दिशेने वाहत होतं, स्टोव काही नीट राहायला तयार नव्हता, मग सगळ्यांच्या सॅक वापरून स्टोवला कवर केलं मग कुठे साहेब व्यवस्थित सुरु झाले.कांदा-मिरचि आणि दालचिनी टाकून मी भुर्जी करायला सुरुवात केली, एकिकडे गप्पा-टप्पा सुरु होत्याच, दोनदा आखी भुर्जी पडता-पडता वाचली : कांदा मस्त परतल्यावर अंडी फ़ोडून मी कढईमधून टिपीकल टन-टन असा आवाज करत मस्त मसालेदार भुर्जी तयार केली. सगळं व्यवस्थित मांडून सगळे भुर्जीवर ताव मारू लागलो. मक्या आणि अंड्यांचा पहीलाच सामना असल्याने मी जरा साशंक होतो, पण त्याला भुर्जी आवडली आणि माझा जीव भांड्यात पडला (भुर्जीच्या नाही.. :)). पोटभर भुर्जी खाऊन आणि सगळं आवरून आम्ही शेकोटीपाशी गप्पा मारत बसलो. एकिकडे बटाटे आणि कांदे भाजून खात होतो, अम्याचा माउथ ऑर्गन मस्त सुरावटी काढत होता, मग थोडी शेकोटीची आणि शेकोटी करणाऱ्या लोकांची फोटोग्राफी झाली आणि एक अतिशय सुंदर फोटो मिळाला.
शेकोटी आणि आम्ही चौघे मक्या, अम्या, मी आणि नाशिकरात्र मस्त चढली होती, शेकोटी - थंडी ह्या प्रकारात वाइनची उणीव चांगलीच जाणवत होती आणि सगळ्यांनी आपली हळहळ माना हलवत "हो ना यार....मजा आली असती...जाउ दे पुढच्या वेळी" व्यक्त केली. रात्र चढू लागली तसा गारठापण वाढू लागला, जरा वेळ चांदण्यांचा सडा पाहून, शेकोटी विजवून आम्ही तंबूत घुसलो, अम्याने मस्त गाणी लावली आणि गाणी ऐकता ऐकता झोपून गेलो. नेहेमीप्रमाणे जागा नवीन असल्याने मला झोप काही नीट लागली नाही, सकाळी जरा लवकरच उठलो, मक्यापण माझ्याबरोबर तंबूबाहेर आला. आम्ही मस्त शेकोटी पेटवली, तितक्यात सुर्यनारयण झपाझप रंग फ़ेकत आकाशात झेप घेउ लागले, अम्या आणि नाशिकला उठवले आणि सगळ्यांनी सुर्योदयाचे फोटोज काढले, डोंगराखालील गावे अजूनही झोपेत होती, त्यांच्या शेकोटीच्या रेषा हवेत विरत होत्या आणि पसरत होत्या, अगदी छान रम्य सकाळ वाटली. मग त्यानंतर चुलीवरच चहा करायचं ठरलं. अम्याने चुलीचा ताबा घेतला, मी आणि मक्या मिल्क पावडरपासून दुध बनवायच्या कामाला लागलो. अम्याने मस्त आले घालून, चहाला झक्कस उकळी आणली, त्यात दुध मिसळून परत एक उकळी आणली आणि फ़क्कड चहा तयार झाला, चहाला अमृततुल्य का म्हणतात हे अश्या ठिकाणीच कळू शकतं. एकचं ग्लास चहा पिता आला म्हणून हळहळ व्यक्त झाली पण पुढच्या वेळी अजून जास्त चहा करायचा असं ठरवून आम्ही तंबूची आवरा-आवरी सुरु केली.
नाशिक, मक्या, मी आणि अम्या..चूल आणि चहाची कढई
उगवता सुर्य आणि बाजूला पसरट केंजळगड
रायरेश्वाराच्या पठारावर जाणारी वाट
तंबू आवरला, सॅक पाठीवर टाकल्या आणि पायऱ्या चढून रायरेश्वराच्या पठारावर गेलो, तिथुन रायरेश्वराचे दर्शन घेतले. ह्याच रायरेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण करायची शपथ घेतली होती. त्यामूळे आम्ही नकळतच अजूनच विनम्र झालो, शिवराय येथे आले होते ह्या कल्पनेने अगदी विरश्री संचारली गेली. त्या थोर शिवरायांना आणि त्यांना त्यांच्या उदात्त कार्यामधे यशस्वी करणाऱ्या रायरेश्वराला नमस्कार करून आम्ही मंदिरात बसलो. एका गावकऱ्या कडून ताक घेतले पण नेमके अतिशय आंबटढाण ताक पिउन उतरायला सुरुवात केली. परत कसरत करत बाईक उतरवल्या, सांधे खिळखिळे करत परंतु पुष्कळ सुखद अनुभव गाठीशी बांधून परतीच्या प्रवासाला लागलो.

बाकीचे फोटो येथे बघा:-

Labels: , , , ,