Thursday, November 06, 2008

भिमाशंकर

आमची बहुचर्चित गोवा टूर :) किरकोळीत रद्द झाल्याने आम्ही १-२ नोव्हेंबरला भिमाशंकरला जायचे ठरवले. भिमाशंकरच का? कारण पावसाळ्यात गेलोच नाही म्हणून :) भिमाशंकरलाच जायचं असं ठरलं. ह्यावेळी आम्ही ५ जणं होतो, मी, मक्या, नच्या, आपट्या आणि नाशिक :P अजूनही २ जणं येणार होते पण आले नाहीत आणि वाचले :)) का?? ते कळेलचं....

आम्ही ५ (मी, आपट्या, मक्या, नच्या आणि नाशिक )

आम्ही १ नोव्हेंबरला सकाळी ६.१०च्या सिंहगड एक्सप्रेसने निघालो, कर्जतला ८.१५ल पोहचलो आणि भरपेट नाष्टा करुन खांडसला जाण्यासाठी ६ सिटर किंवा बस शोधू लागलो, नेहेमीप्रमाणे टूरीष्ट पाहून :P ६ सिटरवाल्यांनी पैस्यांवरून अडवणूक सूरू केली. कर्जत-खांडस अंतर २६ कि.मी. आहे पण आमच्यकडे ५ जणांचे ५००रु. मागीतले जात होते, शेवटी आम्ही ९.४५ची मूरबाड एस.टी. पकडून कशेळे गाठले(१६ की.मी.) आणि मग तिथून १५रु. शिटवर खांडसला(१० कि.मी.) पोहोचलो.एव्हाना ११.३० वाजले होते आणि उन अगदी छान चटके देत होते, मग तिथेच १ वाटाड्या १५०रु. मधे शिडी घाटासाठी तयार केला आणि निघालो डोंगराकडे. डोंगरावर जायला खांडसवरून २ वाटा आहेत,१. शिडी घाट(अवघड पण १-२ तास वाचवतो) आणि २.गणेश घाट (खूप चालावे लागते पण सोप्पा आहे). पावसाळ्यात गणेश घाटच बरा, कारण शिडी घाट पावसाळ्यात फ़ार निसरडा होतो आणि तो कातळावरून जात असल्याने शेवाळ फ़ार त्रास देते, अर्थात इथे धबधबे खूप असतात, त्यामूळे अनुभवी लोकांनी पावसाळ्यात जायला काही फ़ार हरकत नाही. पण फ़ार पाउस असेल तर मात्र न गेलेलेच बरे. मी सर्वत पहील्यांदा शिडी घाटानेच गेलो होतो आणि ते सुद्धा पावसाळ्यात :P

भिमाशंकरचा डोंगर (देवस्थान डावीकडच्या कड्यावर आहे)

शिड्या ह्या घळीमधे आहेत आणि हाच तो कातळ

भिमाशंकरचा डोंगर अगदि मजबूत उंच आहे, ते बघून आमची छातीच दडपून गेली, मी २-३वेळा डोंगर सर केलेला आहे, पण कायम पावसाळ्यात इतक्या उन्हात आमचा सुसाइड अटेंप्ट होता असं म्हणणे जास्त योग्य राहील..किडा दूसरा काय!!!चालायला सुरुवात केली, थोड्याच वेळात उन्हाने आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली. भरपूर घाम येत होता आणि कडक उन्हामूळे लगेचच तो वाळल्याने आमच्या अंगावर शहारे येत होते त्यामूळे त्रास होत होता, अर्थात माझा आणि अजून काही जणांचा वाढिव आकारसुद्धा कारणीभूत होताच :D, म्हणजे बघा सगळे घटक कसे छान जुळून आलेले होते. वाढिव वजन आणि आकार, कडक उन आणि खडा चढ, त्यामूळे भरपूर दमछाक सुरू झाली.आधीच सांगीतल्याप्रमाणे शिडीघाटला चढ फ़ार आहे कारण हा रस्ता सरळ डोंगरावर कातळाच्या बाजूने नेतो. त्यामूळे वेळ खूप वाचतो पण चढ मात्र जबरदस्त आहे. हाशहुश्श करत आम्ही शिड्यांपाशी पोचलो आणि काळजीपुर्वक शिड्या पार केल्या, २ऱ्या शिडीपाशी फ़ार काळजी घ्यावी लागते कारण त्याआधी १ मोठा खडक पार करावा लागतो आणि पाय ठेवायला जागा नाहीच, हाताने कपारीत हात घालून तिथुन जायला लागते, बाकी मग काही त्रास नाही. ज्या लोकांनी येथे शिड्या लावल्या त्या लोकांचे कौतुक करावे ते थोडेच आणि मुख्य म्हणजे त्यांचे शतश: धन्यवाद मानायलाच हवे.

याहू!!! शिड्या!!!!!!!!



शिड्यापार करताना तापलेल्या कातळावर हात मस्त भाजत होते, आता आम्ही कातळाच्यावरून जात होतो, त्यामूळे उन सरळ भाजून काढत होते. शिड्या संपल्यावर थोड्याच अंतरावर डोंगराचा मध्य येतो, येथे गणेशघाटातून येणारी वाट मिळते. इथेच थोडी वस्तीपण आहे, त्यांनीच १ शेड उभारली आहे, ताक, चहा इत्यादी विकतात (चहा फ़क्त पावसाळ्यात). आम्ही अक्षरश: धावत त्या शेडमधे घूसलो आणि बॅगा टाकून त्या सावलीत स्वस्थ बसलो, उन्हामूळे जेवायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग २-३ ग्लास ताक घेटले :) आणि तेच आमचे जेवण होते. तिथेच अर्धा तास आराम करून मग आम्ही निघालो. आम्ही तिथे २.३०ला पोचलो होतो आनि ३.१५ला निघालो. नंतर बराच रस्ता जंगलातून होता त्यामूळे उन्हापासून बचाव झाला. इथे आम्ही जरा समधानकारक चढाई केले. तसा पूढचा सगळाच रस्ता नागमोडी आणि चढ असलेला आहे. जंगल संपून परत उन्हाने आपले काम सूरू केले :) सावली दिसली रे दिसली की त्यात थोडा आराम करत होतो. मग परत थोडे जंगल आणि सरळ रस्ता लागला, मग परत नागमोडी चढाचा रस्ता लागला. असं भरपूर दमत आणि आराम करत आम्ही एकदाचे वर पोचलो तेव्हा जवळ-जवळ ६ वाजत आले होते. आम्ही आता कड्याच्या टोकावर पोचलो होतो, पच्शिम दिशा मावळत होती पण वातावरण धूसर असल्याने सुर्यास्त काही नीट दिसला नाही. मग गावात गेलो, २-२ ग्लास लिंबू सरबत घेतले, तिथुन अगदि मंदिरामागील हॉटेल गाठले आणि खोली घेऊन पंलगावर उड्या घेउन आराम केला.मग ७.३०च्या सुमारास दर्शन घेतले, थोद्यावेळ सगळ्यांची कशी लागली ह्यावर चर्चा केली :) पण १ मात्र आहे की आम्ही इतक्या उन्हात चढ पूर्ण केला, हो भरपूर वेळ घेतला, आराम केला पण मला वाटतं की तेच योग्य होतं त्यामूळे आम्ही फ़ार जास्त दमलो नाही, नाहीतर आमची वाट लागली असती. मग रात्रीचे जेवण घेउन नच्या आणि आपट्या झोपले, मी, मक्या आणि नाश्या बाहेर आलो. आकाश चांदण्यांनी भरून गेलेले होते, अक्षरश: शेकडो मोत्यांचा सडाच पडला होता असही म्हणता येइल, ते दुर्मिळ द्रुश्य साठवून आम्ही मस्त गरमा-गरम कॉफ़ी घेतली आणि मग हॉटेलला जाऊन झोपी गेलो.

सावली आली रे आली...बसा बसा!!!




सकाळी लवकर उठायचा स्कोपच नव्हता..त्यामूळे निवांत ८ ला उठलो नच्याच्या डोक्यावर चादर गुंडाळून त्याला मनसोक्त धुतला :) आणि मग चहा-बिस्कीटं खाल्ली आणि मग नागफ़णी पॉईंटकडे निघालो तेव्हा ११ वाजले होते, अर्थात हा रस्ता लांब आहे पण चढ काही जास्त नाही. जाता-जाता असंख्य फ़ुलपाखरे दिसली, छान वेग-वेगळ्या रंगाची, आकारची अतिशय मनमोहक फ़ुलपाखरे पाहून उन्हाचा त्रास जरा कमी झाल्यासरखा वाटला. मग नागफ़णी पाहून झाल्यावर आम्ही गुप्त भिमाशंकरला जायला निघालो. गुप्त भिमाशंकर मंदिराच्यामागील बाजूस आहे, तिथे व्यवस्थित दिशेची पाटी लावलेली आहे. इथे वाटाड्या नाही घेतला तरी चालतो, आम्ही घेतला होता कारण आम्हाला हे माहीत नव्हते :P. हा तर गुप्त भिमाशंकर म्हणजे १ स्वयंभू पिंड आहे, आणि ती जंगलातील एका धबधब्याच्या मागील बाजूस आहे. पावसाळ्यात ती पिंड बघता येणे जरा अवघडचं आहे, कारण त्यासाठी तुम्हाला धबधबा वरच्या अंगाने ओलांडावा लागतो, ओढ्याचे पात्र बऱ्यापैकी रुंद आहे आणि त्यात आख्खा गुडघा आत जाईल इतके खोल खड्डे आहेत, म्हणजे पावसाळ्यात पाण्याला भयानक वेग असताना ओढा पार करणे म्हणजे सरळ सरळ स्वताचे हात-पाय आणि थोबाड फ़ोडून घेण्याच प्रकार आहे :), असो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही पिंड सहज बघता येते. तर इथे जायचा रस्ता मस्त जंगलातून आहे, थोडा उताराचा रस्ता आणि पुर्णपणे जंगल असल्याने उन्हं खाली पोचतच नाहीत :), आमच्या थोडसं पूढे काही अति-उस्ताही मंडळी जोर-जोरात आरडा-ओरडा करत जात होते, जंगलाची सगळी शांतता भंग केली होती साल्यांनी :(. भिमाशंकरच्या जंगलात शेकरू (गिअन्त उइर्रेल) नावाने प्रसिद्ध परंतू आता धोक्यात आलेल्या आणि संरक्षित घोषीत केलेल्या मोठया खारी आढळतात आणि त्यासाठीच आम्ही जंगलात आलेलो होतो पण आवाजाने त्या दिसतीलकी नाही असा प्रश्न पडला होता.



सुंदर आणि लोभस शेकरू....





पण नच्याला १ सुंदर शेकरु दिसलचं, पण आम्ही पूढे होतो आवाज द्यायचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे आमची संधी हुकली :( थोडसं अजून पुढे गेल्यावर मात्र आमचे नशीब फ़ळ-फ़ळले :) १ अति-सुंदर शेकरू सळसळतं खाली आले, त्याने आम्हला खूप फोटोज काढू दिले, त्याने १ आंब्याची कोय आमच्या देखत फ़स्त केली, ते आमच्या इतके जवळ होते की आम्हाला ती कोय फ़ोडताना होणारा आवाजसुद्धा ऐकू येत होता, असे व्यवस्थित दर्शन शेकरूने आम्हाला देऊन आमची दमछाक क्षणात दूर केली. मग त्याला त्रास न देता अगदी चुपचाप आम्ही तिथुन निघून गेलो. आम्ही शेकरू पाहीले त्या ठिकाणी १ गणपतीचे मंदिरसुद्धा आहे. एकदाचे गुप्त भिमाशंकरपाशी पोचलो, ओढ्यात फ़ार पाणी नव्हते, पण १ छोटा प्रवाह सुरु होता. नशीब चांगले की आवाज करणारी मंडळी परतीच्या तयारीत होती. आंघोळ कोणाचीच झालेली नव्हती मग दर्शन कसे घेणार? असा प्रश्न पडलेला असताना तो प्रवाह जोरदार धारेने पडताना अम्याला दिसला आणि तो त्यात घुसलाच :), मग काय आम्ही सगळेच त्या छोटूश्या धारेत शिरलो, पाणी मस्त गार होते आणि त्या धारेत चांगलेच जास्त पाणी होते आणि वेगही होता. भरपूर भिजून झाल्यावर आम्ही दर्शन घेतले आणि मग तसेच ओल्याने परत आलो, परत येता येताच पुर्ण वाळलो.

धबधबा! धबधबा!! धबधबा!!!

भूक होती पण जेवायची इच्छा नव्हती कारण एस.टी.ने प्रवास करायचा होता :D मग रिस्कं कशाला घ्यायची...मग बिस्कीटं, मॅंगोला असलं काहीसं खाउन घेतलं आणि ४ च्या बसने पूण्याला निघालो. ८ला पोचलो, घरी आंघोळ करून चायनीज खायला बाहेर पडलो. रात्री मस्त झोप लागली. मला वाटतं माझे २-३ किलो वजन नक्कीच कमी झाले असेल :),एकुणात काय तर भिमाशंकर डोंगराने अगदी अंत पाहीला..फ़ार चाललो चढ-चढ चढलो, दम-दम दमलो, पाण्यासाठी कासाविस झालो, मजबूत डीहायड्रेट झालो, उन्हाने भाजून निघालो,एकदा असं झालं होतं की च्यायला आता तरी चढ पूरे पण नाहीच चढ काही संपायला तयार नव्ह्त :) पण झालं ट्रेक पूर्ण करूनच परत आलो आणि तेच महत्वाचं नाही का? पण एक आहे परत उन्हात भिमाशंकरला अजिबात जाणार नाही :-D.

सगळे फोटोज इथे पहा:

Labels: , , , , , , , ,