Friday, December 18, 2009

पा बद्दल थोडेसे....

काही दिवसांपुर्वी "पा" पिक्चर बघितला आणि खर सांगतो मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर एक उत्तम हिंदी पिक्चर बघून खूप चांगलं वाटलं. पिक्चरची स्टोरी सांगण्यापेक्षा मला त्यात काय आवडले आणि वाटले ते लिहिणार आहे.

आधी वाटलं होतं की पिक्चर अतिशय सिरियस असेल पण तसे अजिबात नाही, विषय गंभीर आहे, परंतु तो अतिशय उत्तमपणे मांडण्यात आलेला आहे, त्या व्याधीचे गांभिर्य त्यात सांगितले आहेच, पण रटाळपणा टाळून लोकांपर्यंत नेमक्या भावना पोचवण्यात नक्कीच यश आलेले आहे. संपुर्ण पिक्चरमधे कोठेही प्रोजेरियाग्रस्त मुलाबद्दल (ऑरो) "बिच्चारा" असा सूर नाही आणि हाच मला अतिशय उत्तम भाग वाटला. बऱ्याचवेळा एखाद्या व्याधीवरील पिक्चरमधे त्या व्यक्तीच्या वेदना, इतरांनी त्याची केलेली कुचंबणा, त्याला लावलेलं "बिच्चारा" लेबल, सगळीकडे रडारड, सगळ्याबद्दल रडारड, त्यामूळे पिक्चर मनाला भिडण्यापेक्षा नकोसा वाटू लागतो.

पा मधे कुठेही ऑरोला हिणवले गेलेले नाही, त्याच्या हाल अपेष्ठा दाखवलेल्या नाहीत, तसेच इतरांचे विचित्र वागणे, टोमणे इत्यादी काहीही नाही, त्या व्यक्तीला एक नॉर्मल व्यक्ती म्हणूनच वागणूक दिली गेलेली आहे. काश आपणही सर्वप्रकारच्या व्याधीग्रस्त व्यक्तींना अशी साधी वागणूक देउ शकलो असतो, त्यांचे जीवन कितीतरी सुसह्य झाले असते.

दुसरी गोष्ट म्हणजे कुमारीमातेचा प्रश्न. कुठेही कुमारीमातेबद्दलचे प्रॉब्लेम्स, लोकांच्या नजरा, टोमणे, घृणा, त्यातून त्या मातेची होणारी रडा-रड, आक्रस्ताळेपणा ह्या सगळ्या गोष्टी टाळलेल्या आहेत.

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उगाचच फ़्लॅशबॅकमधे फ़ारसा वेळ न घालवता जो विषय आहे तोच पुर्णपणे व्यवस्थित हाताळला आहे.

चौथी गोष्ट म्हणजे हिरोला ऑरो हा आपलाच मुलगा आहे हे कळल्यावर त्याचा लगेचच स्विकार करणे. हिरो हा श्रीमंत, राजकारणी, खानदानी असूनही कुठेही असली थेरं नकोत, तिला तु सोडून दे, किंवा विसरून जा त्या मुलाला असा आक्रस्ताळेपणा नाही.

पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे उगाच सगळीकडे गाणी पेरलेली नाहीत, संपुर्ण पिक्चरमधे फ़क्त दोन गाणी आहेत, आणि त्यामूळे मला तरी सुसह्य वाटत होते, आणि मुख्य म्हणजे त्या विषयाचे गांभिर्य कमी होत नव्हते.

मुळात पिक्चर हा प्रोजेरियाबद्दल नसून एका मुलाचा आई-वडिलांमधे समेट घडवून आणण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलाबद्दल आहे, फ़क्त त्या मुलाकडे त्यासाठी वेळ कमी असल्याने तो जास्त परिणामकारक वाटतो. मुलाची निरागसता, त्यात त्याचे आजारपण परंतु तरीही त्याची इतर मुलांसारखेच आपलेही आई-वडील एकत्र असावे अशी इच्छा हा पिक्चर घडवून आणते.

ऑरोच्या मृत्युसमयी त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आई-वडील एकत्र आल्यावर पसरलेले समाधानाचे हास्य मनाला अगदी सहज स्पर्श करून जाते, अगदी हेलावून टाकते. नंतर हिरो आणि हिरोईनचे एकत्र बसून ऑरोसाठी पावसात रडणे मनाला स्पर्शून जाते, असं वाटतं की त्यांच्या दु:खात पाऊसपण सामील झाला आहे.

पिक्चर संपला तेव्हा बरीचशी लोकं रडत होती, माझा गळादेखील भरून आला होता, फ़क्त अश्रु काही बाहेर आले नाहीत. पण मी कोणावरही हसलो नाही. कारण जेव्हा माणूस दुसऱ्याच्या दु:खावर रडू शकतो तेव्हाच त्याला स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार असतो.

Labels: , , , , , ,