Saturday, November 13, 2010

राजगड ते तोरणा

आम्ही सॅक उतरवून टॉर्च बाहेर काढले आणि बऱ्याच वर्षांपासून पेडींग असलेल्या आणि ४-५ वेळा कॅन्सल झालेल्या ट्रेकला एकदाची सुरुवात झाली. ट्रेकींगची सुरुवात केल्यापासून आम्ही राजगड आणि तोरणा ह्या मात्तब्बर किल्ल्यांची नावे ऐकून होतोच पण त्याचबरोबर राजगड ते तोरणा ह्या ट्रेकबद्दलपण खूप ऐकून होतो. राजगडाच्या संजीवनीमाची पासून सूरू होणाऱ्या डोंगराच्या, माथ्यावरून तोरणाच्या बुधलामाची पर्यंत जाणारी पायवाट म्हणजेच हा ट्रेक होय. अर्थात नुसती पायवाट तुडवायची असे नव्हे तर आधी राजगड किंवा तोरणा पुर्ण चढायचा आणि मग ती पायवाट तुडवून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत पोहचयचे आणि मग तो किल्ला खाली उतरायचा असा भरगच्च कार्यक्रम असतो. डोंगराच्या माथावरून जाणारी पायवाट सोप्पी वाटत असली तरीही पुर्ण उन्हातून आणि बोडक्या डोंगरमाथ्यावरून चालताना हीच पायवाट भल्याभल्यांची वाट लावते :) असो तर असा हा राजगड-तोरणा ट्रेक आम्हा सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच वर्षांपासून घोळत होता, घोळत कसला चांगल मुरला होता. अर्थात नेहेमीप्रमाणे आम्ही ह्या ट्रेकसाठी अनेकवेळा प्लॅन केले परंतु सगळे हवेत विरून गेले, कधी लोकं कमी होती तर कधी आयत्या वेळेस काही अडचणी इत्यादी कारणांनी जमत नव्हतं. शेवटी मात्र सगळ्यांनी "बासच....आता काहीही झालं तरी ह्या सिझनमधे राजगड-तोरणा करायचाच.." असा विडा उचलला आणि प्लॅनिंग सुरु झाले. मेलिंगथ्रेड सुरु झाली आणि २०-२५ रिप्ल्याय पडले आनि त्या आठवड्यात प्लॅन कॅन्सल झाला :ड नचिकेत, अम्याला आणि मक्याला त्या वीकमधे जमत नव्हत, पण मग लगेचच सेम प्लॅन लगेचच पुढच्या वीकमधे नेला आणि "२ लोकं तर २ पण ट्रेकला जायचचं" अशी भिष्मप्रतिद्न्या करून मेलथ्रेड बंद केली.

मक्याने त्याची रिझर्व केली आणि शनीवारी सकाळी पुण्याला पोचतो कॉल केला, नच्या ऐनवेळी आजारी पडला तर अम्याला घरच्यांनी धमकावून घरीच माल वाह्तूकीसाठी पार्क करून ठेवला :D. त्यामूळे मी, मक्या, ॠशिकेष (पुढे ॠश्या असा उल्लेख असेल) आणि अर्थात नवीन लग्न झालेले असूनही (म्हणजेच सगळी रिस्क पत्करून) नाशिक, असे ४ जण ट्रेकसाठी जमलो. तसं आम्हाला एक खाज होती की "रात्री अथवा अंधारात राजगड चढणे" मग आम्ही विचार केला की हा प्लॅनपणा बऱ्याच वर्षांपासून रेंगाळतो आहे तर हापण इथेच उरकावा, त्यामूळे आमचा प्लॅन असा होता की...
साधारण २-३ वाजता पुण्यातून बाईक्सवरून निघायचे आणि नसरापूर=वेल्हा रस्तायावरील "खरीव" गावापाशी गाड्या सोडायच्या आणि तिथून चालत "पाल" गावापाशी पोचायचे. मग तिथून राजगड चढायचा आणि रात्री पद्मावती मंदिरात मुक्काम ठोकायचा. सगळ्यांचा राजगड पाहून झालेला असल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तोरणाकडे कूच करणे. शक्य तेव्हडं कमी सामान न्यायचं असल्याने आम्ही स्टोव ड्रॉप केला कारण स्टोव आम्हाला फ़क्त रात्री जेवणासाठी लागणार होता, दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे होते म्हणून नाश्ता, चहा इत्यादी काही करायचे न्वहते म्हणून मग स्टोव नेला नाही आणि तसेही पायवाटेवर थांबून स्टोव जोडून नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवण्यात कोणी उत्सुक नव्हते आणि काही अर्थपण नव्हता कारण खरं सांगायचं तर आम्हाला ऊन जास्त चढायच्या आत तोरणा गाठायचा होता ना...बाकी सामानपण जुजबीच होते, २ लिटर पाणी, रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण सगळं पॅक करून घेतले, आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे ग्लुकॉन-डी (ऑरेंज फ़्लेवर :) ) पण आठवणीने घेतले होते (लाइफ़लाईनच म्हणा ना...).

ठरल्याप्रमाणे २-३ला आम्ही सिंहगड फ़्ल्यायओव्हरच्याइथे जमलो आणि नसरापूरची वाट पकडली, नसरापूर मगे सोडून ५-६ कीमी नंतर राजगडाचे दर्शन झाले. १-२ जणांना विचारून खरीव गावापाशी पोचलो आणि तिथे एका भल्या गावकऱ्याच्या अंगणात गाड्या उभ्या केल्या. सगळ्यानीं टोप्या गॉगल, कॅमेरा अशी आयुध काढून चालायची सज्जता केली. एव्हाना ५-५.३० वाजले होते आणि सुर्याने आपली हीट कमी केलेली होती. संदीपने विकीमॅपियावरून हा रस्ता पाहीलेला होता आणि हा रस्ता जवळ-जवळ ७-८ कीमी होता. आम्ही चालायला सुरुवात केली, शेतकऱ्यांची थोडीफ़ार कामे सुरु होती, वातावरणात शेणाचा मस्त वास पसरला होता :) तसंच गवत थोडे ओलसर झाल्याने त्याचा एक टिपीकल सुंगध हवेत पसरला होता. आम्ही गप्पा-टप्पा करत करत चालत चालत पालखिंडच्या वरच्या भागात पोचलो आणि समोरच भव्य राजगड आणि संजीवनी माची आणि तोरण्याला जाणारा रस्ता दिसू लागला, मग लगेच थोडे फ़ोटोसेशन झाले आणि चालणे सुरु राहीले. सुरतेवरच्या स्वारीवर जाताना महाराज ह्याच खिंडीतून गेले होते कळाल्यावर अचानक वातावरण भारल्यासारखे वाटले, महाराज इथूनच गेले आणि आपण ह्याच राजमार्गाने चालतोय असे समझल्यावर धन्य वाटू लागले.
राजगड
थोडे पुढे गेल्यावर एक मोकळे पठार आणि एक सुंदर दृश्य आमची वाट बघत होते. सुर्यनारायण निरोप घ्यायच्या तयारीत होते आणि त्यांनी नारींगी आणि सोनेरी रंगाची उधळण सुरु केली होती आणि सर्व आसमंतात तो रंग पसरला होता, राजगडतर एक्दम उच्च दिसत होता. इथून राजगड-तोरणा मार्ग अगदी पुर्ण दिसत होता. सुर्यनारायण तोरण्यामागेच लपायला जात असल्याने तोरण्याभोवती मस्ता रंग दिसत होते, तोरणा जणूकाही तेजाने झळकत होता, मग तिथे थोडे फ़ोटोसेशन केले आणि ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवत आम्ही परत चालायला सुरुवात केली आणि वाजेघरला पोचलो.
तोरणा
राजगड ते तोरणा मार्ग
एव्हाना अंधार सुरु झालेला होता आणि गवताचा सुंगध सगळीकडे भरून राहीला होता, साप-बीप नको म्हणून मग माही रस्त्याच्या मधून चालायला सुरुवात केली. मुळात ह्या रस्त्यावर वाहतूक कमीच आणि त्यात अंधार असल्याने वाहतूकीचा संबंध नव्हता. राजगडावरील दिवे दिसू लागले होते आणि पाल गाव जवळजवळ येत होते. एव्हढ्यात आम्हाला एक दुधाचा टेंपो आमच्या मागून येताना दिसला आणि आम्हाला पाहील्यावर तो थांबला, आणि त्यांना पाल गावात सोडणार का असे विचारले आणि लगेचच आम्ही मागे चढून उभे राहीलो :). टेंपो भरधाव निघाला आनि पुढच्या ५ मिनीटसमधे आम्ही पाल गावात पोचलो. नशीब टेंपो मिळाला नाहीतर आम्हाला अजून अर्धा तास तरी चालावे लाग्ले असते.

एव्हाना ६.३० वाजले होते आनि अंधाराचे साम्राज्य पसरले होते, तिथे उतरल्यावर कळाले की हा टेंपो इथून जाणारे अथवा इथे येणारे शेवटचे वाहन होते :) आम्ही देउ केलेले पैसे टेंपोचालकाने हसत-हसत नाकारले आणि पोरांनो सांभाळून जा असे म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि एक दिर्घ श्वास घेऊन "फ़ायनली..." असे म्हणून चालायला सुरुवात केली. सुरुवातीला टॉर्च न वापरता आम्ही चालत होतो, पण चढायला सुरु केल्यावर जशी झाडी दाट झाली तसे आम्ही टॉर्च ऑन केले आणि रस्ता कापू लागलो. काही अंतरावर सौरदीवे बसवलेले आहेत, तिथे थोडे थांबत होतो. दाट झाडी संपली आणि आम्ही पायऱ्यांपर्यंत पोचलो. अर्थात सगळ्यांनी नेहेमीप्रमाणे "च्यायला आपण घरी बसायचं सोडून कायम कडमडायला का येतो" असा नेहेमीचा प्रश्न एकमेकांना विचारून हसून घेतले. आकाश स्वच्छ होते, सौरदिव्यांचा मंद प्रकाश खाली दिसत होता, वरती आकाश चांदण्यांनी भरले होते. मंद वारा वाहत होता आणि वातावरणात शांतता पसरलेली होती आणि ह्या सगळ्या वातावरणाने आमच्या चित्तवृत्ती प्रसन्न होत होत्या. थोडावेळ तो सुंदर अनुभव घेत आम्ही तिथेच उभे राहीलो आणि मग परत "चला!!!" अस म्हणून पायऱ्या चढायला सुरुवात केली. एका वळणावरून राजगडाचे काळेकभिन्न राक्षसी दगड आणि बुरुज दिसू लागले, मनोमन असे वाटले की पुर्वीच्या काळी कसले भारी वाटत असेल. आणि आम्ही पायऱ्या संपवून राजगडाच्या बुरुजाखाली आलो. तो काळा दगडी बुरुज अंधारात वेगळाच आणि गुढ वाटत होता. एकुणच राजग्ड त्या अंधारात गुढ वाटत होता. माहीत नाही पण मला तो गुढपणा खूपच आवडला, कोणीच बोलत नव्हते बहुतेक सर्वजण तो गुढपणा आपल्या मनात साठवून त्याचा आनंद घेत होते. तिथून मग पाल दरवाजा गाठला, शिवरायांचा उद्घोष केल्यावर सर्वांना स्फुरण चढले आणि त्याचा आवेशात आम्ही पद्मावती मंदिरात घुसलो. आधी पर्यटक निवासात पाहीले तर लोकं सिगारेटी पेटवून आनि हातात डफ़ वगैरे घेउन बसलेले दिसले, म्हणजे हे लोकं रात्रभर दंगा करणार हे वेळीच लक्षात आल्याने आम्ही मंदिरातच रहायचा निर्णय घेतला.

आता आल्याक्षणी पहीले देवीचे दर्शन घेतले आणि तसेच जमीनीवर फ़तकल मारून बसलो. गर्दी फ़ारशी नव्हती त्यामूळे आम्हाला जागा चांगली मिळाली. आमच्या आधी आलेल्या लोकांची जेवण बनवायची लगबग सुरु होती, चुलीच्या धुरांचे वास पसरले होते, मधूनच रटरटत्या खिचडीचा वास येत होता. "अरे यारा फ़ार काही गार नाहीये" इती मक्या बोलत होता, मे बाहेर हात धुवायल गेलो होतो आणि मक्याचे वाक्य मला ऐकू आले. त्याला म्हटल हो...का!!! ये न जरा बाहेर अस म्हणालो. तो बाहेर आला आणि त्याचे पाय कापू लागले, कारण बाहेर प्रचंड थंड आणि वेगवान वारे वाहत होते. म्हणजे गारठा होताच पन वेगवान वाऱ्यांमुळे तिथे उभे राहणेपण मुश्कील झाले होते, "च्यायला फ़ाटली माझी" असं म्हणत मक्या आत पळाला आणि मग आम्ही हसत सगळेच आत आलो. बाजूलाच २-३ मुले कण्हत पडली होती, त्यांना विचारलं तर म्हणाले "अरे जस्ट तोरण्यावरून आलोय, कीती चाललो आणि का हेच कळत नाहीये, पाय जाणवत नाहीयेत" असं म्हणून परत पडून राहीला :) आम्ही सगळ्यांनी आता उद्या आपली पाळी असं म्हणत स्मितहास्य केलं. सॅक्स मधून डबे काढले, अनुष्काने झक्कास रस्सा बनवून दिला होताच, त्यावर मस्त ताव मारला. अनुष्काला असे वातावरण खूप आवडते अशी आठवण काढत जेवण उरकले आणि जरा तंगळमंगळ करत झोपलो. झोप काही लागत नव्हती ’नवीन जागा होती ना....’ आणि पातळ चादरीमधून थंडी जाणावत होती...बाहेरचं वारं वाढल्याचं जाणवत होतचं आणि चांगलाच आवाज येत होता.

सकाळी ६ चा गजर झाला आणि मी कॅरीमॅटवरूनच पडल्या पडल्या वाऱ्याचा आणि बाहेरच्या थंडीचा अंदाज घेतला आणि "आत्ता बाहेर निघालो तर भयानक त्रास होईल" हे जाणवल्याने मी आणि नाशिक गप पडून राहीलो, मक्या आणि ॠश्यानेपण तेच केले :ड. ७ वाजता मात्र आम्ही उठलो, एका खेडूताला चहा बनवायला संगितला म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते ना :ड, दात घासले आणि समोरून रंग उधळत येणाऱ्या सुर्यनारायणाला अभिवादन करत त्याची रंग‍उधळण कॅमेरामधे बंदिस्त.

सकाळच्या वेळची काही दृश्ये



एव्हाना वारे जरा कमी झाले होते पण थंडी जाणवत होती, नुस्ता ब्रश तोंडात धरला होता, दात कापत असल्याने ब्रशने घासायची काहीच गरज नव्हती :) मग चहा घेतला आणि सॅक पॅक करून संजीवनीमाचीच्या वाटेवर निघालो. मधेच ढालकाठीपाशी आम्ही चौघे आणि मागे तोरणा असा फोटो उडवून एकदा सर्वा वाट पाहून घेतली आणि "च्यायला लई चालयचय" अस म्हणून निघालो.
ऋश्या, मक्या, मी आणि नाशिक आणि मागे तोरणातोरण्याला जायचा मार्ग

तोरणा
अगदी पार संजीवनीमाचीच्या टोकापाशी पोचलो पण खाली उतरायला वाट काही दिसेना. म्हणजे सर्व पायवाट अगदी व्यवस्थित दिसत होती पण त्या पायवाटेपर्यंत पोचायची पायवाट काही दिसत नव्हती आता आलीका पंचाईत! आमच्या आधी निघालेला एक ग्रूपसुद्धा त्याचा मनस्थितीमधे होता, मग आम्ही सर्व मिळून रस्ता शोधू लागलो आणि तेव्हढ्यात मला एक खेडूत एका बाजूने चढत असलेला दिसला. ऋश्याने त्याला विचारले आणि त्याने असे कसे तुम्ही शहरी लोक आंधळे आशी चेष्टा करत दरवाजा दाखवला. अगदी १०-१५ मिनिट्सपुर्वी आम्ही सगळे त्याच दरवाज्याच्या बाजूने गेलो होतो अर्थात दरवाजा थोडा आतल्या बाजूने असल्याने लक्षच गेले नाही :) दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य आणि हुशारी लगेच कळून आली. हसत-हसत आम्ही खालची वाट पकडली. संजीवनीमाचीच्या खाली पोचल्याव्र राजगडाची कधीही न पाहीलेली बाजू दिसून आली, ती भव्य आणि मजबूत तटबंदी छातीवर येऊ लागली, काय हिम्मत आहे कोणाची गड काबीज करायची..ही तटबंदी जिंकायची म्हणजे केवळ अशक्यप्रायचं, त्यात परत तटबंदीच्या आतील बाजूने सैन्याचे लपलेले खंदक म्हणजे स्वत:चे मरण ओढवून घेणे निश्चित होते.
संजीवनी माची आणि राजगडाची आजवर न पाहीलेली बाजू



ह्या सगळ्या नाटकात ८.३० वाजले होते, मग आम्हे जरा स्पीड पकडून चालायला सुरुवात केली, अजूनही गारवा टिकून असलेल्या उन काही फ़ारसे जाणवत नव्हते, पायवाट चांगलीच मळलेली होती आणि साधारण चढ-उतार असल्याने आम्ही व्यवस्थित चाललो होतो. मक्याच्या गुढग्याने कालपासूनच रंग दाखवायला सुरुवात केली होती त्यामूळे त्याची गाडी जरा हळू हळू होती. साधारण तासाभराने आम्ही एक डांबरी रस्ता पार करून एका घरापाशी पोचलो. तिथेच नाश्ता केला, ब्रेड आणला होता पण त्यापेक्षा फळे आणि अंडी खाणे जास्त सोयीच होतं. मग त्या घरातून थोडे ताक पण घेतले आणि ५-१० मिनिटे बसून परत चालायला सुरुवात केली.

ऊन एव्हाना चढायला सुरुवात झाली होती पण अजून फ़ारसे गरम होत नव्हते. साधारण तासाभराने तोरणा आहे तिथेच दिसत होता :ड तरीही आम्ही चालत राहीलो आणि एका सपाटीला उतरलो, आम्हाला वाटलं की नेहेमीप्रमाणे वाट चुकलेलो दिसतोय :) तर तिथे एक घर दिसले, मग त्यांना वाट विचारून घेतली थोडं ताक घेतलं. त्यांनीच सांगितलं की तुम्ही रस्ता चुकलेला नाहीत, "आता हिथून असं जायच" आनि हवेत हात फ़िरवल :फ आम्हाला एक ग्रूप वरून जाताना दिसला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून परत मार्गस्थ झालो, पण आम्ही इतकं करूनही चुकीची वाट पकडलीच :ड आम्ही फ़ार भरकटलो नाही पण एक गुरांच्या वाटेवरून चालत राहीलो, साधारण अर्धा तास चालूनही आम्हाला त्या डोंगरावर चढणारी वाट दिसत नव्हती. मग आम्ही आता कुठूनही चढू पण त्या डोंगरावर पोचायचचं असं ठरवून प्रयत्न सुरु केले, तेव्हढ्यात ऋश्याला एक घर दिसलं मग त्यांना विचारल्यावर असं समझलं की आम्ही थोडे भरकटलो आहोत, पण त्यांच्या इथूनच दुसर रस्ता आहे आणि ते त्याच रस्त्याने तोरण्याला ताक विकायला जातात असं समजलं. मग त्या मावशींनी आम्हाला त्या डोंगरमाथ्यावर सोडलं. आम्ही मेन रस्त्याच्या समांतर चालत होतो पण फ़क्त खालून वरून नव्हे. पण आम्ही हुश्श...केलं कारण परत एक्दा तोरणा समोर दिसू लागला आणि दुरुन बुधला माचीचा बुरुज आनि दरवजा दिसू लागला. त्या मावशींनी आम्हाला त्यांच्याकडचे पाणी पण दीले आणि आम्ही परत चालायला सुरुवात केली.
बुधला माचीजवळून मागे दिसणारा राजगड आणि पार केलेले अंतर
अभेद्य आणि दुर्गम बुधला माची
कामगिरी फ़त्ते...ऋश्या, मी, मक्या आणि नाशिक, मागे राजगड (बुधला माचीवरून)

बुधला

संपुर्ण तोरणा
साधारण १ वाजता आम्ही बुधला माचील पोचलो. मग तिकडच्या शिडीवर भरपूर फोटो काढले आणि मग आम्ही चौघे आणि मागे राजगड असा फोटो काढला. आमचा विश्वासच बसत नव्हता की आपण इतकं अंतर चालून आलो :) माचीवरून किल्ल्यावर जायला तब्बल एक तास लागला कारण आता उन्हाने आम्हाला भाजायला सुरुवात केली होती आणि सगळे दमलेपण होते.


तोरण्याला कोकण दरवाज्यामधे पोचून फ़ोटोसेशन केले तिथेच जास्त साखरवालं लिंबूसरबत घेतले आणि पुढचा थांबा एकदम मेंगाई देवीच्या मंदिरापाशीच घेतला. तिथे पहीले बूट काढून फ़ेकून दिले आणि निवांतपणे बसलो. सावलीत चांगलेच गार वाटत होते तर उन्हात गरम, त्यामूळे उन्हात बसावं की सावलीत हेच कळतं नव्हतं :) मग तिथेच उरलेल्या खाण्यावर ताव मारला. जरा वेळ आराम केला, गप्पा-टप्पा सुरु होत्याच. तिथे असं समजलं की शेवटची बस वेल्ह्यावरून ५ ला असते आनि त्यानंतर तुम्ही फ़क्त जीपवाल्यांच्या दयेवर परत जाऊ शकता :) मग आम्ही ३.३० ल उतरायला सुरुवात केली. एव्हाना मक्याचे दुखणे बरेच वाढले होते, ॠश्याच्या गुढग्यानीपण थोडा दगा दिला होता. त्यामूळे आम्ही जरा निवांतपणे उतरत होतो. उतरायला ५.४५ ते ६ झाले आणि बस निघून गेल्याचे कळाले, गावात लाईट गेलेले होते आणि अंधार झालेला होता. आमच्या बरोबर संजीवनीमचीवर भेटलेला ग्रूप तोरण्यापासून होताच, थोड्या विनवण्या करून एक जीपवला ५०० रु. मधे नसरापूर फ़ाट्यावर सोडायला तयार झाला. तसं पाहता "खरीव" वेल्ह्यापासून फ़क्त ७ कीमी वर होते पण त्यासाठी आम्हाला २५रु. प्रत्येकी मोजायला लागले. तो ग्रूप फ़ाट्यावरून बस पकडून पुण्याला जाणार होता. आम्ही आमच्या गाड्या काढल्या, प्रेमाने त्या गावकऱ्याने चहाचा आग्रह केला पण उशीर झाल्याने आम्ही निघायचा निर्णय घेतला कारण आम्हाला अजून ३५-४०कीमी बाईकने जायचे होते. आम्ही पार्किंगचे देऊ केलेले ५० रु. "काय राव हे म्हणजे मला लाच घेतल्यासारखं वाट्टय" असं म्हणून ते नाकारत होते पण आम्ही बळेबळे दिवाळीची भेट म्हणून ठेवा असे सांगत त्यांना ते पैसे घेण्यास भाग पाडले. गारवा वाढल्याने एकावर एक शर्ट घालून आम्ही निघालो. वाटेत मस्त अंधार, गार वारा आणि आमच्या ३ बाईक्स असा प्रवास सुरु होत. नटराजमधे पोटभर खाल्लं, आणि मग घरी पोचलो. घरी आल्या आल्या मस्त डेटॉल टाकून अंघोळ केली आणि ट्रेक्सच्या आठवणीमधे गाढ झोपून गेलो.

ज्यांना राजगड-तोरणा करायचा आहे त्यांच्यासाठी:
१.पुण्याहून गुंजवणे अथवा वाजेघर बस पकडून राजगड करावा. बाईक असेल तर खरीव गावात गाड्या सोडाव्यात.
२.राजगड करावा आणि रात्री तिथेच रहावे.
३.दुसऱ्या दिवशी संजीवनी माचीमार्गे तोरणाला जावे.
४.तोरणा उतरून वेल्हा गावात यावे, तिथून उतरुन पुण्याची बस अथवा नसरापूर फ़ाट्याची जीप घ्यावी.

काही महत्वाचे:
१.निदान २ लिटर पाणी राज्गद ते तोरणा वाटेत असावे. वाटेत अजिबात पाणी उपलब्ध नाही.
२.खायचे जरूर बरोबर घ्या अंगात शक्तीच नसेलतर काहीच करता येणार नाही.
३. टोपी अथवा डोक्यावर रुमाल अतिशय महत्वाचा आहे.
४.सर्व पायवाट ठळक आहे, आणि तोरणा नेहमी तुमच्या उजव्या हाताला दिसत राहीला पाहीजे हेय लक्षात ठेवावे. बुधल्याकडे सतत लक्ष ठेवणे म्हणजे चुकायला होणार नाही. आणि मुख्य म्हणजे सगळी वाट डोंगरमाथ्यावरूनच जाते.
५. तुमच्या ट्रेकला शुभेच्छा :)

बाकीचे फोटोज येथे पहावे....

Labels: , , , , , , , , ,

Tuesday, September 22, 2009

तोरणा-गडांचा आणि फ़ुलांचा राजा.

तोरणा-गडांचा आणि फ़ुलांचा राजा.
आगबोटी सारखा दिसणारा तोरणा उर्फ़ प्रचंगड

तसं तोरण्याला आम्ही जुलैमधेच जाऊन आलो होतो, पण तेव्हा फ़क्त धुके-ढग आणि पाउस ह्याशिवाय काही दिसलेच नव्हते.असं ऐकलं होतं की तोरण्यावर सप्टेंबरमधे फ़ुलांचा सिझन असतो. बऱ्याच लोकांच्या ब्लॉगवर सुद्धा अप्रतिम असे फोटोज पाहीले होते.त्यामुळे मी ठरवलेच होते की काहीही झाले तरीही सप्टेंबरमधे तोरण्याला भेट द्यायचीच, त्यामुळेच गेल्या रवीवारी तोरण्याचा योग जुळवून आणलाच अर्थात मी ह्याचे श्रेय मक्याला देइन, कारण तो आला नसता तर मला घरीच बसावे लागले असते.


रस्त्याच्या बाजूची काही दृश्ये

रविवारी सकाळी ६.२०ला मी मक्याला धनकवडीवरून बाईकने उचलले आणि आम्ही सिंहगड रोडकडे निघालो, खानापूर फ़ाट्याला वळून पुढे निघालो. पावसाळ्यात ह्या भागाच पूर्ण कायापलट झालेला असतो. सगळ्या जमीनीवर म‍ऊ लुसलुशित गवताची दुलई पसरवल्यासारखी वाटत होती, जमीनीवर माती दिसतच नव्हती जिथे पहावे तिथे डोळ्यांना सुखावणारा हिरवागार रंग होता. मग लगेचच आम्ही पाबे खिंडीचा रस्ता पकडला, पाबे घाट तर अप्रतिम आहे, दोन्ही बाजूंनी झाडे, मधेच हिरवीगार मैदाने, धुव्वा वाहणारे ओढे, किलबील करणारे पक्षी, निरनिराळी फुलपाखरे, सगळा परीसर कसा स्वप्नवत सुंदर आहे. एका वळणावर छान पिवळ्या रानफुलांनी आमचे स्वागत केले, मग मी आणि मक्याने लगेचच कॅमेरे काढून फोटोज काढायचा सपाटा लावला. मनासारखे फोटोज झाल्यावर परत निघालो, मग जवळ जवळ प्रत्येक १-२ वळणांवर आम्ही थांबून फोटोज काढत होतो. खिंड पार केली आणि आम्ही चकीत झालो, प्रत्येक डोंगरावराच्या हिरव्या दुलईवर पिवळ्या रंगाची नक्षी केलेली होती. तसेच सर्व परीसरात विविधरंगी फुले उमललेली होती.परत अधाश्यासारखे आम्ही भरपूर फोटो काढले आणि पुढे निघालो.





खिंडीमधील काही दृश्ये

खिंडीची उतरण संपल्यावर डावीकडे एक मोठ्ठे पठार लागते, ते पठार पाहीले आणि करकचून डिस्क ब्रेक मारले. काय दृश्य होतं ते, शब्दात वर्णन करणचं खूप अवघड आहे. संपुर्ण पठारवर फुलांचे आच्छादन होते, नजर जिथे जाइल तिथे फुलेच फुले, कोणत्याही दिशेला पहा फ़क्त फुलेच फुले. अनुष्का बरोबर असती तर तीने तिथेच मुक्काम ठोकला असता, आणि मलासुद्धा तिचे मनमोकळेपणे फुलांमधे फ़िरतानाचे फोटोज काढता आले असते, बघू पुढच्या शनिवार-रवीवार मधे जमवतो आणि तिला घेउनच जातो. सगळी एकाच प्रकारची परंतु इतकी फुले मी कधीच पाहीली नाहीत. तिथेही खूप फोटोज काढले, एव्हाना आम्हाला हळू-हळू तोरण्यावर तर कीत्ती फुले असतील ह्याची कल्पना यायला सुरुवात झाली होती. घड्याळात ९ वाजत आले होते आणि पोटात भुकेने १२ वाजले होते, जड मनानेच आम्ही त्या सुंदर पठाराचा निरोप घेतला आणि पुढच्या १० मिनिटसमधे वेल्हे गावात पोचलो. तिथेच ब्रेड आमलेट खाल्ले, १ पार्सल घेतले :) आणि ९.३० वाजता गड चढायला सुरुवात केली.
फुलांनी भरलेले पठार


गडाच्या वाटेवरील काहे दृश्ये

वाटेवरच्या प्रत्येक डोंगरावर फुले उगवलेली होती, उन अगदी लख्ख होते, त्यामूळे त्या चमचमत्या हिरव्या गवतावर ती अगणीत पिवळी फुले फ़ारच सुंदर दिसत होती. मधे मधे तेरड्यानेपण रंगाची उधळण केली होतीच, निवांत चालत फोटो काढणं चालूच होतं. मी आणि मक्या इतकी फुले पाहून हरखून गेलो होतो. पहीला टप्पा पार पडल्यावर मात्र सर्व फुले गायबच झाली. उन चांगलेच जाणवत होते, तोरण्याची वाट तशी डोंगरमाथ्यावरूनच जाते, त्यामूळे वाटेवर झाडे-सावली हा काहीही प्रकार नाही. उन चांगलेच होते आणि त्यात भर म्हणजे जमीनीतून बाहेर येणारा दमटपणा भयानक होता.झालं माझी दमछाक सुरु झाली :P मला माहीत नाही परंतु हल्ली माझ्या छाती हल्ली अचानक भरून येते, म्हणजे कोणीतरी माझी छाती दाबून ठेवलीये असचं वाटतं, हा प्रकार पहील्यांदा मला मागच्या राजगड ट्रेकच्या वेळेस आला, पण तेव्हा फ़ार जास्त उन होते आणि चढपणा बराच होता, तुलनेने तोरण्याच्या सुरुवातीला इतका चढ अजिबात नाहीये, असो मला डॉक्टरांना हे सांगायला हवे. संपुर्णवाट डोंगराच्या बाजुनेच असल्याने आम्ही यथेच्छ भाजले गेलो, दमलो म्हणून बसायची सोयच नव्हती कारण ११ वाजलेले आणि सुर्यदेव बरोबर डोक्यावर यायल सुरुवात झाली होती, बसून एनर्जी घालवण्यापेक्षा चाललेले बरे म्हणून मग वाटचाल सुरुच होती. मधे-मधे जिथे सावली मिळेल तिथे माझे डोके घालून दम खाऊन घेतला, तसा बाकी पर्याय काहीच नव्हता मग तुर्तास मी सुर्यदेवांना दया दाखवायची याचना केली, आणि त्यांनीही आम्ही वर पोहचेपर्यंत ढगाआड जाऊन ती मान्य केली. बिनी दरवाजाने आत गेल्याक्षणी आम्हाला अत्यानंद झाला, जय भवानी - जय शिवाजी अश्या ललकाऱ्या उठल्या. परत एकदा तोरण्यावर यशस्वीपणे चढाई करण्यात आम्ही यशस्वी झालो.


बिनी दरवाजाच्या पुढची वाट

बिनी दरवाज्यातून पुढे जाताना मात्र फ़ुलांच्या तोरण्याने आमचे स्वागत केले. वाटेच्या दोन्ही बाजूंनी तेरड्याने आणि इतर रानफ़ुलांनी रंगांची उधळण केली होती. त्या बेलाग तटबंदीच्या काळ्या-कुळकुळीत पाषाणांच्या पार्व्शभूमीवर ती रंगांची उधळण अजूनच खुलून दिसत होती, परत कॅमेरे बाहेर निघाले आणि फोटोजचा पाउस पाडला. मग २ऱ्या दरवज्यातून आत गेलो, तिथेच एका गावकऱ्याकडून मस्तपैकी लिंबूसरबत घेतले. लिंबूसरबत घेतल्याक्षणी आमचा थकवा दुर पळून गेला.आजू-बाजूला, वर-खाली चहूकडे फुलेच-फुले फ़ुललेली होती, पिवळी, निळी, पांढरी, गुलाबी, जांभळी इत्यादी. आणि फुलांचे ताटवे काय म्हणणार, फुलांचे रानच म्हणायला लागेल इतकी फुले फ़ुलली होती. मला १ बरं वाटलं की जे ऐकलं होतं, पाहीलं होत ते खरच तसचं आहे ह्याची मला प्रचिती आली. मुख्य म्हणजे इतकी मस्ती करून गडावर आलो त्याचे पुरेपूर सार्थक झाले. मग आम्ही मेंगाई देवीच्या मंदिरात गेलो, तिथे देवीला नमस्कार केला, आणि छान जेवून घेतले. मग तिथेच १०-१५ मिनिटे आराम केला आणि मग झुंझार माची पहायला गेलो.



झुंझार माचीवरील काही दृश्ये

माचीच्या वाटेवर परत तशीच फुले दिसून आली, तस म्हणायचं तर पुर्ण गडावर फुले होतीच. माचीची शिडी पाहीली, पण आम्ही काही खाली उतरलो नाही,बाजूच्याच बुरुजावरून माचीचे काही सुंदर फोटोज काढले, दरीत वाकून पाहीले तर संपुर्ण दरीसुद्धा फुलआंनी भरलेली होती. तिथुन मग मागे फ़िरलो, ढग दाटून आलेले होते, पण पाउस पडत नव्हता. तिथून आम्ही बुधला माचीकडे जायला सुरुवात केली. ढासळलेल्या बुरुजापासून जपत आम्ही निघालो, संपूर्ण वाट ढगांनी वेढली गेली होती. मुख्य समस्या वाटेवरच्या झुडूपांची होती. झुडूपे खूप वाढली होती त्यामूळे पायाखालचा रस्ता दिसणेच मुश्किल झाले होते, मधेच घसरत, धडपडत आम्ही चालत होतो. बुधला माची गडापासून बरीच लांब आहे, आम्ही २० मिनिटस चालत होतो पण रस्ता संपायलाच तयार नव्हता, एक शंका आली की रस्ता चुकलो की काय आणि तितक्यात ढग थोडेसे बाजूला झाले आणि काही लोकांचा आवाज ऐकू आला. आम्ही हुश्श..करत परत चालायला सुरुवात केली, वाट अतिशय निसरडी झाली होती. पाउस पडत नव्हता पण चालण्याने तुडवल्या गेलेल्या झुडूपांमूळे रस्ता निसरडा झाला होता, तसेच सावरत आम्ही बुधला माचीच्या मोठठ्या दगडापाशी पोचलो, ढगामूळे काहीही दिसत नव्हते, आम्ही मग एक छोटासा पॅच करून बुधल्याच्या दगडापाशी पोचलो आणि मग आता काय बघणार म्हणून परत जायला वळलो. थोडे अंतर पुढे चालून आलो आणि जस्ट मागे वळून पाहीलं आणि स्तंभित झालो, २ मिनिटस वाटलं की च्यायल स्वित्झरलँडला आलो की काय!!!

मी आणि मक्या




बुधला माचीवरील काही दृश्ये

वारा वाहत होता आणि ढगांचे पडदे दुर सारू लागला. ते सुंदर दृश्य मी शब्दामधे वर्णन करून नाही सांगू शकत. बुधल्याचा दगड अस्पष्ट दिसू लागला, कापूस उडावा तसे ढग अजून बाजूला झाले आणि बुधलामाची दिसू लागली, आम्ही लगेच ते सुंदर क्षण कायमचे डिजीटाइज करून घेतले. ती आणि अशीच अनेक सुंदर दृश्ये साठवत आम्ही मेंगाई देवी मंदिराजवळ परत आलो. एव्हाना ३ वाजले होते, गडावरून अक्षरश: पाय निघतच नव्हता, मोठया मुश्किलीने आम्ही गडावरून उतरायचा निर्णय घेतला. जड मनाने आम्ही खाली उतरू लागलो, शरीर खाली-खाली उतरत होते, पण आमचे मन मात्र तोरण्यावरच ढगांसारखे त्या फुलांवर तरंगत राहिले होते.

खेड-शिवापूर रस्त्यावर दिसलेली सुंदर संध्याकाळ

बाकिचे फोटोज येथे पहा:-


Labels: , , , , , , , , ,