Monday, November 16, 2009

वाफ़ाळता लाल चिकन शेजवान

परवा ऑफ़िसमधून परत जाताना लाल शेजवान राइस दिसला आणि मनात असंख्य आठवणी जाग्या झाल्या.
मी, अभिषेक आणि अंड्या (निलेश) सदाशिव पेठेमधे एक फ़्लॅट घेऊन राहात होतो. मी आणि अंड्या नोकरीवाले तर अभ्या स्टुडंट. फ़्लॅट १ रूम-किचन, छोटी बाल्कनी, निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानीच्या अगदी वर असा आमचा फ़्लॅट.

रोज सकाळी सुरभी अमृततुल्यमधे चहा आणि दोन छोटी बिस्किटे, नंतर जवळील एका दुकानात शिरा-पोहे , पोहे आणि त्या जोडीला १ सामोसा किंवा १ बटाटा वडा अगदी ठरलेला, मग अंड्याने माझ्यातले पोहे अणि शिरा खाणे आणि मी तसे करू नये म्हणून त्याने उपमा घेणे हे अगदी नित्यनेमाने चालत असे. संध्याकाळी समोरच्या गाडीवरची कच्छी दाबेली किंवा १२ रुपयाचे चीज-पोटॅटो सॅंडविच ठरलेले. रात्री अथर्वमधे जाऊन २० रु. मिनी थाळी. असा दिनक्रम अगदी ठरलेला.

दर शनिवार-रविवार मस्ती, बाहेरील खाणे, एकत्र भटकणे, मुली बघायला जाणे, तंगड्या तोडणे, एस.पी. बाहेरील भुर्जी पाव आणि अंडा राइस हे अगदी ठरलेले होते. त्यावेळी आम्ही बऱ्याच गाडयांवरचा भुर्जी-पाव खाल्लेला होता :) आणि बऱ्याच हॉटेलमधल्या कोंबड्यापण हाणल्या होत्या. घरी पार्सल आणल्यावर एकत्र बसून १४ इंची मॉनिटरवर किमान १०० वेळा तरी जत्रा पिक्चर आम्ही पाहीला असेल. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळा आम्ही आग्री शोले पाहीले असतील. संदिप खरे, गारवा ह्याचे भरपूर विडंबनसुद्धा आम्ही केले होते. अमित, नचिकेत, संदिप असे मित्र जमवून घरीच एकत्र लाल चिकन शेजवान राइस, त्या जोडीला मस्त मंचुरियन ग्रेव्ही, सुजाताची पिस्ता/मँगो मस्तानी (१ बाय २), लाल चिकन लॉलिपॉप असा भरगच्च बेत ठेवून पार्ट्या केल्या होत्या.

एकाची बाजू घेऊन दुसऱ्याची यथेच्छ खेचणे हा अगदी नित्यनेमाचा कार्यक्रम होता, मधे काही दिवस अनिकेतपण ह्या सगळ्या मस्तीमधे सामील होता. मग नंतर रोहन रहायला आला, मग आमच्या मस्तीला अजूनच उत चढला होता. आमच्या फ़्लॅटवर मंदार, सुशांत पण रहायला आले होते, तेव्हा परत मग लाल पार्टी, गारवा विडंबन, जत्राचा खास शो, आग्री शोले इत्यादी परत परत केले होते. एकत्र बसून भरपूर गाणी ऐकली होती.

हा....भरपूर आठवणी एकदम समोर येउ लागल्या, मला अजूनही त्या दिड वर्षात केलेली धमाल आठवत राहते. कालांतराने आम्ही सर्वांनी हळू-हळू तो फ़्लॅट सोडला/बदलला. पण त्या आठवणी मात्र दिड वर्षे झाली तरी अगदी ताज्या आहेत, मला आठवतय अभिषेक नेहेमी म्हणायचा की विनीत, अंड्या "आपण कायम असेच एकत्र राहुयात जबरी मजा येइल, काही चिंता नाही, मागण्या नाहीत, विचार नाहीत, फ़क्त मस्त जगायच आणि एंजॉय करत रहायचं" पण खरचं खूप मजा आली असती, असो बराच उशीर झालाय त्याला आता. आम्हाला कायम एकत्र राहता तर नाही येणार पण वर्षातून एकदा काही दिवस परत अस एकत्र रहायला मला खूप-खूप आवडेल, आणि कदाचित अंड्या, अभिषेक आणि रोहनला पण आवडेल. परत एकदा तो वाफ़ाळता लाल चिकन शेजवान खायची फ़ार इच्छा आहे :)

जाता जाता इतकाचा म्हणेन की "Those were the Best days of my life"

Labels: , , , , ,

Tuesday, September 30, 2008

मित्रा आपण परत कधी भेटणार रे??

माझा १ मित्र १०-१५ दिवसांमधे कॅनडाला जातोय, बहुतेक तो तिथे १-२ वर्षे तरी राहीलच, तसे माझे पुष्कळ मित्र आता अमेरिकेमधे आहेत,आमचा कॉलेजमधील वर्ग साधारण ६०-७० विद्यार्थ्यांचा असेल आणि मी खात्रिपुर्वक सांगू शकतो की ह्याक्षणी त्यातील ५० तरी अमेरिकेमधेच असतील.एकाप्रकारे अभिमान वाटतो की सर्वांनी छान प्रगती केली आहे, आणि सर्वजण चांगले, सुखाचे आयुष्य जगत आहेत, आम्हा १० जणांचा १ फोटो मिळाला, त्यातले फ़क्त ३ (मला धरून) अता इथे आहेत, बाकी परत कधी भेटतील काय माहीत??


तिकडे मिलणारा पैसा, शांतता, भौतिक सुखासिनता सगळ्यांच आवडते त्यामूळे परत एकदा अमेरिकेमधे सेटल होण्याचे प्रमाण वाढत आहे. माझे अगदी जवळचे मित्र पण तिथेच सेटल होतील, आणि कदाचित कधीच परत येणार नाहीत. पण आता एकटं एकटं वाटू लागलय, कारण आई-वडील, भाऊ-बहिण, बायको ह्यापैकी कोणीच मित्रांची जागा घेउ शकत नाहीत. कधी कधी वाटत कि मस्त मित्रांबरोबर भरपूर फ़िरावं, कट्ट्यावर चकाट्या पिटाव्या, एखाद्याची भरपूर खेचावी, कॉलेजमधील "त्या" मूलींबद्दल गप्पा माराव्यात, खांद्यावर हात टाकून तासन्‌तास्‌ फ़र्ग्युसन रोडवर फ़िरावं आणि अजूनही बरीच मोठ्ठी यादी तयार करता येइल. पण ते अता शक्यचं नाहीये, तुम्ही म्हणाल मला लॉंग टर्मचा चान्स मिळत नाही म्हणून मी जळतोय, पण तसं नाहीये हो, मीपण तिथे जाउन आलोय पण मला तिथे करमतच नव्हतं कारण मस्ती करयला तिथे माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, आणि आता मी इथे आहे तर मस्ती करणारे तिकडे गेलेले आहेत :) कधी कधी त्यांना स्क्रॅप करतो, चॅटींगपण करतो, पण त्यातून काहीच जिव्हाळा वाटत नाही. आता असं वाटत की उरलेले मित्रपण तिकडे गेले तर कसं होणार?

मला परत इतके चांगले मित्र कसे काय मिळणार? आय.टीचे दुष्परिणाम मला असे होत आहेत :) अता फ़क्त उरलेला आयुष्य माझ्या जून्या मित्रांशिवाय काढावे लागू नये हीच देवाकडे प्रार्थना करतो. अरे मित्रांनो परत आलात की फोन करा रे..मधे मधे मेल्स्‌ करत जारे..तेव्हडच जरा बरं वाटतं, तुम्ही मला विसरला असाल पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीही हाक मारा, मी नक्की मदत करायचा प्रयत्न करीन.

के.के. च्या "अरे यारो" ह्या गाण्यामधील खालील काही ओळी किती योग्य आहेत नाही का?

"तेरी हरएक बुराईपे, दांटे वोह दोस्त,
गमकी हो धूप तो छाया बने, तेरा वोह दोस्त,
नाचे भी वोह तेरी खुशी मे;

अरे यारो दोस्ती बडीही हसीन है,
ये ना हो तो क्या फिर,बोलो जिंदगी है"

Labels: , ,