परवा ऑफ़िसमधून परत जाताना लाल शेजवान राइस दिसला आणि मनात असंख्य आठवणी जाग्या झाल्या. मी, अभिषेक आणि अंड्या (निलेश) सदाशिव पेठेमधे एक फ़्लॅट घेऊन राहात होतो. मी आणि अंड्या नोकरीवाले तर अभ्या स्टुडंट. फ़्लॅट १ रूम-किचन, छोटी बाल्कनी, निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानीच्या अगदी वर असा आमचा फ़्लॅट.
रोज सकाळी सुरभी अमृततुल्यमधे चहा आणि दोन छोटी बिस्किटे, नंतर जवळील एका दुकानात शिरा-पोहे , पोहे आणि त्या जोडीला १ सामोसा किंवा १ बटाटा वडा अगदी ठरलेला, मग अंड्याने माझ्यातले पोहे अणि शिरा खाणे आणि मी तसे करू नये म्हणून त्याने उपमा घेणे हे अगदी नित्यनेमाने चालत असे. संध्याकाळी समोरच्या गाडीवरची कच्छी दाबेली किंवा १२ रुपयाचे चीज-पोटॅटो सॅंडविच ठरलेले. रात्री अथर्वमधे जाऊन २० रु. मिनी थाळी. असा दिनक्रम अगदी ठरलेला.
दर शनिवार-रविवार मस्ती, बाहेरील खाणे, एकत्र भटकणे, मुली बघायला जाणे, तंगड्या तोडणे, एस.पी. बाहेरील भुर्जी पाव आणि अंडा राइस हे अगदी ठरलेले होते. त्यावेळी आम्ही बऱ्याच गाडयांवरचा भुर्जी-पाव खाल्लेला होता :) आणि बऱ्याच हॉटेलमधल्या कोंबड्यापण हाणल्या होत्या. घरी पार्सल आणल्यावर एकत्र बसून १४ इंची मॉनिटरवर किमान १०० वेळा तरी जत्रा पिक्चर आम्ही पाहीला असेल. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळा आम्ही आग्री शोले पाहीले असतील. संदिप खरे, गारवा ह्याचे भरपूर विडंबनसुद्धा आम्ही केले होते. अमित, नचिकेत, संदिप असे मित्र जमवून घरीच एकत्र लाल चिकन शेजवान राइस, त्या जोडीला मस्त मंचुरियन ग्रेव्ही, सुजाताची पिस्ता/मँगो मस्तानी (१ बाय २), लाल चिकन लॉलिपॉप असा भरगच्च बेत ठेवून पार्ट्या केल्या होत्या.
एकाची बाजू घेऊन दुसऱ्याची यथेच्छ खेचणे हा अगदी नित्यनेमाचा कार्यक्रम होता, मधे काही दिवस अनिकेतपण ह्या सगळ्या मस्तीमधे सामील होता. मग नंतर रोहन रहायला आला, मग आमच्या मस्तीला अजूनच उत चढला होता. आमच्या फ़्लॅटवर मंदार, सुशांत पण रहायला आले होते, तेव्हा परत मग लाल पार्टी, गारवा विडंबन, जत्राचा खास शो, आग्री शोले इत्यादी परत परत केले होते. एकत्र बसून भरपूर गाणी ऐकली होती.
हा....भरपूर आठवणी एकदम समोर येउ लागल्या, मला अजूनही त्या दिड वर्षात केलेली धमाल आठवत राहते. कालांतराने आम्ही सर्वांनी हळू-हळू तो फ़्लॅट सोडला/बदलला. पण त्या आठवणी मात्र दिड वर्षे झाली तरी अगदी ताज्या आहेत, मला आठवतय अभिषेक नेहेमी म्हणायचा की विनीत, अंड्या "आपण कायम असेच एकत्र राहुयात जबरी मजा येइल, काही चिंता नाही, मागण्या नाहीत, विचार नाहीत, फ़क्त मस्त जगायच आणि एंजॉय करत रहायचं" पण खरचं खूप मजा आली असती, असो बराच उशीर झालाय त्याला आता. आम्हाला कायम एकत्र राहता तर नाही येणार पण वर्षातून एकदा काही दिवस परत अस एकत्र रहायला मला खूप-खूप आवडेल, आणि कदाचित अंड्या, अभिषेक आणि रोहनला पण आवडेल. परत एकदा तो वाफ़ाळता लाल चिकन शेजवान खायची फ़ार इच्छा आहे :)
जाता जाता इतकाचा म्हणेन की "Those were the Best days of my life"
मी किल्ल्यांवर जायला सुरुवात केल्यापासूनच ह्या गडाचे नाव ऐकून होतो, पण बरीच वर्षे झाली तरीही ह्या गडासाठी मुहुर्त सापडत नव्हता. काहीना काही कारणांमूळे गडावर जाणे सतत पुढे जातच होतं. शेवटी एकदाचा शनिवारच म्हणजेच २४-२५ ऑक्टोबरचा मुहुर्त जमून गेला. नेहेमीप्रमाणे ५-६ जणांपासून सुरुवात करून शेवटी मी आणि नाशिक असे दोनच मावळे उरलो :) पण एकदा ठरले म्हणजे ठरले आता मागे हटायचं नाही असे ठरवून आम्ही दोघं तर दोघचं जायचच असा ठाम निच्शय करून तो पुर्ण केला.
हा गड बराच जूना आहे. ह्याची उंची साधारण ४६७१ फ़ूट आहे. विकीपीडीयानुसार सुमारे ६व्या शतकापासून हरिशचंद्रगड अस्तित्वात आहे. मस्त्यपुराण, अग्निपुराण आनि स्कंदपुराणातसुद्धा ह्याचा उल्लेख आढळतो. ह्याच शतकात ह्यावर तटबंदी असल्याचा उल्लेख आहे.येथील मंदीर आणि खोदीव गुहा ११व्या शतकातील आहे असे मानले जाते. येथील हरिशचंद्रेश्वराचे मंदीर हेमाडपंथी कलाकौशल्याचा १ सुंदर नमूना आहे, आणि अजूनही बरेच सुस्थितीत आहे. त्यावरील कोरीव शिल्प अता पुसट झालेली आहेत, परंतु बांधकाम अजूनही चांगले आहे. परंतु ह्या मंदीराच जिर्णोद्धार करणे अतिशय गरजेचे झाले आहे नाहीतर इतका सुंदर ठेवा लवकरचं काळाच्या पडद्यामागे निघून जाईल. मराठयांनी हा गड १७४७ म$E0��े मोगलांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ह्या गडाचे ऐतिहासिक उल्लेख फ़ारसा माहीत नाही. तसेच गडावर तारामती आणि रोहिदास अशी शिखरे आहेत. तारामती शिखर सह्याद्री पर्वतरागांमधील महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तसेच येथील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे येथील कोकण कडा. कठीणा दगडापासून बनलेली अभेद्य भिंतच जणू. हा कडा वक्राकार आहे, आणि कॅमेराच्या एका फ़्रेममधे हा बसणं शक्यच नाही. जर परिस्थिती योग्य असेल तर येथे इंद्रवज्र (संपुर्ण गोल इंद्रधनुष्य) दिसु शकते. तसेच इथे ढगांचा एक अनोखा खेळ बघायला मिळतो. कड्याच्या काठावरील ढग अचानक खाली ओढला जातो आणि लगेचच सरळ सुमारे ५०फ़ूट वर भिरकावला जातो. त्यामूळे अश्या उभ्या ढगांची १ तलम भिंतच कड्याच्या काठावर तयार होते. अर्थात ह्यासाठी तुम्ही पावसाळ्यात येथे जायला हवे आणि तुमचे नशीब अतिशय चांगले पाहीजे, कारण ही सगळी दृश्ये अतिशय दुर्मिळ आहे.
हरिशचंद्रेश्वराचे मंदिर(विकीपीडीया कडून साभार)
पुण्यावरूनकसेजावे? हरिशचंद्रगडाला जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहे. परंतु खिरेश्वर गावातून जाणारी वाट प्रचलित आहे, आणि आम्हीसुद्धा त्याच वाटेने जायचे ठरवले. पुण्याहून खिरेश्वरला जाण्यासाठी नाशिक रोड पकडावा आणि आळेफाट्यापर्यंत प्रवास करावा (सुमारे ९५ कि.मी.). आळेफ़ाट्यावरून डावीकडे वळावे. हा रस्ता माळशेज घाटमार्गे कल्याणला जातो. येथे तुम्हाला हरिशचंद्रगड (३५ की.मी) असे दिसेल. ह्या रस्त्यावरून खुबी फ़ाट्यापर्यंत जायचे. खुबी फ़ाटा असे नाव तुम्हाला जन्मात रस्त्यावर कुठेही दिसणार नाही :D त्यामूळे दुसरी एक खूण लक्षात ठेवावी लागते. ह्या रस्त्यावर "मढ" नावाचे गाव लागते. त्यापासून सुमारे ३ कि.मी अंतरावर हा फाटा आहे. उजव्या हाताला एक मोठा बंधारा दिसतो, हाच बंधारा तुम्हाला खिरेश्वरला घेऊन जातो. हा बंधारा पुष्कळ रुंद आहे आणि ह्यावरून वडापची (जीप) वाह्तूक असते. मुख्य रस्त्यापासून खिरेश्वर सुमारे ५ कि.मी. आहे. त्यामूळे चालत जाऊन शक्ती वाया घालवण्यापेक्षा सरळ ह्या जीपने प्रवास करावा, जवळ जवळ सर्व ब्लॉगवर हा उल्लेख नाही, नुसतेच बंधाऱ्यावरून चालत जायचे अशी अर्धवट माहीती आढळते. आम्हाला आधी वाटले हा बंधारा अगदीच छोटा असेल पण हा बंधारा अगदी २ बस जातील इतका मोठा आहे.
तर मी सकाळी ५ ला पाषाणहून माझ्या घरातून निघालो, बुधवारात संदीपला(म्हणजेच नाशिकला) उचलले. आणि मग आम्ही गप्पा मारत मारत रस्त्याला लागलो. पहाटे वर्दळ नसल्याने अगदी सहज ८०च्या स्पिडने गाडी पळत होती. मधे नित्यनेमाने टोलची लूट झाल्यावर सुमारे अडिच तासांनी आम्ही आळेफाट्याला पोचलो आणि लगेचच माळशेज घाटाच्या रस्त्याला लागलो. आळेफ़ाटा ते खूबीफाटा हा रस्ता अतिशय सुंदर आहे. दोन्ही बाजूला डोलणारी शेती, हिरवीगार झाडे, त्यावर पडणारी सुर्याची कोवळी किरणे पाहून मन प्रसन्न झालं होत. नंतर मात्र उंच डोंगर दिसूअ लागले. मी आणि नाशिक पहिल्यांदाच येथे येत होतो, त्यामूळे आम्हाला हरिशचंद्रगड कसा दिसतो आणि नक्की कोणत्या दिशेला आहे ह्याची कल्पना येत नव्हती. मधे मधे थांबून काही फोटोज काढले. आधी सांगितल्या प्रमाणे खुबीफाटा हा प्रकार काही दिसला नाही. परंतु डावीकडे एक बंधार दिसला आणि त्यावरून बऱ्याचश्या "सॅक्स" जाताना दिसल्या, कोपऱ्यावरच्या हॉटेलवाल्याला विचारले तर आमचा अंदाज खरा ठरला. मग त्या खडकाळ बांधावर मी माझ्या बिचाऱ्या मारुती ८०० ला चालायची विनंती केली आणि तीनेही ती मान्य केली. सुमारे ५ कि.मी.चे अंतर आम्ही बोटीमधे बसल्याप्रमाणे डुलत-कलत १५-२० मिनिटस् मधे पार केले, आणि आम्ही खिरेश्वरला पोचलो.
तोलार खिंडीमधे
ट्रेकला सुरुवात...समोरील "व्ही" आकाराच्या बाजूने चढाई आहे.
जवळील एका घरवजा हॉटेलमधे पोहे खाल्ले आणि गाडी त्याच्या भरोश्यावर पार्क केली. बहुतेक सगळ्या ठिकाणी माझी बेइज्जती होणे अता काही नवीन राहीलेले नाही. मी त्या माणसाला "गडाकडची वाट कुठं" असं विचारल तर त्या साहेबांनी समोरील कागदावरून डोकं न काढता "हं..ते तिकडं" इतकच उत्तर देऊन पेपरसकट फ़क्त मनगट उचलून मला दाखवल. मी तोंडातल्या तोंडात २-४ शिव्या हासडून पटापटा पोहे संपवले. ते झाल्यावर बॅगेतून टोपी, गॉगल, रुमाल इत्यादी गरजेची सामग्री बाहेर काढली. जर तुम्हाला पाणी हवे असेल तर खिरेश्वरलाच भरून घ्या कारण नंतर फ़क्त गडावर गेल्यावरचं पाणी मिळते. आमच्याप्रमाणेच बरेच ग्रूप्स जमले होते, त्यातील एका व्यक्तीला गडाची वाट नीट विचारून घेतली. तर ही वाट "तोलार खिंड" म्हणून प्रचलित आहे. डोंगराच्या एका बाजूने ही वाट चढते आणि नंतर एकदम उभी होते. तशी ही वाट पुर्णपणे दाट जंगलातून जाते, त्यामूळे उन्हाचा काहीच त्रास न होता आम्ही अगदी व्यवस्थित न थांबता चढत होतो. माझ्यासाठे न फ़ुगता चालणे म्हणजे मोठ्ठी कौतुकाची गोष्ट होती :p, तोलारखिंड पार झाली की आपण एका रॉकपॅचपाशी येतो. तसा हा पॅच मूळीच अवघड नाही, कारण जागोजागी पाय ठेवायला व्यवस्थित खोबण्या केलेल्या आहेत. अर्थात म्हणून काळजी न घेता अतिशहाणपणा करून चढू नये ही नम्र विनंती. येथे रेलींगसुद्धा होते, परंतु रेलींगचे पाइप कधीच चोरीला गेलेले आहेत, फ़क्त दगडात बसवलेले लोखंडी खांब शाबूत आहेत. अर्थात त्यांचा आधार घ्यायची वेळ फ़ारशी येत नाही. हा पॅच झाला की आपण डोंगराच्या माथ्यावर येऊन पोचतो. येथे पहीला टप्पा संपतो.येथून खिरेश्वरचा बांध तसेच तोलारखिंडीचा रस्ता व्यवस्थित दिसतो. इथे यायला आम्हाला साधारण दिड तास लागला.
स्वच्छ-नितळ पाणी
पहिल्या टप्प्यावरील पठार
फुलांचे पठार
खिरेश्वरला येणारा बांध
रॉकपॅच
तेथे नशीबाने एक लिंबूसरबतवाला होतो, तिथे छान लिंबूसरबत घेतले आणि तरतरी आली. तिथेच आम्हाला डोंबीवलीवरून आलेला १ ग्रूप भेटला. त्यातील प्रमूख श्री.सतीश गायकवाड हे अत्यंत अनुभवी ट्रेकर, त्यांच्याशी ओळख झाली, मग त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता मी आजूबाजूचा प्रदेश पहात होतो. येथील जवळ-जवळ सगळेच डोंगर अगदी छिन्नी-हातोडीने घडवल्याप्रमाणे ताशीव होते. वरती पठार आणि नंतर एकदम फ़्री-फ़ॉल, उंचच्या-उंच ताशीव कडे. प्रत्येक पठारावर छान मखमली हिरवळीचे गालीचे पसरलेले होते, आणि अर्थात विविध रंगी फुलांचे ताटवे होतेच. पुरेशी विश्रांती घेऊन आम्ही सगळेच, म्हणजे मी, नाशिक आणि डोंबीवलीचा ग्रूप (मॅड = माउंटेनर्स असोसिएशन ऑफ़ डोंबीवली) पुढचा टप्प्यासाठी निघालो. पुढचा टप्पा म्हणजे खरं तर २-४ छोट्या टेकड्या चढ-उतार करणे आणि पुष्कळ पायपीट असा आहे. पायवाट तशी व्यवस्थित आहे, त्यामूळे चुकायचा प्रश्न नाही. एव्हाना १०.३० झाले होते आणि उन बऱ्यापैकी जाणवत होते. मधेच चढ-उतार, मधेच सरळ वाट असे प्रकार सुरु होते. मला प्रंचड खोकला झालेला होता, आणि कफ़ाने छाती भरलेली होती. जरा वेळाने मला जरा त्रास होत होता, पण मग मी थांबून मनसोक्त खोकून परत चालत होतो. मधे बरेच छोटे-छोटे वाळत चाललेले पाण्याचे स्त्रोत लागले. ह्यातील पाणी अतिशय थंड आणि स्वच्छ होते. आम्ही तेच पाणी पीत होतो, आणि त्याची चव सुद्धा छान गोड होती. मधे एका ठिकाणी फ़क्त दगडाची छोटी तटबंदी दिसते. साधारण दोन तासाने एका पठारावरून एक भगवा झेंडा आणि त्यामागील तारामती शिखर दिसू लागले. एव्हाना १२ वाजले होते आणि सुर्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. जसा सुर्य चढत होता तसं माझा खोकला वाढत होता. पण पर्याय नव्हता, लक्ष्य अगदी अर्ध्या तासावर होते आणि मागे हटने शक्यच नव्हतं. मी मनातच "रांगत, रांगत जाईन, पण गड पुर्ण करेन" असा चंग बांधला होता. मी नाशिकला पुढे जाऊन गुहेत जागा धरायला सांगितले.मग मी एकदा मजबूत खोकून घेतले आणि मग सलग चालत १५ मिनिटस्ने मंदीर गाठले. अर्थात तेथे गेल्यावर कळले की हा झेंडा म्हणजे मंदीराचा झेंडा नव्हे कारण मंदीर तर खाली खड्यात आहे :) असो मी हुश्श करून त्या थंडगार गुहेत शिरलो. ह्याच गुहेत आमचे नवीन मित्र मॅड ग्रूप पण उतरले होते, त्यांनीच आमच्यासाठी आधी जाऊन जागा पकडली होती.
दुरून दिसलेले मंदिर
जरा फ़ास-फ़ूस...हाश-हुश...करून झाल्यावर निरिक्षणाला सुरुवात केली. आम्ही रहात असलेली गुहा मंदिराच्या अगदी मागे होती, अगदी बसल्याजागीच हरिशचंद्रेश्वराचे दर्शन होत होते. गुहा चांगलीच ऐस-पैस होती, अगदी १०-१५ माणसे सहज राहतील इतकी मोठी होती. तस पाहत मंदिराच्या बाजुनेपण गुहा होत्या. काही छोट्या तर काही मोठ्या होत्या. प्रत्येक गुहेखाली पाण्याची कुंडे होती, त्यामूळे गुहा अगदी ठंडगार होती. कुंडामधील पाणी अतिशय थंड, स्वच्छ आणि गोड होते, सर्वजण तेच पाणी पिण्यासाठी आणि स्वैपाकासाठी वापरत होते. मंदिर बरेच जुने आहे आणि हेमाडपंथी शैलीमधे बांधलेले आहे. संपुर्ण काळा पाषाणाचे मोठाले ठोकळे वापरून बांधलेले आहे. मंदिराच्या कळसावर बरेचसे कोरीव काम आहे, परंतु आता इतक्या वर्षांनी ते पुसट झालेले आहे. मंदिराचे आवार अगदी स्वच्छ होते. खांब अगदी छान ताशीव होते, आणि सगळं मंदिर अगदी थंडगार होते. मग मी आणि नाशिक जवळील तळ्यापाशी जाऊन त्यात पाय सोडून बसलो, थंडगार पाण्यामूळे फ़ार छान वाटत होते. तळ्यातील छोटे छोटे मासे पायाला चावायचा प्रयत्न करत होते, त्यामूळे छान गुदगुल्या होत होत्या. हे तळे/हौद आधी पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जायचा परंतु आता त्यातील पाणे पिण्यायोग्य राहीलेले नाही (नालयक लोकं :( ), आता येथिल पाणी आंघोळ, भांडी घासणे इत्यादीसाठी वापरले जाते. काही मंडळींचा आघोंळ कार्यक्रम सुरु होताच. हा हौद तसा बराच मोठा होता, सरंक्षक भिंत शाबूत होती, हौदात उतरायला दगडी पायऱ्या आहेत, तसेच भिंतीवरील कोनाड्यात पुष्कळ मुर्त्या होत्या (अता त्या काढून मंदिराजवळ ठेवल्या आहेत). एव्हाना भुकेची जाणीव झाली होती त्यामुळे मग आम्ही परत गुहेकडे गेलो. सॅंडविचचे सर्व सामान घरून आणलेले होते, नाशिकने तिखट-मिठाच्या पुऱ्या आणल्या होत्या. मग चीज, काकडीचे काप, बटाट्याचे काप, टॉमेटोचे काप, सॉस असा सगळा सरंजाम मांडून खाण्याचा कार्यक्रम पार पाडला. मग कॅरीमॅटस् उघडून पथारी पसरली आणि ३.३० पर्यंत मस्त ताणून दीली.
मंदिराजवळील दृश्ये
तारामती शिखर
मंदिराचा कळस आणि त्यावरील भगवा
४ वाजता परत टोपी, रुमाल, गॉगल आणि कॅमेरा असा अवतार धारण करून डोंबीवलीच्या ग्रूपबरोबर बाहेर फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. गडावर तसे आता काहीच उरलेले नाही, कोणत्याच वास्तुच्या खाणा-खुणा शाबूत नाही, तसे गडावर बऱ्याचश्या मुर्त्या आढळून आल्या, काही पुर्ण, काही भग्न, मुखत्यत: दगडांवर पुष्कळ शिवलिंगे कोरलेली आढळून आली. तारामती शिखराच्या खालीच ४-५ खोदीव गुहा आहेत, ह्यातच एका गुहेत गणपतीची मुर्ती आहे, म्हणून ह्यांना गणेश गुहा म्हटले जाते. अर्थात ह्या गुहासुद्धा प्रशस्त आहेत आणि माणसांनी खच्चून भरलेल्या होत्या :) आम्ही कोकणकड्याकडे प्रस्थान केले, सुमारे १५-२० मिनिटे पठारावरून चालल्यावर समोर अथांग मोकळा भाग दिसू लागला. काही पोरांचा अशक्या घाण आरडा-ओरडा सुरु होताच, तेव्हाच आम्ही ताडले की कोकणकडा जवळ आलेला आहे. शेवटी तो क्षण आला आणि आम्ही अतिशय प्रसिद्ध अश्या कोकणकड्याचा काठावर उभे होतो.
अथांग दरी
अफ़ाट कोकणकडा
समोर अथांग पसरलेली दरी आणि अगदी खडा कोकणकडा. घोड्याच्या नालीप्रमाणे असलेला हा खडा अंतवक्र असा आहे, आणि अगदी ताशीव आहे. पक्षी अगदी मुक्तपणे कड्याच्या वरच्या टोकावरून झेपावून खाली दरीपर्यंत जात होते, त्यांच्या चिवचिवाटाने ती दरी भरून गेली होती. त्या भव्य कड्याच्या दोन्ही बाजूंनी २ भव्य ताशीव डोंगर उभे होते. सुर्य अगदी तोंडावर असल्याने समोर विस्तिर्ण दरीमधले तसे अंधूकच दिसत होते , दुरवर भैरवगड, नाणेघाटाचा परीसर दिसत होता. माळशेज घाटाची डोंगररांग दिसत होती, जिथे बघावे तिथे मोठाले ताशीव डोंगर दिसत होते. त्या अथांग कड्याच्या अगदी काठापाशी उभे राहून मी खाली पाहीले, तेव्हा त्याच्या भव्यतेची खरी चुणूक मिळाली. मग तसेच काठावर झोपून डोके शक्य तितक्या बाहेर काढून सगळा कडा पाहून घेतला आणि कॅमेऱ्यामधे बंदिस्त केला. तिथे एक अनोखा प्रकार पाहीला, एक मुलगा जवळील खड्यातील पाणी खाली उडवत होता. ते पाणी जसे कड्याच्या काठावरून खाली गेले तसे ते फ़ाटत जाऊन मण्यांमधे रुपांतरीत झाले, जणूकाही पावसाचे थेंब. ते मणी थोडे खाली गेले, जरा थोडे स्थिर झाल्यासारखे वाटले आणि परत वर यायला लागले, हवेत बरेच वर उंच गेले आणि मग पावसाप्रमाणे आमच्या अंगावर पडले, अगदी २-३ वेळा असे केले :) बहुतेक त्या अंतवक्र भागापाशी ते थोडे स्थिर होत होते आणि मग तिथुन परत हवेत वर भिरकावले जात होते. तरीसुद्धा ते थेंबामधे का रुपआंतरीत का होते हे काही कळाले नाही. मग तसेच कड्याच्या काठावरून चालत जाऊन आम्ही त्याच्या भव्यतेचा प्रत्यय घेतला, वेगळ्या ऍंगलने फोटोज काढले आणि मग एके ठिकाणी गप्पा मारत बसलो.
कोकणकड्यापाशी काही दृश्ये
कोकणकड्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथून दिसणार सुर्यास्त. म्हणजे त्यावेळची किरणे कड्यावर पडून कड्याला मस्त रंग प्राप्त होतात, पण ते काही आमच्या नशीबाने आम्हाला दिसले नाही, पण हो तेथुन पाहीलेला सुर्यास्त अगदी अप्रतिम होता हे नक्कीच. पक्ष्यांचे मंद कुजन सुरु होते, वातावरण हळू-हळू निवळत होते, सुर्याला सोनेरी रंग प्राप्त झाला होता, आकाश नारींगी रंग धारण करत होते, मग मॅजेंटा रंगाने हजेरी लावली, हळू-हळू तो रंग गडद होत गेला आणि सरतेसरशी सुर्य सुंदर रंग उधळत मावळला. काही अतिशय मुर्ख लोकांनी फटाके आणले होते आणि कड्यावरून भिरकवत होते, त्यांचा काणठळ्या बसवणारा आवाज सभोवतालच्या जंगलात आणि दऱ्या-खोऱ्यात पसरत होता, आणि त्यानंतर त्यांचे भेसूर ओरडणे त्या सुंदर वातावरणाला बट्टा लावत होते, पण सगळे चल हिकडं, तिकडं, सम्या, नान्या,सौऱ्या असल्याने तसे त्यांना अटकाव करायचे कोणाचे धाडस नव्हते. अंधार लगेच पडायला लागल्याने मग आम्ही परत गुहेकडे पळालो.
कोकणकड्यावरून दिसलेला सुर्यास्त
गुहेकडे पोहचेपर्यंत अंधार झाला होता आणि आम्ही स्टोव्ह जोडलेला सुद्धा नव्हता..मग पहीले आम्ही बॅटरीच्या प्रकाशात त्याची जोडनी केली आणि त्याला पेटवून पाहीला. सगळं व्यवस्थित झालं असं वाटत होते, पण काहीतरी गडबड होती, कारण स्टोव मधले प्रेशर व्यवस्थित रहात नव्हते त्यामूळे मधे-मधे पंप मारायला लागणार होता. आम्ही परत एकदा तो जोडून बघितल पण येरे माझ्या मागल्याच झाले, पण मग आम्ही ती गैरसोय स्विकारायचे ठरवले (तसाही पर्याय नव्हताच :) ) बाजूच्या ग्रूपने फ़क्कड चहा केलेला होता, त्यांनी आम्हालापण थोडा दिला, चहा पित-पित आम्ही उरलेल्या पुऱ्यांचा फ़डशा पाडला. मग थोडावेळ टाइमपास करत बसलो होतो. त्या गुहेमधे मेणबत्तीचा मंद पिवळा प्रकाश पसरला होता, त्यामूळे गुहा अजुनच छान दिसत होती. ८च्या सुमारास मला जरा बाहेर :P जावे लागले, रात्री एकट्याने बाहेर जायला पण गट्स लागतात बरं का....बाहेर आलो तर मस्त चांदण पडलेलं होतं, आणि बाहेर तर लोकांच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं, सगळीकडे भाज्यांची चिराचीरी सुरु होती, मसाले निघत होते, भांडी वाजत होती ,चुली धगधगत होत्या आणि मस्त गारवा पसरलेला होता. मग मी परतलो, खिचडीचे सामान बाहेर काढले. मी आणि नाशिकने मस्त फोडणी देऊन खिचडी करायला ठेवली, मग लोणच्याबरोबर मस्त खिचडीवर ताव मारला. सगळं आवरून जरा बाहेर फेरफटका मारून आलो. परतल्यावर काही पोरांनी परत सुतळीबॉंब, लक्ष्मी बॉंब, फ़टाक्याच्या माळा, भुईनाळे, बाण अशी आतीषबाजीच सुरु केली, सर्व नालायक लोकांनी आख्खे जंगल दणाणून सोडलेले होते. त्यातच एका मुलाने एक बिगूल आणलेला होता आणि तो मुलगा रात्री १ वाजेपर्यंत अतिशय भेसूर बिगूल वाजवत होता, देवा!!! मी त्याला किती शिव्या घातल्या हे माझे मलाच माहीती. पहाटे ३ वाजता एकदा जागा आली, तेव्हा बाहेर जाऊन आलो, सगळ्या शेकोट्या,चूली विजल्याने छान वाटत होते, पण त्यामूळे चांदण्यांचा सडाच आभाळात दिसत होता, चंद्राचा सि.फ़.एल. अगदी लख्ख प्रकाशत होता. चांदण्यांनी भरलेले आकाश मी पहिल्यांदाच पहात होतो. ते क्षण मनात साठवून परत झोपी गेलो.
तारामती शिखरावरुन दिसणारा मंदिर परिसर
तारामतीवरून दिसणारा कोकणकड्याचा परिसर
अजून एक टप्पा नाशिक आणि मी :)
सकाळी ६.३०ला उठलो, जरा आवरून लगेच तारामती शिखरावर जायला निघालो. वातावरणात चांगलाच गारठा होता. सॅकचे ओझे नसल्याने चालताना छान वाटत होते. दवाने ओल्या झालेल्या गवताचा सुवास पसरलेला होता, पक्ष्यांचे कुजन चालू होते. साधारण २०-२५ मिनिटसने आम्ही तारामती शिखरावर पोचलो. सुर्य नुकताच उगवला होता, अर्थात झोपेमूळे आमचा सुर्योदय हुकलेला होता, पण तो कोवळा सुर्यपण छान वाटत होता. वर हवा अजूनच गार होती. मग शिखरापाशी फोटोज काढले, बाजूलाच रोहिदास शिखरपण होते (पण ते आम्ही केले नाही). तर तारामती हे सह्याद्री पर्वतरागांमधील महाराष्ट्रातील २ऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. आता मी आणि नाशिकने क्र.१ आणि २ अशी दोनही शिखरे गाठलेली आहेत. वरून हरिशचंद्रेश्वराचे मंदिर अगदीच छोटे दिसत होते. मग खाली उतरलो, स्टोव पेटवला, मस्त मॅगी करून खाल्ली, फुकटचा चहा घेतला, आणि पसारा आवरून घेतला. मंदिर झाडायला १ वयस्क व्यक्ती येते, त्यांना आमच्याकडिल उरलेला शिधा दिला आणि मग केदारेश्वराच्या दर्शनाला निघालो. केदारेश्वराचे शिवलिंग अतिप्रचंड मोठे आहे, आणि ते जवळिल एका गुहेत आहे. गुहेमधे कमरेएव्हडे पाणी असते आणि प्रचंड गार असते. ४ स्तंभांपैकी आता एकच उरलेला आहे, अर्थात घाबरू नका तशी त्या स्तंभाची काही गरज नाही, कारण गुहेचे छत अगदी व्यवस्थित आहे. आंघोळ नसल्याने आत जायचा प्रश्णच नव्हता :) मग दुरुनच जय शिवशंभो-गणपतीबाप्पा मोरया म्हणून, डोंबीवलीच्या मित्रांबरोबर नंबर एक्सचेंज करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
केदारेश्वराची गुहेतील पिंड (विकीपीडीया कडून साभार)
येताना २ तास तुडवलेले पठार पाउण तासात संपवले आणि लिंबूसरबतवाल्यापाशी पोचलो, ताक पिउन रॉकपॅच उतरलो, तोलार खिंडीचा गारवा आणि शांतता अनुभवत थोडावेळ थांबलो. तिथुन निघावेसे अजिबात वाटत नव्हते, पण मनावर मोठा दगड ठेवून निघालोच. साधारण २ तासात आम्ही पुर्णपणे खाली उतरलो. तिथेच एक झाडापाशी परत लिंबूसरबत घेतले आणि गाडीपाशी पोचलो. गाडी धुळीने भरलेली होती पण सिंगल पीस होती म्हणून मला फ़ार आंनद झाला :p, बादलीभर पाणी तिच्यावर ओतुन तिला गार केले, पार्किंगचे पैसे देउन आमची स्वारी परत पुण्याला जायला निघाली.
तसा हा गड भटकंतीसाठी फ़ार काही नसलेला आहे, परंतु येथे चांदण्यारात्रीमधे पठारावर रात्र घालवण्याचा अनुभव अतिशय़ सुंदर. ह्यावेळेला टेंट नव्हता आणि नेहेमीची मंडळीपण नव्हती. त्यामूळे परत एकद सर्व मंडळीबरोबर येथे नक्किच येणार आणि टेंट लावून बाहेरच झोपणार :D. गडावरच्या फ़टाक्यांच आणि बेवड्यांचा मात्र काहीतरी बंदोबस्त केला पाहीजे नाहीतर ह्या गडाचीपण वाट लागणे अटळ आहे. आम्हाला भेटलेला ग्रूप हा अतिशय छान होता, सर्व जण मजा मारयला आलेले नसून निसर्गाची मजा घ्यायला आलोय ह्या समविचाराचे असल्याने आम्ही दोघेच असूनही बोर झालो नाही. श्री.सतीश गायकवाडांनी आम्हाला गडाबद्द्ल बरीच माहीती सांगितली, तसेच त्यांच्या गड-किल्ले आणि भटकंतीबद्दलची आवड दिसून आली. आचरट लोकांच्या वर्तनाने ते अगदीच व्यथित झालेले होते, ३५-४० वर्षांचे असुनही त्यांचा स्टॅमिना तरुणांना लाजवणारा होता आणि त्यामूळेच त्यांची कळकळ अगदी सच्ची आहे हे पटत होते. तर असा हा आमचा प्रवास अगदी मस्त पुर्ण झाला.
काही मनोहर दृश्ये
उर्वरीत फोटोज येथे पहा:- http://picasaweb.google.com/Vinit.Agnihotri/Harishchandragad2009?authkey=Gv1sRgCOuEy_Lg1pzkigE&feat=directlink