हरिश्चंद्राची फ़ॅक्टरी

हा पिक्चर भलेही ऑस्कर वाल्यांना आवडला नसेल, परंतु कोणतीही मोठी स्टारकास्ट, बिभस्त गाणी, मसाला दृष्ये, प्रंचंड बजेट नसतानापण फ़क्त १० दिवसात १० करोड रुपयाची कमाई करणारा पिक्चर साधा असुच शकत नाही. जेव्हा पहिल्यांदा जाहीरात पाहीली तेव्हाच हा पिक्चर बघायचाच असा आम्ही चंगच बांधला होता. नटरंगप्रमाणेच ह्यावेळी मी, बायको, संदिप आणि अम्या अशी चौकडी हा पिक्चर बघायला मंगलाला गेलो होतो.
पिक्चर हा मुळात एक पिक्चरवर काढलेला पिक्चर आहे, त्यामूळे उत्सुकता जास्त होतीच. ऐनवेळी संदिप ट्रॅफ़िकमधे अडकल्याने आमची थोडी सुरुवात गेली पण नंतर मात्र १.३० तास निखळ करमणूक आणि तेव्हढेच कौतुक वाटले. पिक्चर तसा अगदी वेगवान आहे, स्टारकास्ट नावाजलेली नसली तरीही चांगली सशक्त आहे, संपुर्ण पिक्चरमधे कुठेही ओव्हरऍक्टिंगला थारा नाहीये, सगळ्या कलाकारांचे काम अगदी उत्तम झालेले आहे. नितीन देसाईंकडे दृष्यांची जबाबदारी असल्याने त्याच्या उत्तमपणाबद्दल काही बोलायचीच गरजच नाही. १९१३ च्या वेळची मुंबई अगदी जिंवत मस्त जिंवत केली आहे.
पिक्चर हा तसा विनोदी अंगाने जाणाराच आहे, परंतु कुठेही विनोद पेरायला लागलेले नाहीत तर ते निर्माण झाले पाहीजेत ही अपेक्षा पिक्चर १००% पुर्ण करतो. फ़ाळकेंची हलती चित्रे दाखवण्याचा घेतलेला वसा, त्यासाठी त्यांनी केलेली अविरत धडपड, जागरणं, केलेले निरनिराळे प्रयोग, शिकण्याची जिद्द हे सर्व शिकण्यासारखे आहे. एखादे अवघड काम चमत्काराने पुर्ण होत नाही तर ते पुर्ण करण्यासाठी अचाट प्रयत्न करावे लागतात आणि मुळात ते प्रयत्न प्रामाणिकपणे, आवडीने करणे जरूरी आहे हे अधोरेखित होते. त्यांच्या धडपडीत त्यांना त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेली साथ तर कौतुकास्पद आहे. घरातले सगळे सामान विकायला लागले तरीही आपले दागीने द्यायची स्वत:हून गहाण ठेवायला तयारी असणारी स्त्री निराळीच. नुसते पैसेच नाही, तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास त्यांनी फ़ाळकेंना दिला. तसेच फ़िल्म डेवलप करणे, सगळ्या कलाकारांचे जेवण, आवड-निवड जपत, घरातली बाकी कामे आंनदाने सांभाळणाऱ्या त्यांना खरचं साष्टांग नमस्कार (सध्याच्या बायकांनी काहीतरी शिकले पाहीजे त्यांच्याकडून :P ). झाडं मोठे होताना केलेले छायाचित्रण, नाटक कंपनीची प्रॅक्टीस, मुलांचे नाटक, पोलिस स्टेशनमधील द्रुश्यांनी तर हसून पुरेवाट होते.

स्वत:च्या मुलाला लागलेले असताना देखिल सीन पुर्ण झालाच पाहिजे अशी जिगर, परिस्थिती नसताना पॉलिसी गहाण टाकून पिक्चर तयार करायचे तंत्र शिकण्यासाठी केलेली लंडन ट्रीप, तेथे केलेली मेहेनत, जिद्द, चिकाटी. परत आल्यावर चित्रपट तयार करायचाच असा चंग बांधून केलेली जमवा-जमव, पिक्चरला गर्दी जमावी म्हणून केलेल्या अफ़लातून जाहीराती इत्यादी बघून खूप छान वाटते. आलेल्या सगळ्या अडचणींना धैर्याने तोंड देत फ़ाळकेंनी भारतातल्या चित्रपट उद्योगाचा पाया रचला, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अथक प्रैश्रमाने आजच चित्रपट उद्योग दिमाखात उभा आहे, आणि त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि उत्तमोत्तम कलाकार निर्माण झाले आहेत.
एकूणात पिक्चर अगदी मस्त आहे, सगळ्याच बाजू अगदी व्यवस्थित जमलेल्या आहेत. तेव्हा सिनेमाघरात जाउन नक्की पहा, सगळे पैसे वसूल होतील.चित्रपटाच्या निमित्ताने दादासाहेब फ़ाळकेंना माझे विनम्र अभिवादन, कारण त्यांच्यामुळेच भारतीयांना चित्रपटसृष्टीचा परिचय झाला आहे.
Labels: harishchandrachi factory, harishchandrachi factory critics, harishchandrachi factory movie, harishchandrachi factory preview, harishchandrachi factory review