Friday, July 04, 2008

माझी अमेरिकावारी

खालील कविता माझ्या बहिणीची आहे, ६ महिन्यांच्या विरहा नंतर तिच्या नवऱ्याला भेटायची ओढ तीने फ़ार सुंदर शब्दात व्यक्त केलेली आहे.

माझी अमेरिकावारी

जाणार जाणार म्हणता म्हणता
तीन - चार महिने गेले
येणार येणार म्हणता म्हणता
अमेरिकेचे तिकीट माझे आले

किती महीन्यांनी भेटशील तू!
मन उचंबळून आलं
आसावलं मन माझं
सात समुद्र ओलांडून गेलं

काय नेऊ अन काय आणू?
भराभरा यादी झाली
आज - उद्या करत करत
तयारी माझी सुरु झाली.

ठेवणीतले चांगले कपडेही
अचानक जुने वाटू लागले
रोज नव्या खरेदीने
कपाट माझे भरु लागले

परदेशी जायचं, तुला भेटायचं
आनंदही त्यांचा भव्यदिव्य
डॉलर्स आणा - पेपर्स जमवा
किती ती सव्य - अपसव्य!

परदेशी गेलेल्यांचे अनुभव
अन न गेलेल्यांचे सल्यांवर सल्ले
"बा! शांत रहा!"
"माझिया मना" ला मी बजावले

हळूहळू न्यायच्या वस्तूंची
जनवाजमव सुरु झाली
एवढं - तेवढं टाकत टाकत
शेवती बॅग गच्च भरली

चिवडा - लाडू, पीठं - भाजण्या
बॅगेत फुलला जणू खाउचा ताटवा
काजू - कतली,पेढे - बर्फी
असे त्यात प्रेमाचाही गोडवा

वाढता वाढता बॅगेचे वजन वाढले
तशी काट्यावर ठेवून होतेच मी लक्ष!
पण, तूझ्यासाठी हे सारं न्यायचयं ना!
मग त्यापुढे सारे नियम तुच्छ

दिवसातून रोज एकदा
बॅग उचलण्याचा सराव झाला
रेंगाळत रेंगाळत शेवटी
एकदाचा तो जायचा दिवस आला

विमानात बसायला ही यथासांग विधी
चेक-इन करु कि इमिग्रेशन आधी?
दुसरं विमान बदलतांना
पुन्हा सत्राशे - साठ भानगडी
वैतागून शेवटी मनानं म्हणाले
आपण दोघं भेटणार तरी कधी?

सामानासकट मी एकदाची
त्या अमेरिकेल पोचले
पुन्हा एकदा सारे विधी
अगदी यथासांग झाले

बाहेरच्या त्या परक्या गर्दीत
कूठे - कशी मी हरवून गेले
क्षणोक्षणी माझे डोळे
आर्तपणे तुला शोधत राहीले

शेवटी एकदाचा
तू मला दिसलास
मला बघून
हात पुढे केलास

तुझ्या हातात हात देताच
मन कसं विसावलं
डोळे भरुन पहात राहिले तुला
अन हळूहळू सारं धूसर झालं
सारं सारं धूसर झालं

--मीनल देशपांडे - अग्निहोत्री

Labels: , ,