नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
"आईची जय....अरे काय मजा केलीये राव ह्या लोकांनी!, मलापण जायचय..." फ़ेसबूकवरच्या उपडेटने मी डोळे फ़ाडून स्क्रीनवर पाहीलं तर कोणीतरी "पावसात नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड" असा अल्बम शेअर केलेला दिसला, तब्बल १०८ फोटो होते आणि मी हावरटासारखे १० वेळा ते पाहीले. मागच्या नोव्हेंबरमधे आमचा ह्यावाटेने जाण्याचा प्लॅन सुपरफ़्लॉप झाला होता, त्यामूळे मला तो अल्बम पाहून भयानक जळ-जळ होतं होती. मीपण तो अल्बम शेएर केला..म्हटलं "च्यामारी चल सगळ्यांची जळ-जळा होऊन जाऊ दे". अर्थात भटक्या लोकांची वाईट्ट जळ-जळ झाली, त्याबद्दल त्यांनी मला शिव्यांच्या लाखोल्यापण वाहील्या आणि अचानक अखिलेशचा शेअरवरचा रीप्ल्याय वाचला आणि मी ताडकन उडालो, "दादा, तुलापण चान्स आहे, ऑफ़बीट सह्याद्री १५-१६ सप्टेंबरला नळीच्या वाटेने चाल्ले आहेत, मीपण जातोय, चल तुपण", दुसऱ्याक्षणी मी त्याला फोन केला आणि ४ वेळा "नक्की ना...नक्की ना...नळीच्याच वाटेने जाणार ना..." असे विचारले, तो वैतागून "होरे बाबा" म्हणाल्याक्षणी मी फोन ठेवला आणि तात्काळ राजसला फोन केला आणि मी येतोय कीती पैसे भरायचे ते विचारून घेतले. त्याच्यापुढचा फोन दिपक आणि ह्रुशिकेषला केला, दिप्याला जमत नव्हतं, ह्रुश्या लगेच हो म्हणाला, आणि मी लगेच पैसे भरून मोकळा झालो. मयुरेशने हरिश्चंद्रगडाचा एक फोटो टाकून "कोणी जाणार असेल तर मला विचरा असा अपडेट पाहीला, ते पाहून मी त्याला पोस्ट टाकली, त्याचा लगेच मला कॉल आला आणि हा साहेबपण तयार झाला. हा सर्व प्रकार १ सप्टेंबरला झाल्यावर मी आतुरतेने १४ तारखेची वाट पाहत होतो आणि तो दिवस आलाच...मला सकाळपासून चैनच पडत नव्हतं, कधी एकदा बेसला पोचतोय आणि नळीची वाट धरतोय असं मला झालं होतं. ६.३५ च्या ईंद्रायणीने आम्ही तिघांनी पुणे सोडलं आणि एका अविस्मरणीय ट्रेकला सुरुवात झाली.
९:०० वाजता आम्ही कल्याण पोचलो, लगोलग जेवून घेतलं आणि कल्याण बसस्टॉपवर राजसला भेटलो, आमच्यसारखेच अजुन हपापलेली मंडळी तयारच होती. सगळ्यांची हजेरी झाल्यावर रात्री १०:३५ वाजता आम्ही मुरबाडच्या बसमधे बसलो, बसमधेच मग एक-मेकांच्या ओळखी झाल्या सगळेच हाडाचे ट्रेकर असल्याने भिडस्तपणा आणि माज नावाचा प्रकार नव्हताच त्यामूळे थोड्यावेळातच मस्त ग्रूप तयार झाला. अंदाजे पाऊण तासांनी मुरबाडला पोचलो आणि जीप्स वाटच पहात होत्या, आमच्या काही मंडळींना उशीर झाला होता, त्यामूळे ते मागाहून येणार अस्ल्याने आमची एक जीप बेलपाड्याला निघाली, मिट्ट काळोख आणि पाऊस सुरु झाला होत त्यामूळे छान वाटत होते, मुख्य रस्ता सोडून जीप बेलपाड्याच्या रस्त्याला लागली आणि यथावकाश आम्ही बेलपाड्याला पोचलो. लालू म्हणून एका गावकऱ्याकडे उतरायची व्यवस्था केली होती. ट्रेक सकाळी सुरु होणार होता, त्यामूळे लगेचच पब्लीकने मॅटस् सोडल्या आणि पथाऱ्या पसरून मोकळे झाले, झोप लागण शक्यच नव्ह्तं कारण डोळ्यासमोर सारखे तेच फोटो नाचत होते, झोप लागणार इतक्यात आमची दुसरी जीप आली आणि परत सगळे ऊठल, थोडी लोकांची सरकवा सरकवी करून सर्वा लोकांना झोपायला जागा मिळाली. एव्हाना २-३ वाजलेले होते.
कोकणकडा बेलपाडा गावापासून (फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)
सकाळी ५.३०च गजर वाजला पण कोणी उठलचं नाही... :), ६.३०लापण बाहेर अंधारच होता, पण तरीही पब्लीक झोपेतून जागी झाली आणि "महत्वाची" कामे करायला बाहेर पडली, मग चहा आणि नाश्ता पोटात ढकलून सगळी मंडळी एक मोठ्ठा गोल करून ओळख परेडसाठी उभी राहीली (राजसच्या भाषेत स्ट्रेट सर्कलमधे :फ) मग यथावकाश सगळ्यांनी ओळख परेड केली आणि विश्वेशने सगल्यांना सुचना दिल्या आणि एकदाचे आम्ही कड्याच्या पायथ्याशी निघालो. तसं तर बेलपाडा हे गाव बरोब्बर कोकणकड्याच्या खाली आहे, पण १-२ दिवसापासून पाऊस सुरु असल्याने धुके होते आणि आम्हाला कणभरही कडा दिसत नव्हता, थोडे हिरमोड झाला होता, पण पर्याय काही नव्हताच सो चले चलो चले चलो म्हणत वाट तुडवणे सुरु केले. पठारावरून सुरु होणारी वाट लवकरच धबधब्याच्या दिशेने जाऊ लागली, पाऊस असल्याने चांगलेच पाणी होते, त्यामूळे ट्रेक सुरु होतो ना होतो तर लगेच पाय गच्च ओले झाले. आजुबाजूच निसर्ग तर वेड लावत होता, खळाळणारं पाणी, हिरवीगार (खरोखर गार) झाडे, मधूनच काही पक्ष्यांचे मंजूळ आवाज, काळे कुळकुळीत दगड, माती म्हणून कूठे दिसत नव्हती कारण पाणी, दगड आणि झाडे सोडली तर बाकी सर्व जागी मस्त हिरवळ पसरली होती. नळीची वाट ही मुख्यत्वे पाण्याचीच वाट असल्याने पाणी चुकवणे अशक्य होते, हळू हळू सगळेजण ते पाणी एंजॉय करत चालत होते, उन्हाचा काही संबंध नसल्याने कोणालाही थकवा जाणवत नव्हता, फ़क्त प्रत्येकजण थोड्या वेळाने वर काही दिसतय का हेय बघायचा प्रयत्न करत होते.
पठारावरून ट्रेक सुरु झाला.
हिरवे जंगल आणि पाण्याची वाट
पहीला धबधबा...
अजून एक धबधबा
मजल दरमजल करत आम्ही सगळ्यांनी पहीला रॉक पॅच पार केला, विश्वेश आणि अजून १-२ जण आधीच दुसऱ्या रॉक पॅचपाशी पळाले होते कारन त्यांना तिथे रोपस् फ़िक्स करायच्या होत्या. आमच्या आधी तिथे अजून एक ग्रूप गेला होता, आणि त्यांचे पॅच पुर्ण करणे सुरु होते, त्यामूळे आम्हाला थआंबणे भाग होते. मग आम्ही तिथेच खबदाडीत दाटीवाटीने बसलो. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करता यावा म्हणून मग सगळ्यांनी सॅक्स उतरवून बिस्किटे, चिवडा, केक असे कोरडे पदार्थ खायला सुरुवात केली. वरून सतत रिमझिम सुरुच होती. एकदाचे पहील्या ग्रूपची लोकं वर गेली आणि विश्वेश, विनायकने पॅचचा ताबा घेतला आणि रोपवर्क करून घेतले. तो पॅच म्हणजे एक धबधबाच होता त्यामूळे त्या पाण्यातूनच सग्ळ्यांना चढायचं होतं, घसरत...सरकत एक एक करून पब्लीक चढू लागलं, पावसाचा जोर वाढू लागला होता आणि त्याचबरोबर धबधब्याचे पाणीपण वाढू लागले, आणि मग पाऊस सुस्साट सुरु झाला आणि धबधबा बदाबदा पडू लागला. सगळ्यांनीच १०-१५ मिनिटे थांबायचा निर्णय घेतला आणि परत आम्ही धो-धो कोसळणाऱ्या पावसात बसून राहीलो. बघता बघता अर्धा तास झाला, आम्हाला वाटू लागला की सालं झालं आता हा पाउस काही थांबायचा नाही आणि आपला पोपट होणार, पण नशीबाने साथ दीली आणि पाउस कमी होऊ लागला, पाणीपण कमी होऊ लागले, सुमारे ४५ मिनिटनंतर आम्ही परत चढाईल सुरुवात केली आणि सगळेजण वर आले. आता मत्र पब्लिकमधे जोरदार उत्साह आला होता कारण आता सगळ मनोहारी वाटत होते, थोडे खालचे दृश्य दिसू लागले होते, आम्ही आता खऱ्या अर्थाने नळी चढायला सुरुवात केली होती. दोन्ही बाजूंनी उंच कातळभिंती होत्या आणि प्रत्येक भिंतीवरून असंख्य छोटे छोटे प्रवाह वाहत होते, फ़क्त पाण्याचा आवाज वातवरणात भरून राहीला होता. खालच्या जंगलाचा हिरवा रंग, ओल्या दगडाचा रंग, धुक्याने भरलेला परीसर आणि असंख्य तुषार अंगावर येत होते, मला तर एक वेगळ्याच दुनीयेत वाटते होते.
पहील्या पॅचकडे
पहील्या पॅचपाशी थांबलेले सगळे
हृशिकेष पहीला पॅच करतोय.
पहील्या पॅच नंतर दिसलेली नळी
दुसऱ्या पॅचकडे वाटचाल
विश्वेश दुसऱ्या पॅचपाशी..
दुसरा पॅच पुर्ण झाल्यावर
दुसरा पॅच पुर्ण झाल्यावर
तिसरा पॅच
तिसरा पॅच पुर्ण झाल्यावर इथून ट्रॅवर्स सुरु होतो..
ट्रॅवर्स वरून हे द्रुष्य दिसते (हा फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)
सो-फ़ार-सो गूड आता एकदम मस्त वाटत होते कारण अता फ़क्त एकच एक्स्पोसड पॅच राहीला होता की खऱ्या अर्थाने आम्ही निवांत जाऊ शकणार होतो. वाऱ्याने थोडीशी साथ दीली आणि आम्हाला फ़क्त ५-१० सेंकदासाठी कोकणकडा दिसला, बास....ह्यानंतर आम्हाला एकदही कोकणकडा दिसला नाही :). आता आम्ही चौथ्या पॅचपशी उभे होतो, खरंतर ती एक अतिशय चिंचोळी जागा होती. राजस, मी आणि वरूण असे उभे होतो आणि बाकीचे अर्धवट वाटेत उभे होते. मग आदित्यला विचारून राजस पॅचवर चढला, मी त्याला खालून पुश दिला कारण नेम्क एक दगद उंच होता आणि त्यावर हात काही पोचेना. तो वर गेला आणि लगेचचं "ओह..शीट.." आणि एक बऱ्यापैकी मोठ्या दगडासकट गडगडत राजस खाली आला. मी नेमका खाली उभा होतो, माझ्यात कूठून संचारली कोण जाणे पण मी तात्काळ थोडे पूढे झूकून राजस आणि मला स्वत:ला आतल्या बाजूला झोकून दीले, त्या गडबडीत दगड राजसच्या डोक्यात आणि माझ्या कपाळावर आदळला आणि गडगडणे तिथेच थांबले. सगळ्यांची जाम टरकली होती कारण तिथे काहीच जागा नव्हती एक चुकीचा पाऊल आणि माझ्यासकट वरूणपण खाली गेला असता :). राजसला टोपीमूळे फ़ार लागलं नाही पण हलकेसे रक्त आलेच होते. मग विनायक मागून आला आणि तो पॅच चढून बसला, पावसामूळे तिथले मुरुमासारखे दगड खूपच ठिसूळ झाले होते. रोप बांधायला काही चान्सच नव्हता. आता दुसराच नंबर माझा होता :ड नुकताच असा प्रसंग झाल्याने नाही म्हणायला थोडी भीती वाटत होती, पण हिय्या करून मी चढलो, एके ठिकाणी दगड उंच असल्याने लिटरली मी दोन्ही हातानी दगड धरला आणि दुसरी ढांग पलीकडे टाकली, दोन ढांगांमधून मला खाली धुक्याने भरलेली दरी ओझरति दिसली कारण लगेचच मी पुढचा दगड धरून टप्पा पुर्ण केला आणि हुश्य केले. मागोमाग सगळे चढले आणि आम्ही चालायला सुरुवात करून पाचव्या पॅचपाशी आलो.
मी पहीले वर आल्याने मला विश्वेशने रोप बांधून वर जायला सांगीतले आणि मगे तो सुद्धा वर आला. त्याने मला रोप ओढायला बसवले आणि विनायकला सुचना देऊन तो राहूल बरोबर सहाव्या पॅचला निघाला. आम्ही एक-एक करून सग्लयांना वर घेतले. हा पॅच म्हणजे एक छोटी कातळभिंत होती आणि शेवाळामूळे पुर्णपणे बुळबुळीत झाली होती, सरकत सरकत सगळे वर आले. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते. पाऊस परत सुरु झाला होता, आम्ही सहाव्या पॅचकडे जायला सुरुवात केली, थोडे जंगल पार केल्यावर एक पाण्याच्या वाटेने परत वर चढायल सुरुवात केली आणि सहाव्या पॅचपाशी एकदाचे पोचलो. आता वारा वाहू लागला होता आणि भरीसभर पाऊस. सकाळपासून ओलेच असल्याने भयानक कूडकूडायल होत होते. चालतना काही वाटत नव्हते मात्र थांबले की भयानक थंडी. ६.४५ पर्यंत आम्ही सगळे सहावा पॅच पुर्ण केला, उरली सुरली बिस्किट, ओला चिवडा चालता चालता आम्ही एकदाचे कड्याच्या डाव्या बाजूच्या पठारावर आलो. शिवाजी महाराजकी जय अशी आरोळी टाकली आणि जवळ जवळ ११ तासांपासून चाललेला यद्न्य पुर्ण झाला. ७ वाजले होते आणि अंधार पडला होता, कोकणकड्यापाशी अजून पोचलो नव्हतो :) पिक्चर बाकी थी, अजून गुहांजवळ पोचायचं होतंच की :). मधे मधे सपाट कातळ लागत होते आणि अंधारामूळे आणि शेवाळामूळे सटा-सटा लोकं सटकत होती. नळीच्या वाटेत कोणीही आपटलं नाही पणा इथे सपाट कातळावर फ़ूल्ल स्लायडींग सुरु होतं, भरीस भर वारं अक्षरश: ढकलत होतं. मग बॅटरीच्या उजेडात बाणा शोधणं सुरु झालं, धुक्यामूळे बॅटरीचा प्रकाश जेमतेम खाली पोचत होता, वाट एकदाची मिळाली आणि आम्ही परत एकदा मार्गस्थ झालो. त्या धुक्यामधे लपटलेल्या अंधारात वाट शोधणे म्हणजे दिव्यच होते, पण मग आमची अर्धी टीम आधीच पोचल्याने त्यांनी गोविंद मामांना आम्हाला आणायला पाठवले होते. ते अर्ध्या वाटेत आम्हाला भेटले, मजा म्हणजे ते बिना बॅटरीचे चालत होते :) हे पाहून भयानक लाज वाटली. शेवटी थोडे सरकत-घसरत आम्ही एकदाचे गुहेपाशी पोचलो.
परत एकदा शिवाजी महाराजकी जय असा नारा घुमला.जवळ-जवळ १२ तासांनी आम्ही आमच्या मुक्कामी पोचलो होतो, एक अवघड ट्रेक आम्ही अधिक अवघड मोसमात केला होता. भरीसभर पावसाने चांगलेच सतवून तो अजून अवघड केला होता. पण सगळ्यांनी ट्रेक पुर्ण करून स्वत:साठी एक मानाची जागा तयार केली ह्यात काही वादच नाही. ऑफ़बीटच्या सर्व सदस्यांनी सगळ्यांना अगदी व्यवस्थित सही-सलामत सगळ्यांना वर आणलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानवे तितके कमीच आहेत.
गुहेत अर्धा पब्लिक निवांत कोरडं होऊन बसलं होतं. आम्हीपण फ़टाफ़ट कोरडे झालो आणि दुपारचे जेवण बाहेर काढले. एक प्रचंड मोठी अंगत-पंगत करून आम्ही दुपरचे जेवन रात्री ८ ला संपवले. सगळं आवरून निवांत बसलो होतो, काही लोकं तेव्हद्यात एक डूलकी मारत होते. यथावकाश गरमा-गरम खिचडीवर सगळे तुटून पडले आणि ते झाल्याबरोब्बर गाणी-बीणी न म्हणता तात्काळ झोपी गेले. गप्पा मारायचा स्कोपच नव्हता कारणा त्याला सरळ गुहेबाहेरच उभे केले असते :फ कधी नव्हे ते मला पण झोप लागली, मधे मधे सारखे आपले पाय पाण्यातच आहेत असे वाटत होते. १० वाजता जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी ७ ला डोळे उघडले. पिठलं-भाकरीचा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागलो.
आम्ही सगळे...
खिरेश्वरमार्गे खाली उतरलो, मस्त गरमा-गरम पिठलं, भात, आमटी खाऊन कल्याणला पोचलो. आमची परतीची ट्रेन हुकली होती आणि गणपतीमुळे जनरल डब्यात जागा मिळने मुश्कील होती त्यामूळे आम्ही बसनी जायचे ठरवले. कल्याणहून पुण्याला जाणारी शेवटची गाडी पकडून आम्ही उभे राहीलो. जशी गाडी पुढे गेली तशी खाली फ़तकल मारली आणि पहाटे ३ ला आम्ही एकदाचे पुण्याल पोचलो.
हिवाळ्यात परत एकदा नळीच्यावाटेने जायचचं आणि कोकणकडा पहायचाच अस्स निर्धार करून अश्याप्रकारे एक सुंदर आणि अविस्वमरणीय ट्रेक संपला होता.
उर्वरीत फोटो आणि काही व्हिडीओ येथे पहावेत:
पहीला रॉकपॅच झाल्यावर
ट्रॅव्हर्स सुरु करण्याअगोदर
Labels: harishchandragad in mansoon, Harishchandragad nalichi vaat, harishchandragad via nalichi vaat, harishchandragad via nalichi waat, nalichi vaat in mansoon, nalichi waat, nalichi waat in mansoon