Sunday, January 17, 2010

नटरंग..... मला वाटलेला

नटरंगची हवा अगदी खूप कमी कालावधीमधे प्रचंड पसरली होती. मुख्य म्हणजे "मला जाउ द्याना घरी....आता वाजलेकी बारा" आणि "अप्सरा आली..." ह्या गाण्यांनी फ़ुल्लटू धडाका उडवला होता. तसेच बऱ्याच जणांकडून "भारी आहे" असेही ऐकले होते. प्रोमोजमधे अतुल कुलकर्णीचा मेकओवर पण पाहीला होताच. त्यामूळे त्याची अदाकारी आणि अप्सरा बघण्यासाठी मी, बायको, संदिप आणि अमित प्रभातला पोचलो. संदिपने टिकीटस आधीच काढलेली असल्याने काही त्रास नव्हता. अन्यथा प्रभातचे पुढील दोन दिवसांचे शोज हाऊसफ़ूल झालेले दिसत होते.

पिक्चरची सुरुवात पिळदार अतुल कुलकर्णीच्या दर्शनाने होते, अतुल कुलकर्णीला मानावेच लागेल. एखदा रांगडा पहीलवान त्याने नुस्ता अभिनयाने नव्हे तर शरीरानेसुद्धा उत्तमपणे साकारला आहे. किशोर कदमांनी साकारलेला पांडूमामा पण अप्रतिम आहे. सोनाली कुलकर्णीने साकारलेले "नयना कोलापुरकरीन" पण एकदम फ़ट्टे जमलेली आहे ;) शेवटी तीच तर अप्सरा असते ना :P


पिक्चरच्या जमेच्या बाजू म्हणजे उत्कृष्ट लोकेशन्स, तेव्हढीच चांगले कास्टिंग आणि दर्जेदार अभिनय, अत्यंत उच्च दर्जाचे चित्रीकरण, तितकेच सुंदर संगीत आणि सुरावटी, कॅमेराच्या फ़ोकसचा आणि पॅनींगचा केलेला सुरेख वापर. काही महत्वाच्या दृष्यांनाच्या वेळी स्र्कीन काळी करणे आणि नंतर हळूहळू दृश्य पडद्यावर आणून नंतर फ़ेडींगचा प्रयोग अगदी परिणामकारक वाटतो. विहीरीवरील रहाटचे दृश्य आणि अतुल कुलकर्णीचे पावसातल्या राजाचे दृश्य पाहीले की "वाह, आयला, एक नंबर" असे उद्गार हमखास निघालेच पाहीजे ह्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. तसेच झी मराठीने केलेली जोरदार प्रसिद्धीलासुद्धा श्रेय दिलेच पाहीजे. तमाशा सुरु झाल्याक्षणी प्रभातमधे जो काही शिट्यांचा गजर झाला तो वर्णन करता येणे शक्यच नाही, तो अनुभवणेच उत्तम :)

तसेच "अप्सरा आली" मधे अजय-अतुलने दिलेले संगीत अतिशय उत्तम आहे. बिट्सचा अप्रतिम वापर करून एकदम गाण्याचा ट्रॅक बदलला जाण्याचा प्रयोग खरचं अप्रतिम आहे. अगदी मनापासून "आयला, जबरीच, कसल बेस्ट केलयं अरे" असे उद्गार निघालेच पाहीजेत. प्रभातला "डॉल्बी-सराउंड" इफ़ेक्ट असायलाच हवा होता असे खूप वेळा वाटले. "खेळ मांडला..." हे गाणेतर अजूनही डोक्यात वाजत आहे. ह्या गाण्याचे चित्रीकरण आणि सादरीकरण फ़ार सुंदर झाले आहेत, गाण्याचे शब्द, आशय आणि सुंदर संगीतामूळे हे गाणे फ़ारच परिणामकारक झाले आहे. मला तर हे गाणे अतिशय आवडले अगदी "अप्सरा आली" पेक्षा....


पिक्चर पुर्वाधात चांगलीच पकड घेतो. गणाची (अतुल कुलकर्णी) कलेसाठी चाललेली धडपड, तमाशाचा फ़ड तयार करण्यासाठी चाललेली धडपड, परंतु त्यामुळे त्याचे घराकडे होणारे दुर्लक्ष. त्याची कावलेली परंतु चकार शब्द न काढणारी बायको, त्याच्या उपदव्यापाने पिचलेला म्हाताऱ्या बापाची कळकळ अगदी व्यवस्थित मांडली गेली आहे. गणा आणि त्याच्या मित्रांची वगाची तालीम बघताना खूप गंमत वाटते. पैसे मिळवण्यासाठी शेतीकामे सोडून तमाशाचा फ़ड उभारण्याची त्याची धडपड, त्याचे राजा बनण्याचे स्वप्न, त्याच्याच प्रमाणे इतर मित्रांची त्याला मिळणारी साथ,त्यातून निर्माण होणारे विनोद. तमाशासाठी बाई शोधण्यासाठी झालेली त्रेद्धा-तिरपिटपण मस्त जमली आहे. मध्यंतरापर्यंत गणा "नाच्या" बनायचा विचार पक्का करतो. मध्यंतरापर्यंत पिक्चर अगदी व्यवस्थित पकड घेतो.

परंतु मध्यंतरानतंर मात्र ती पकड सुटत जाते. "नाच्याच्या" जिवनावरील चित्रपट असल्याने जास्त भर नाच्यावर असणॆ आवश्यक होते. परंतु तसे कुठेही जाणवत नाही. अतुल कुलकर्णीने १८ किलो वजन कमी करून नाच्या होण्याचा करिश्मा अगदी व्यवस्थितपणे साकारला आहे, आणि त्याला दाद दिलीच पाहीजे. परंतु नंतर फ़क्त २-३ प्रसंगामधेच त्याची नाच्या म्हणून अदाकारी दाखवलेली आहे, आणि हे फ़ार खटकते. जुना काळ आणि नाच्याची भूमिका करणार पुरुष ह्यामुळे त्याच्या कौटूंबीक आयुष्यात उठलेले वादळ दाखवण्यात यश आलेले आहे. त्याच्या कुटुंबाची होणारी कुचंबणा, त्यांना सोसावे लागणारे टोमणे, फ़ालक्या, बायल्या म्हणून त्यांच्या वाट्याला येणारी उपेष्टा. ह्या प्रकाराने हाय खाऊन बापाचे मरणे मनाला चटका लावून जाते. परंतु कुटुंबाच्या तुलनेने नायकावर असे प्रसंग दाखवण्यात आलेले नाही, हे फ़ार खटकते.

पिक्चर हा "नाच्यावर" आहे. आधी म्हणल्याप्रमाणे नाच्या झाल्यावर नाच्याची भूमिका जास्त नाहीये त्यामूळे नंतर बोर हो‍ऊ लागले. थोडक्यात सांगायचे तर नाच्याला यश का मिळत असते असा प्रसंग एकदाही नाही. नायकाचा बिगीनर ते प्रोफ़ेशनल असा प्रवास कुठेच दिसत नाही, त्याच्या राइज-फ़ॉल-राइज असेही कुठेच दिसत नाही. शेवटी जिवनगौरव पुरस्काराने नायकाला सन्मानीत करण्यात येते परंतु त्यासाठी त्याने केलेले काम कुठेच दाखवण्यात आलेले नाही. नाच्या झाला म्हणून समाजाने झिडकराल्यावर तो यशस्वी झाल्याचा समाजावर झालेला परिणाम दाखवण्यात आलेला नाही. नाच्याची व्यक्तीरेखा उभारी घेताना कधीच दिसत नाही, त्यामूळे नंतर पिक्चर बघताना अपेक्षा पुर्ण होत नाही, तो कुठेतरी अर्धवट राहतो. त्याचा आशय आपल्यापर्यंत पोचतच नाही असे मला वाटले. एक कलाकाराची धडपड सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यात मात्र पिक्चरला यश येत नाही. कदाचित नाच्याच्या भूमिकेला दिलेल्या कमी वेळाचा तो परिणाम असावा.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, परंतु पिक्चर अगदीच बघण्यासारखा निश्चितच आहे. वर सांगितल्याप्रमाणे पिक्चरमधे चित्रीकरण, संगित, अभिनय, विनोद, शोकांतिका इत्यादी व्यवस्थितपणे पेरलेले आहे. नाच्याच्या उपेक्षित पात्रावर चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न खरंच चांगला होता आणि धाडसीपण होता आणि आपण त्याला दाद दिलीच पाहीजे.

आपली मते जरूर नोंदवा..

धन्यवाद. :)

Labels: , , ,