Monday, June 22, 2009

पुन:श्च राजगड...

पुन:श्च राजगड...
मागच्या वर्षी राजगडावर जाणे झालेच होते, पण तेव्हा पाऊस, धुके आणि ढग ह्याखेरीज आम्हाला काहीच दिसले नव्हते.म्हणूनच त्याच ट्रेक दरम्यान आम्ही ठरवले होते की पुढच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राजगडावर जायचे आणि बालेकिल्यावरून सर्व प्रदेश पहायचा असे ठरवले होते. आम्ही २०-२१ जूनला जायचा बेत १५ दिवस अगोदर ठरवला होता, हा आता ही गोष्ट वेगळी आहे, की ९ जणांनी आम्ही येतो असे कळवून शेवटी आम्ही ४ जणंच गेलो पण ठरल्याप्रमाणे गेलोच..

आम्ही म्हणजे मी, अद्वैत, सचिन आणि संदीप २० तारखेला सकाळी ७ वाजता गुंजवणे गावाकडे पुण्याहून कुच केले.नसरापूरला मस्त गरमा-गरम मिसळ हाणली (गड चढायला शक्ती पाहीजे ना...) आणि मग गुंजवणेला पोचलो, बाईक्स पार्क करून, तिथेच मग जरा सामानाची निट बांधाबांध केली आणि वाट विचारून निघालो. ५ मिनीटस्‌ झाली असतील आणि आम्ही लगेच वाट चुकलो :फ मग २-३ जणांनी आम्हाला वाट समजावून सांगीतली.मग आम्ही योग्य मार्गाने चढाई सुरु केली. सुर्याने आम्ही व्यवस्थित पठारावर यायच पेशन्स दाखवला, आम्ही पहील्या पठारावर पोचून डोंगरावर चढाई सुरु करण्याआधी,मस्त भरपूर ऊन पाडून बहुतेक "थांबा तुमची परत यायची मस्ती जिरवतो" असा विचार करुन सुर्य साहेबांनी दमदार हजेरी लावली. साहेबांची अवकृपा झेलत आम्ही चढाई सुरु ठेवली, जरा वेळानी मी मस्त पेकलो :p. चालायचचं... माझं आता वय झालय..ऊन सोसवत नाही :D हा फ़क्त मी बसत नव्हतो पण नुस्तं उभे राहुनच दम खात होतो.
बालेकिल्ला

चोर दरवाज्याची वाट
मध्यात पोचल्यावर १ पठार लागले, आणि तेथुनच चोर दरवाज्याची उभी वाट दिसु लागली, एव्हना १०.३० झालेले होते, ऊन मस्त तापलेले होते, पण पाणी प्यायचे नाही असे ठरवलेले होते. तिथे भरपूर दम खाऊन चढाई सुरु केली, चढाई अवघड नव्हती पणा चढ प्रंचंड होता, इथे मी जरा बऱ्यापैकी परफ़ॉर्मन्स दिला, पण अगदी शेवटी-शेवटी मी लईच पेकलो. नाशिक नेहेमीप्रमाणे आघाडीवर होता आणि जवळ जवळ नॉन-स्टॉप गड चढला, सचिनपण पेकत होता, अद्वैतसुद्धा बऱ्यापैकी पेकला होता. पण सर्वजण व्यवस्थित साधारण ११.४५ला वर शिंगल पीस वर पोचलो.
मी,संदिप, सचिन आणि अद्वैत


वर पोचल्यावर आम्ही सगळ्यांनीच लगेच कॅरी-मॅट सोडल्या आणि जरावेळ तसेच पहुडलो. एका ताकवाल्याकडून भरपूर ताक घेतले आणि मग आम्हा सर्वांना जरा बरे वाटले, मग आम्ही आमचे डबे काढले आणि छान जेवून घेतले, मंदिराचा पत्रा जरा तापलाच होता, त्यामुळे आम्ही १ मॅट बाहेर व्हरांड्यात टाकली आणि तिथेच फ़तकल मारून बसलो, ऊन चांगलच गरम होतं पण वार मात्र छान होतं, २.३० वाजता थोडे ढग जमा झाले आणि मग मी बालेकिल्ल्यावर जायचे ठरवले. मागच्या वेळेस पावसाने आणि धुक्याने आम्हाला काहीच बघता आले नव्हते आणि तितकेच नाही तर बालेकिल्लासुद्धा बघता आला नव्हता. आम्ही बालेकिल्ल्यावरुन सर्व बघता आले पाहीजे ह्या एकमेव कारणासाठी परत राजगडावर आलो होतो आणि तो चान्स मला परत घालवायचा नव्हता.



मी आणि अद्वैत निघालो, आणि बालेकिल्ल्याच कठीण चढ चढू लागलो, दारात पोचलो तर लगेच पावसाने आम्हाला गाठलेच, पण धुके अजिबात नव्हते त्यामूळे आम्हाला वरून अतिशय सुंदर द्रुश्ये दिसु शकली. माझा आत्मा तर वर पोचल्याक्षणी सुखावला गेला...आपला भगवा झेंडा बलेकिल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी दिमाखाने फ़डफ़डत होता, त्याची ती शान त्या मोकळ्या आकाशाता अजुनच मनाला सुखावत होती. ज्या शिवरायांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी स्वराज्याचे स्वप्न पुर्ण केले, त्यांचे प्रतिक असलेला भगवा उंच स्थानी फ़डफ़डताना पाहून माझी छाती अभिमानाने भरून आली. त्या निळ्या आकाशच्या तुकड्यावर तो भगवा अतिशय उठून दिसत होता.
अद्वैत आणि मी
बालेकिल्ला दरवाजा
बालेकिल्याचा टप्पा

जसे वर्णनात वाचले होते अगदी तसेच बालेकिल्ल्यावरून दिसणारे द्रुश्य होते. गडाच्या तिन्ही माच्यांनी आपले अजस्त्र हात पसरलेले होते, त्यांच्या त्या अभेद्य तटबंद्या हिरव्या प्रदेशावर उठून दिसत होत्या, अगदी दुरवरचा प्रदेश व्यवस्थित दिसत होता, समोरचा सिंहगड तर धुक्याच्या दुलईत लपेटून ठेवल्यासारखा वाटत होता. तोरण्याची तर बातच वेगळी होती. रों-रों आवाज करणाऱ्या वाऱ्यामधे उभे राहून अशी द्रुश्य मला बघायला मिळाली हे माझे भाग्यच समजतो. बालेकिल्ला आणि राजगड पाहून महाराजांच्या दुरद्रुष्टीचे कौतुक करावे ते थोडेच. चारही बाजूंनी कातळाने अभेद्य बनलेल्या बालेकिल्ल्यावर चढाई करणे केवळ अशक्यच आणि त्यात विजेच्या चपळाईने लढणाऱ्या आपल्या मावळ्यांसमोर कोणाचा टिकाव लागणे ही तर अजूनच असाध्य बाब आहे. वरती दारुगोळ्याचे कोठार, पाण्याच्या टाक्या, अन्न-धान्याचे कोठार गनीमांना खालून दिसणारच नाहीत अशी चोख व्यवस्था बालेकिल्ल्यावरच बघायला मिळू शकते. जिथे १ माणूस चढताना मारा-मार तिथे सैन्य काय चढणार? म्हणूनच तर बालेकिल्ला सदैव अजिंक्यच राहीला. तर असा बालेकिल्ला पाहून आम्ही परत मंदिराकडे आलो. मग सचिन आणि संदिप बाहेर पडले.
धुक्याची टोपी घातलेला सिंहगड

स्वराज्याची शान आमचा भगवा महान

पद्मावती माची

सुवेळा माची

गडावर ह्यावेळी एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती, पावसाळी टाक्या भरलेल्या नसल्याने गडावर स्वच्छ पाण्याचे दुर्भिक्ष कसले, अस्तित्वच नव्हते. मग आम्ही पद्मावती तलावातून हिरवे पाणी घेतले :) आणि ते चारपदरी रुमालातून गाळून घेतले. नशीब आम्ही स्टोव्ह बरोबर नेला होता, मग मस्त त्यावर पाणी उकळून घेतले, तर अश्याप्रकारे आम्ही पाण्याची समस्या मिटवून टाकली. मग २घे परत आल्यावर मस्तपैकी कांदा, टॉमेटो, मिरची चिरली आणि ते वापरून कोरडी भेळ बनवली, त्यावर मस्त लिंबू पिळला, वर गरम मसाला, तिखट-मीठ टाकून मनसोक्त भेळ खाल्ली. मग जनरल गप्पा-टप्पा सुरु होत्या.
सचिन पिण्याचे पाणी भरतोय


६-६.३० च्या सुमारास मी सहज चक्कर मारायला बाहेर पडलो, पावसाची रिपरिप नुकतीच थांबली होती, आणि वातावरण अगदी आल्हाददायक झाले होते, जवळ-जवळ सर्व डोंगराच्या माथ्यावर धुक्याने चादर घातली होती, ढग हळूहळू दरी चढून येत होते, आणि डोंगरावरून अक्षरश: सांडत होते...पक्ष्यांचे सुंदर कुजन सुरु होते, पक्षी इतक्या निरनिराळ्या सुरांमधे गात होते की ते कसे वर्णन करू? त्यात मातीचा सुंदर गंध मिसळला गेला होता. तो निसर्ग, ते वातवरण, ते नेत्रसुख शब्दात वर्णन करणच फ़ार अवघड आहे. लोकं काश्मिर, दार्जिलिंग इत्यादी ठिकाणाची वर्णन सांगत असतात, परंतु मी ती वर्णन राजगडावर प्रत्यक्ष पाहत होतो.मला मनोमन माझ्या प्रिय अनुष्काची आठवण येते होती, तिलासुद्धा अश्या निसर्गाचे भलतेच आकर्षण आहे. मला मनोमन वाटत होते की आत्ता अनुष्का असती तर कित्ती छान झाले असते, एकदा मनात आले की धावत जाऊन कॅमेरा आणावा पण ते द्रुश्य संपून गेलं तर मला काहीच नाही मिळणार असा स्वार्थी विचार मनात आला आणि मी तसाचे ते द्रुश्य डोळ्यांमधे साठवत उभा राहीलो.परत एकदा सर्व काही धुक्याने भरून घेतले आणि मी परत निघालो. मंदिराच्या मागेच परत ढगांचा खेळ सुरु झाला, आता मात्र मी धावलो कॅमेरा घेतला आणि तो खेळ कायमचा बंदिस्त करुन घेतला.
गडावरून दिसणारे दिवे

स्टोव्ह आणि खिचडीचे पातेले

मग आम्ही खिचडीची तयारी सुरु केली, बटाटे चिरले, दाळ-तांदूळ धुतले, आणि झक्कास स्टोव्ह पेटवून खिचडी टाकली. बाहेर वातावरण परत स्वच्छ झालेले होते आणि आम्हाला खालील गांवांमधील दिवे दिसत होते. ते द्रुश्य टिपायचा प्रयत्न केला पण १५ सेंकद शटरे ठेवून सुद्धा हाती काही लागले नाही. तयार झालेली खिचडी चटपटीत चिप्स बरोबर खाल्ली. ते झाल्यावर मुंग्यासाठी सगळीकडे खडू मारून तयारी करून झोपी गेलो. सकाळी ऊठुन बाहेर पाहीले तर आकाशात रंगपंचमी सुरु झाली होती. सर्व पक्षी सुंदर आवाजात सुर्योदयाची बातमी देत होते, आम्ही चौघे धावत-पळत कॅमेरे घेउन ती सुंदर द्रुश्ये पकडायला धावलो. बाजुच्या डोंगरावर ढग केशरी झाले होते, खालची गावे अजुनही ढगांच्या चादरीखाली निद्रिस्त दिसत होती. क्षणभर असा भास झाला की सर्व डोंगरामधून पांढरी नदी वाहते आहे, पण ती तर नदी नसून धुक्याची छान चादर होती. चहुबाजुला तेच द्रुश्य दिसत होते, वातावरणात एक सुंदर सुगंध भरून रहीला होता आणि जोडीला गारवा सुद्धा होताच. सुर्यनारायण वर आल्यावर आम्ही पांगलो.

धुक्याची नदी
सकाळची काही प्रसन्न द्रुश्ये..

आकाशाची रंगपंचमी

त्यानंतर मग सुवेळा माचीवर जाऊन नेढे पाहीले, त्यामधे जरावेळ बसलो, पोटामधे भुकेने खड्डा पडला होता, एव्हाना तहान आणि भुक पोटात चांगलीच बोलत होती.परत आल्यावर मस्त मॅगी केली आणि मटकावली, सर्व काही आवरले, आमची जागा स्वच्छ केली आणि परतीच रस्ता धरला. साधारण तास-दिडतासात खाली उतरलो आणि मग गाड्या काढून फ़रार झालो. वाटेत खाउन घेतले आणि आपापल्या घरी पळालो.
सुवेळा माचीवरील नेढे

संदीप आणि मी
राजगडावरील तो बालेकिल्ला त्यावर दिमाखाने फ़डकणारा आकाशापेक्षा मोठा दिसणारा स्वराज्याचा उंच भगवा झेंडा, ती सुंदर आणि अतिशय रोमॅंटीक संध्याकाळ [पण एकट्याने घालवलेली :( ] आणि एक अतिशय ताजी-तवानी सकाळ मी कधीच विसरु शकणार नाही.काश आपल्या डोळ्यातील द्रुश्ये डाउनलोड करता आली असती...म्हणजे तुम्हाला ती दाखवता आलीच असती परंतु मलापण सारखी रिवाइंड करून बघता आली असती. असो मनात आलं तर परत राजगडावर जाइनच तोवर अच्छा :)

जय जय जय भवानी... जय जय जय शिवाजी...

Labels: , , , , , , , , , ,