कर्दे - एक नितांतसुंदर अनुभव
कर्दे - एक नितांतसुंदर अनुभव
सालाबादप्रमाणे उन्हाळ्यामधे कोकणचा बेत ठरवून तो आम्ही तडीस नेला, अर्थात ह्यावेळी मित्र बरोबर नव्हते,
पण माझी सर्वात जवळची मैत्रिण (माझी बायको) माझ्याबरोबर होती, म्हणून तर मित्र नव्हते ;) अनेक जागांविषयी माहीती आणि चर्चा करुन आम्हा दोघांच्या असे लक्षात आले की आम्ही बराचसा कोकण ह्या पुर्वीच पालथा घातला आहे, त्यामूळे काहीतरी नवी जागा शोधणे अतिशय जरूरी झाले होते. आम्ही दापोली, कर्दे, मुरुड ह्या जागेबद्दल बरेच ऐकले होते, पण तिथे कधीच गेलो नव्हतो, त्यामूळे सरळ कर्दे गाठावे असे आम्ही शेवटी एकमताने ठरवले :)
तर कर्दे, मुरुड ही जोडगोळी दापोली पासून १५ कि.मी. अंतरावर आहे. आम्ही पुणे-ताम्हीणी घाट - माणगाव - लोणेरे फ़ाटा - आंबेत - दापोली असा रस्ता वापरला. तसा ताम्हीणी घाट व्यवस्थित स्थितीमधे होता, आंबेत पासुन दापोलीपर्यंतचा रस्ता इतका काही चांगला नाही,कारने जायचे झाल्यास प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर स्टेपनी व्यवस्थित आहे ना, हे अगदी न विसरता बघून घेणे,तसा एकाट नाही, परंतु पेट्रोल पंप, टायरची दुकाने बरीच कमी आहे. त्यामूळे तयारीत असलेलेच बरे. आम्ही पुण्याहून दु.१२.३०ला निघालो आणि मजल-दरमजल करत अंदाजे सं.६.०० वाजता कर्देला पोहचलो. दापोली पासुन असूद नावाचे गाव आहे, तेथुन डावीकडे कर्दे आणि मुरुडसाठी फ़ाटा आहे, हा रस्ता अतिशय भिकार आहे, पण साधारण ३ कि.मीचा त्रास सहन केला की १ अतिशय सुंदर द्रुश्य तुमची वाट पाहत असतं, पुढे अजुन १ फ़ाटा लागतो, डावीकडे वळलात की मुरुड आणि उजवीकडे कर्दे. तर उजवीकडे वळलात आणि अगदी २०० मीटर पुढे गेलात, की अथांग समुद्र तुमच्या डोळ्यासमोर येतो, पांढऱ्याशुभ्र लाटा, मस्त वारा आणि मैलोनमैल पसरलेली ती स्वच्छ सुंदर वाळू, मावळतीकडे चाललेला सुर्य, त्याने उधळलेले असंख्य रंग पाहून तिथेच आम्ही कर्देच्या प्रेमात पडलो, त्या द्रुश्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दसुद्धा कमी आहेत. मग नंतर साधारण १ कि.मी. अंतर अगदी सुखावह आहे, कारण रस्त्याच्या डावीकडे हॉटेल्स आणि उजवीकडे तो सुंदर समुद्र आहे. आम्ही हॉटेलमधे चेक-इन केले, खिडकीतुन तो सुंदर समुद्र दिसत होताच, आम्ही दोघांनी सामान टाकले आणि लगेचच समुद्राला भेटायला धावलो, पाण्यामधे पोचल्यावर सगळा थकवा तात्काळ पळून गेला, माझ्या बायकोबरोबर पहील्यांदाच हातात हात धरून समुद्रात उभे राहयचा आणि सुंदर सुर्यास्त बघाण्याचा अनुभव शब्दात वर्णन करणे माझ्यासाठी तरी शक्य नाही. मग तिथेच जरावेळ रेंगाळत, आकाशातील रंगपंचमी पहात आम्ही बसलो आणि मग हॉटेलमधे परतलो, परतल्यावर मस्त गरमा-गरम कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेउन निवांत झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत बीचवर गेलो, होडीमधून डॉल्फिन्स बघायला खोल समुद्रात गेलो. भरपूर डॉल्फिन्स दिसले, काही उड्या मारत होतेअ, तर काही निवांत तरंगत होते. मस्त मोठ्ठा फ़ेरफटका मारुन ताजे-तवाने होउन परतलो. नाष्टा करून आम्ही आंजर्ल्याच्या कड्यावरील गणपतीचे दर्शन घ्यायला निघालो, वाटेत हरणई नावचे १ मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले बंदर लागते, रोज ४ वाजता येथे मास्यांचे मोठ्ठे लिलाव होतात, पण बायको आणि मी ह्यात उत्सुक नस्ल्याने आम्ही सरळ आंजर्य्लाला पोचलो. कड्यावरील गणपती एका डोंगरावर आहे, आणि अगदी वरपर्यंत व्यवस्थित गाडीरस्ता आहे. मंदीर तसे सुंदर आहे, मुख्य गोष्ट म्हणजे त्या डोंगरावरून समुद्राचे अगदी फ़ार सुंदर दर्शन घडते, अगदी दुरपर्यंत सगळं अगदी छान दिसतं. ते द्रुश्य साठवत आम्ही परत हॉटेलवर परतलो. मग दुपारचे जेवण आणि वामकूक्षि घेउन आम्ही ५.००च्या सुमारास परत समुद्रावर गेलो. वाळूमधे लहान मुलांसर्खे फ़तकल मारून १ झक्कास किल्ला करयचा प्रयत्न केला :) म्हणजे तसा जमला फ़क्त डोंगरी किल्ला होण्याऐवजी भुईकोट किल्ला तयार झाला, आणि समुद्रात भिजायला जायच्या नादात त्या किल्ल्याला कोट करयचा मात्र राहून गेला. मग मस्तपैकी पाण्यात भरपूर उड्या मारल्या, एकमेकांचे हात धरुन समुद्रा किनाऱ्यावर चक्कर मारली,सुर्यास्ताचे नितांत सुंदर द्रुश्य परत एकदा डोळ्यांमधे साठवून परत आलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आवरुन परतीचा रस्ता धरला, पाय तर तेथुन अजिबात निघवत नव्हता पण काय करणार ना..ऑफ़िस वाट पाहात होते ना.... :)
असो तर असे २ दिवस अगदी सुंदर पद्धतीने सत्कारणी लागले आणि अगदी भरपूर आठवणी आणि क्षण मागे ठेवून संपले. कर्देच्या किनाऱ्याची सुंदरता तेथील स्वच्छ, सुंदर आणि नितळ समुद्रामुळेच आहे आणि ती तशीचा कायम राहो अशीच इच्छा आहे. आणि आपण सगळेच अशी इच्छा ठेवुयात.
Labels: dapoli beach, dapoli hotel, dapoli road, harnai beach, karde beach, karde hotel, murud beach, murud hotel, road to dapoli, road to karde, road to murud, way to dapoli