दहशदवादावरील उपाय??
गेले काही दिवस सतत डोक्यामधे मुंबईवर झालेले हल्ले हाच विषय होता, अजुनही आहे..कितीही प्रयत्न केला तरी अजुनही ते झालेले हल्ले विसरता येत नाहीये. मला माहितीयेकी माझ्या सारखेच अनेक जण हाच विचार करत असतील. त्या हल्ल्यात काहींना आपले सर्वस्व गमवावे लागले, आपले शूर-वीर पोलिस कर्मचारी, कंमाडो अतिशय धैर्याने त्यांना सामोरे गेले, त्यांच्या शरीराचा कोट उभा करून आपल्या सर्वांचे रक्षण केले, आपले वीर शहीद झाले. त्यासर्व वीरांना माझा त्रिवार सलाम, माझे दुर्दैवी मुंबईकर बांधव त्या हल्ल्यात म्रुत्युमुखी पडले त्यांना शांती मिळो, मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात पुर्णपणे सहभागी आहे. त्या शूर वीरांचा आणि माझ्या अनेक दुर्दैवी बांधवांचा मान राखून मला काही मुद्दे मांडावेसे वाटतं होते. हे मुद्दे कदाचीत कोणालाही पटणार नाहीत, आणि म्हणूनच मी ते मुद्दे इथे मांडत आहे, म्हणजे तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल.
अतिरेक्यांचा प्रमुख उद्देश दहशद पसरवणे हाच असतो, अंधाधुंद गोळीबार, बॉंबहल्ले, ओलिस ठेवलेल्या निष्पाप लोकांची हत्या अश्या निर्घुण प्रकारांनी सर्व-सामान्य लोकांना हादरवून सोडणे हाच असतो. ते कधीच उघडपणे हल्ले करत नाहीत कारण मग त्यांचा पाडाव लगेच होइल आणि मग दहशद पसरणार नाही. त्यामूळे कायम लपून छपून हल्ले केले जातात. आत्ता जे हल्ले झाले ते ६० तास चालले पण त्यांनी काहीही मागणी केली नाही. इतकी लोकं ओलिस ठेवूनही कशाचीही मागणी नाही, म्हणजेच त्यांना ओलिसांचे काही घेणे-देणे नव्हते. ते त्यांना कधीही मारू शकले असते पण त्यांनी मुद्दाम तसे केले नाही, जेणे करून जास्त दहशद पसरली गेली, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे कळतचं नसल्याने कारवाई करताना अडथळे निर्माण झाले, परीणामी वातावरण खूप तणावाचे आणि भितीने भरले गेले.थोडक्यात कायतर त्यांचा उद्देश पुर्णपणे सफ़ल झाला.
आज पेपरमधे वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, काही जणांनी पोलिसांच्या गाफ़ीलपणाला दोश दीला, काहींनी अधिक संरक्षणाची इच्छा व्यक्त केली, काहींनी अत्याधुनिक शस्त्रांचा पुरस्कार केला, काहींनी पोलिसांना चांगली जॅकेटस् मिळायला हवीत असे सांगीतले, तर काही जणांनी प्रगत प्रशिक्षण घेतलेले कंमाडो कायमस्वरूपी ठेवावे असे नमूद केले. हे सर्व उपाय वर-वरचे आहेत, पुढच्या हल्ल्यामधे अजून काहीतरी नवीन समजेल. ह्या उपायांनी काही वर्षे अश्या हल्ल्यांना आळा बसेल, पण हल्ले थांबणार नाहीत, दहशदवादीसुद्धा आधुनिक शस्त्रे घेऊन हल्ले करतील. हे चक्र सतत सुरुच राहील. ह्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे हाच एकमेव उपाय आहे.
पण मग हा उपाय काय असेल? मी असाच विचार करत असताना १ उपाय मनात घर करून बसला. हो मला पुर्ण कल्पना आहे की घरात सुरक्षित बसून असे उपाय मांडणे सोप्पे आहे, पण ते अमलात आणने अतिशय अवघड आहे. जी व्यक्ती अश्या परिस्थितीमधून जाते तेव्हा त्य व्यक्तीची मानसिक अवस्था किती बिकट असेल ह्याची मला पुर्णपणे जाणीव आहे. व्यक्ती कितीही हुशार, मेहेनती असली तरी त्यावेळी मात्र डोके चालणे बंद होत असेल, एकदा का भितीने ताबा घेतला की अगदी बलवान, हुशार व्यक्तीसुद्धा गलीतगात्र होते, तिथे सामान्यांची काय कथा, आणि हाच अगदी हाच महत्वाचा मुद्दा आहे, ह्याच भितीवर काही उपाययोजना करणे हाच त्यावरचा उपाय असु शकतो.
आत्तापर्यंतच्या हल्ल्यांचा पॅटर्न पाहीला की असं लक्षात येतंकी हे अतिरेकी २-३ जणांच्या गटाने हल्ला करतात, आणि १० पेक्षा जास्त लोकांना ओलिस ठेवतात. शक्यतो हे अतिरेकी आणि ओलिस असलेल्या व्यक्ती एकाच बंदिस्त खोलीत असतात. आत्तासुद्धा ताजमधे २ अतिरेक्यांनी ५० जणांना ओलिस ठेवले होते. अतिरेकी ओलिस ठेवलेल्या लोकांपासून कधीही दुर राहत नाहीत. आता जर समजा ओलिस ठेवलेल्या लोकांनी अतिरेक्यांवर हाराकीरी केली, म्हणजे जर एकदम हल्ला केला तर अतिरेक्यांची हिम्मत खचेल. मान्य आहे की त्यांच्या गोळीबारात काही लोकं म्रुत्युमुखी पडतील पण उरलेली लोकं त्या अतिरेक्यांना पकडून त्यांना ठार करू शकतील. हो वरकरणी हा आत्महत्येचा १ भयानक प्रकार वाटेल किंवा मुर्खपणाचा कळस वाटेल. पण नीट विचार केला तर ह्याने २ उद्दिष्ट साध्य करता येतील, पहीले अतिरेकी ओलिसांकडून मारले जातील आणि वाचलेले ओलिस मोकळे होतील, पण दुसरे आणि महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे अतिरेक्यांना शह अथवा धक्का बसणे हे आहे. जेव्हा त्यांना कळेल की ही लोकं म्रुत्युला घाबरत नाहीत, बॉंब, बंदूक कशानेही ह्यांना घाबरवणे शक्य नाही, असे त्यांना कळाले की त्यांचा प्रार्थमिक उद्देश सफ़लच होणार नाही. म्हणजेच आपला असा हल्ला त्यांचे बलस्थान (दहशद पसरवणे) उद्धस्त करेल आणि ते मोडून पडतील.
जरी त्यांची शस्त्रे आधुनिक असली तरी सर्व शस्त्रांमधे गोळ्या भरायला वेळ लागतोच (काही शस्र्त्रे सोडून) तसेच एकावेळेस शस्त्रामधे ठराविकचं गोळ्या राहू शकतात. जेव्हा १ खोलिमधील नागरिक प्रतिहल्ला करतील, तेव्हा अतिरेक्यांना सावरायला वेळच मिळणार नाही. जमाव चालून आल्यावर त्यांचे सगळे प्लॅन्स् धूळीस मिळतील, जनशक्ती(विघातक अथवा विधायक) नेहेमीच मोठी असते ह्याची उदाहरणे भारतात खूप आढळतात.
ह्या पुर्वी त्यांना फ़क्त क्रुतिदलांचा धोका होता, निरपराध लोकांना ओलिस ठेवून त्यांच्या बळावर दहशद पसरवणे सोप्पे होते पण आता जर लोकांनीच प्रतिहल्ला करायला सुरुवात केली, कि अतिरेकी लोकांच्या नादी लागणार नाहीत कारण त्यांचा महत्वाचा आधार असलेले नागरीकच त्यांचे सर्वात मोठे शत्रु बनतील. एकदा का आपल्या सर्वांमधील भिती बाहेर पडलीकी आपल्याला कोणीही घाबरवू शकणार नाही. जर आपण म्रुत्युलाच घाबरत नसू तर आपल्यावर कोणीही अत्याचार करू शकणार नाही. हीच जाणीव दहशदवादावरील प्रभावी तोडगा ठरू शकतो. हो ह्यामधे काही लोकांचे जीव जातील, पण त्या लोकांचे मरण सुवर्णअक्षरात लिहिले जाईल, कारण त्यांचे मरण हे वीर-मरण असेल, त्यांचे मरण संपुर्ण देशात क्रांती घडवून आणेल. मला कल्पना आहे की असे म्हणने, लिहिणे सोप्पे आहे, जिवावर बेतले की कळेल असेही तुम्च्यापैकी बरेचजणं म्हणाल, परंतू जो पर्यंत अतिरेक्यांची भिती आपल्या मनात राहील तोपर्यंत आपण दहशदवादावरील लढाई कधीच जिंकू शकणार नाही.जेव्हा आपण हे सिद्ध करू की आम्ही घाबरत नाही तेव्हा त्यांचा खरा पराभव होईल, कारण त्यांच्या प्रमुख शस्त्रावर म्हणजेच त्यांच्या मुर्खपणाच्या विचारांवर आपण विजय मिळवलेला असेल. उद्या अगदी एक-एक अतिरेकी ठार मारला तरी जोपर्यंत ह्या जगातून अतिरेक्यांची मनोव्रुत्ती संपत नाही तोपर्यंत असे अतिरेकी तयार होतचं राहणार. त्यामूळे त्यांचे बलस्थान (आपल्याला असणारी त्यांची भिती) नष्ट करणे हाच उपाय ठरू शकतो. मी आवर्जून असे नमूद करेन की १-२ ओलिसांना अस प्रयत्न करणं शक्य नाही, असा प्रकार फ़क्त अतिरेकी कमी आणि ओलिस जास्त असले तरच करता येइल. नाहीतर १-२ जणांचा अयशस्वी प्रयत्न इतर सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतो.
अर्थात हा फ़क्त १ विचार आहे, ह्यामधे धोकेही आहेतच, मला इतकेच म्हणायचे आहे की आपण न घाबरता त्यांना सामोरे जाणे महत्वाचे आहेत. शस्त्रे, सुरक्षा इ.त्यादी गोष्टी आपल्याला भितीमधेच ठेवतील. मुंबईकरांच्या सहनशक्तीबद्दल माझे काहीच दुमत नाही, त्यांच्या धिटपणाबद्दल मी कायम त्यांना सलाम करतो, पण मला असं वाटत की ही सहनशक्ती त्यांच्यात जन्मजात निच्शीतच आलेली नाही, तर ती अगतिकतेमधून आलेली आहे. "रोज मरे त्याला कोण काय करे..." ही मानसिकतासुद्धा धोकादायकचं आहे. आपण आपली भिती घालवणे हा एक चांगला उपाय ठरू शकेल.
मी परत एकदा सांगू इच्छीतो की हे माझे विचार आहेत, हा उपाय १००% सुरक्षित नसेलही, ह्यात काही धोके असतील जे मला आत्ता दिसत नाहीयेत, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण आपली मते जरूर येथे मांडावीत जेणे करून मलाही माझ्याकडून दुर्लक्षीत मुद्दे लक्षात येतील, आपल्या सर्वांनी विचार करायची वेळ आलेली आहेच, तेव्हा माझे काही चुकले असल्यास मला जरूर कळवा. जर मला विचाराल तर बंधक म्हणून मरण्यापेक्षा मी वीर-मरण आंनदाने स्विकारेन हे मात्र अगदी नक्की.